भारतातील २८ राज्यांतील नागरिकांकडून राख्या गोळा करुन सीमेवरील सैनिकांसाठी घेऊन जाणार्या ‘वे टू कॉज फाऊंडेशन’च्या रोहित आचरेकर यांच्याविषयी...
एकदा रोहित आपल्या मानलेल्या बहिणीसोबत सीमेवर राखीवाटपासाठी गेले होते. तेव्हा सोबत असणार्या बहिणीने तिथल्या एका जवानाला राखी बांधली. त्यावेळी तो जवान अक्षरश: रडायला लागला आणि त्याने सांगितले की, ’‘गेले चार वर्षं मी घरी गेलेलो नाही.” त्या एका प्रसंगाने रोहित यांचे डोळे पाणावले आणि संपूर्ण भारतातून जवानांसाठी एक राखी मिळाली, तरी चालेल; पण ती राखी जवानांसाठी घेऊन जाईन, असा निर्धार रोहित यांनी केला.
मुळात रोहित आचरेकर यांचा जन्म मुंबईचा. त्यांचे मूळ गाव आचरा, मालवण. त्यांचे वडील ‘आयआयटी मुंबई’मध्ये कामाला होते, तर आई गृहिणी. रोहित यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण एस. एच. जोंधळे हायस्कूलमध्ये झाले. तसेच, रोहित यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण स्वामी विवेकानंद महाविद्यालयातून केले. तसेच, इंजिनिअरिंगचे शिक्षण ही त्यांनी घेतले. सध्या रोहित एका मित्राच्या मदतीने ’फ्री लान्सर’ म्हणून ’डिजिटल मार्केटिंग’चे काम करत आहेत. तसेच ’स्विगी’मध्ये फूड डिलेव्हरी बॉय म्हणून ते काम करतात.
रोहित हे तसे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून. पण, तरीही लहानपणापासून शाळेच्या सुट्टीमध्ये रोहित यांना त्यांचे वडील वनवासी पाड्यांमध्ये एक महिनाभर तिथल्या लोकांशी, त्यांच्या संस्कृतीशी नाळ जोडली जावी, या उद्देशाने चक्क राहायला पाठवत. तसेच, रोहित यांचे वडील रस्त्यावरील गरिबांनाही मदतीचा हात द्यायचे. त्यांनी कधीच भीक मागायला आलेल्याला पैसे दिले नाही. मात्र, पोटभर अन्न खायला नक्की घातलं. त्यामुळेच वडिलांच्या समाजकार्यामुळे रोहित यांनाही मदतकार्याची गोडी निर्माण झाली.
रोहित शाळेत असताना सैनिकांना शुभेच्छा देणारे पोस्टकार्ड पाठवत; पण ते पोस्टकार्ड खरंच त्या सैनिकांपर्यंत पोहोचतात का, असा प्रश्न त्यांना पडला. म्हणून त्यांनी स्वतः सीमेवरील सैनिकांना राख्या पाठवण्याचा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला शाळेतून २०० राख्या जमा करून त्यांनी त्या पोस्टाने सैनिकांना पाठवल्या. पण, कालांतराने त्यांच्या कामाचा आवाका वाढला. त्यांनी ‘वे टू कॉज फाऊंडेशन’ची सुरुवात केली.
‘वे टू कॉज फाऊंडेशन’ही संस्था २०१७ पासून काम करते. मात्र, या संस्थेची अधिकृत नोंदणी ही २०२० साली झाली. पण, रोहित आपल्या मित्रपरिवाराच्या मदतीने गेली १७ वर्षे सीमेवरील सैनिकांसाठी ’एक बंधन रक्षाबंधन’ उपक्रमांतर्गत राख्या पाठवत आहेत. ही संस्था कोणत्याही स्वरुपात आर्थिक साहाय्य स्वीकारत नाही, तर स्वयंसेवक होऊन संस्थेच्या कामात मदत करण्याचे आवाहन लोकांना करते. त्यासाठी फक्त दिवसाला एक रुपये इतके सदस्यत्व शुल्क द्यावे लागतात.
दि. १५ ऑगस्ट रोजी रोहित २६ हजार राख्या आणि तब्बल ७५० किलो मिठाई घेऊन सीमेच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे, सैनिकांसाठी रोहितने जी मिठाई नेली आहे, ती संस्थेच्या स्वयंसेवकांमार्फतच बनवून घेतली जाते.
सुरुवातीला महाराष्ट्र , गुजरात, दिल्ली, राजस्थान , पंजाब , हरियाणा या राज्यांतून राख्या जमा केल्या जात असतं. मात्र, आज संस्थेसोबत भारतातील २८ राज्य या ’एक बंधन रक्षाबंधन’ या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. मुळात ‘वे टू कॉज फाऊंडेशन’चे भारतभर २ हजार, ५०० स्वयंसेवक आहेत. तसेच, भारतातील ३५० सामाजिक संस्था या कामात रोहितला मदत करतात. त्यामुळे वेगवेगळ्या स्थानिक संस्थांच्या मदतीने राख्या जमा केल्या जातात आणि त्या राख्या मुंबईला पाठवून देतात. तसेच, सीमेवर जाताना जी राज्य वाटेत लागतात, तिथूनही रोहित राख्या जमा करणार आहेत.
या राख्या जेव्हा सीमेवर घेऊन रोहित पोहोचतील, तेव्हा तेथील काही संस्थेचे सहकारी तिथल्या पर्यटक भगिनींना या राख्या सीमेवरील जवानांना बांधण्याचे आवाहन करतील आणि सैनिकांचा रक्षाबंधनचा दिवस ही आनंदात जाईल. यावेळी कारगिलला हा रक्षाबंधनचा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. तसेच, या राख्या पाठवणार्या सर्व देशवासीयांना कारगिलवरून संस्थेच्या आणि सैनिकांच्या माध्यमातून राख्या पोहोचल्याचे पत्र पाठवले जाते. आश्चर्याची बाब म्हणजे, या प्रकल्पासाठी गाडीवरून राख्या घेऊन जाणार्या रोहित यांना राहण्याचा एक रुपयेही खर्च येत नाही. कारण, ज्या-ज्या राज्यातून ते जातात, तिथे त्यांना ’अतिथी देवो भव’ म्हणत लोकांकडून मदत मिळते.
रोहित यांनी संस्थेच्या माध्यमातून याआधी शिक्षण क्षेत्रातही काम केले आहे. तसेच, संस्थेच्या माध्यमातून एकाच वेळी संपूर