केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि भाजपच्यावतीने गेल्या नऊ वर्षांत शेतकर्यांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या. शेतकर्यांना भेडसावणार्या समस्या, त्यांना देण्यात आलेल्या सवलती, केंद्र आणि राज्यातील भाजपप्रणित सरकारने शेतकर्यांसाठी केलेले काम, राज्यातील महायुती सरकारची वाटचाल, मुंबई महापालिका निवडणुका आणि उबाठा गटाची स्थिती यावर भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मेंद्रनाथ ठाकूर यांनी नुकताच दै. ’मुंबई तरुण भारत’शी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ठाकूर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून २०१० पासून भाजपच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात काम करत आहेत. त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत...
गेल्या १३ वर्षांपासून आपण भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहात. तेव्हा, आजवरच्या एकूणच वाटचालीविषयी काय सांगाल?
‘बीएससी केमिस्ट्री’ केल्यानंतर अर्थार्जनासाठी मी मुंबईत आलो आणि औषधविक्रेता कंपनीत कामाला सुरुवात केली. नोकरीत एक एक पायरी चढत मोठ्या पदांवर काम केल्यानंतर १९९९ साली मी नोकरी सोडली आणि स्वतः औषध बनवणारी कंपनी सुरू केली. २००६ साली जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात उतरून या जमिनींवर इमारती बांधण्याचे कामही आम्ही सुरू केले. कौटुंबिक पातळीवरही मी अत्यंत समाधानी असून माझी तीनही अपत्ये उच्चशिक्षित असून, माझ्या दोन मुली विदेशात कर्तृत्व गाजवत आहेत.ही सर्व वाटचाल सुरू असताना त्यासोबतच सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही काम सुरू केले आणि जनतेचाही त्याला प्रतिसाद मिळत गेला. २०१० साली मी लोकाग्रहास्तव भाजपत प्रवेश करून गेल्या १३ वर्षांपासून भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहे.
समाजकारण ते राजकारण या टप्प्यातील राजकीय वाटचाल कशी झाली?
गेल्या २० ते २५ वर्षांपासून मी सामाजिक कार्यात सक्रिय असून या माध्यमातून माझा अनेकांशी संपर्क वाढत गेला. माझ्या सामाजिक कार्याची दखल घेणार्या अनेक मंडळींनी माझ्यावर प्रेमळ पद्धतीने दबाव टाकून २०१०-११ दरम्यान मला भाजपत प्रवेश करण्यासाठी आग्रह केला आणि मी भाजपवासी झालो. पक्षानेही माझ्यावर विश्वास टाकून मुंबई भाजपत उपाध्यक्ष केले, उत्तर भारतीय प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि २०१४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये माझ्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली होती. बिहारमधून मुंबईत प्रचारासाठी आलेल्या दिग्गज नेत्यांसह २५ आमदार-खासदारांची बडदास्त ठेवण्याचे काम माझ्यावर देण्यात आले होते. त्यातून पक्षासाठी काम करण्याची आवड निर्माण झाली आणि तेव्हापासून पक्षाच्या कामात मी सर्वार्थाने जोडला गेलो. आज किसान मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष आणि महाराष्ट्रातील एक शेतकरी या नात्याने राज्यातील शेतकर्यांसाठी मला काही तरी काम करता येते, याचा आनंद आहे.
सामाजिक क्षेत्रातील तुमच्या कामाविषयी जाणून घ्यायला आवडेल. त्याबद्दल काय सांगाल?
शहापूर तालुक्यात काही कामानिमित्त मी अनेक वर्षांपूर्वी गेलो होतो. तेव्हा तेथील स्थानिकांना दैनंदिन जीवनात करावा लागणारा संघर्ष, आरोग्य प्रश्न, शौचालयाअभावी होणारी हेळसांड आणि इतर बाबी पाहून माझ्या मनात संवेदना निर्माण झाल्या. त्यांच्याप्रति काही तरी करावे या भावनेतून मी सामाजिक कार्य सुरू केले. ईश्वर कृपेने आज त्या ठिकाणी प्रत्येक घरात पाण्याची घरपोच सुविधा देण्यात आली आहे, जिथे कच्चा रस्ताही मोठ्या मुश्किलीने बांधला गेला तिथे आज चांगल्या दर्जाचे रस्ते बांधले गेले आहेत. स्थानिकांच्या आयुष्यात मोठा आमूलाग्र बदल आणण्यासाठी आम्ही केलेले अनेक प्रत्येक यशस्वी ठरले असून तेथील मुलांच्या शिक्षण आणि इतर प्रश्नांची सोडवणूक करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. मुंबईतही कोरोना काळ असेल किंवा इतर कुठलीही समस्या विविध मार्गाने लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्याने काम केले आहे. सार्वजनिक रामकथा, हळदीकुंकू, नारी शक्तीचा सन्मानासाठी नारी पूजन असे अनेक उपक्रम राबवून लोकांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न मी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७१व्या जन्मदिनाच्या औचित्यावर ७१ गरिबांना आवश्यक वस्तूंचे वाटपही आम्ही केले आहे. स्थानिक पातळीवर जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी देखील भाजपच्या माध्यमातून मी प्रयत्न केले असून, त्यातील अनेक प्रश्न प्रत्यक्षात सुटले याचे श्रेयही भाजपला जाते.
शेतीसंबंधी प्रश्नावर भाजप किसान मोर्चातर्फे कोणकोणते उपक्रम, अभियान यांचे आयोजन केले जाते?
शेतकरी हा देशाचा आणि जगाचा पोशिंदा आहे, हे वैश्विक सत्य आहे. देशाच्या अर्थकारणात मोलाची भूमिका बजावणार्या शेतकर्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न उराशी बाळगून चालणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांच्या आयुष्यात अनेक बदल घडवून आणले आहेत. उदाहरण म्हणून सांगायचं तर शेतकर्यांना मिळणार्या युरिया खताच्या वाटपात मोठा अनागोंदी कारभार चालत असे. युरिया वाटपात गैरव्यवहार करून मोठा भ्रष्टाचारदेखील झाल्याचे वारंवार उघडकीस आलेले आहे. यात मोठा बदल करून थेट शेतकर्यांना युरियाचे वाटप करण्याची पद्धत अमलात आणून मोठा दिलासा शेतकर्यांना दिला आहे. आर्थिक आणि इतर विवंचनेमुळे आत्महत्येपर्यंत पोहोचणार्या शेतकर्यांना आत्महत्येपासून परावृत्त करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक योजनादेखील मोदी सरकारने कार्यान्वित केल्या आहेत.‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’च्या माध्यमातून प्रतिवर्ष सहा हजार आणि ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’च्या माध्यमातून सहा हजार असे शेतकर्यांना १२ हजार रुपये प्रतिवर्ष देण्याचा क्रांतिकारक निर्णयही भाजपप्रणित सरकारने घेतला आहे. शेतीमालाला मिळणारा रास्त भाव, ऊस - कांदा आणि इतर उत्पादक शेतकर्यांना मिळणारे लाभ असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने शेतकर्यांच्या जीवनात हरितक्रांती केली आहे, असे आपण म्हणू शकतो.
स्थानिक राजकारणाबद्दल काय सांगाल?
गेल्या काही वर्षांत सामाजिक कार्य आणि भाजपच्या माध्यमातून राजकीय व्यासपीठावरून जनतेचे प्रश्न सोडवणे अशा दुहेरी भूमिकेतून आम्ही जनतेत जात आहोत. आम्ही सांघिक कृतीने जनतेच्या दरबारात जात असून लोकांचे प्रश्न सोडवतानाच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचीही आमची भूमिका आहे. भाजपने गेल्या काही वर्षात जोगेश्वरीवासीयांसाठी जे काही केले आहे, त्यामुळे उबाठा गटाचे स्थानिक आमदार आणि नेतेमंडळी घाबरून गेली आहेत. सत्तेच्या धुंदीत मश्गुल झालेल्या या लोकांना खडबडून जागे करण्याचे काम आम्ही केले असून, येत्या निवडणुकांत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय मी आणि माझे सहकारी स्वस्थ बसणार नाहीत!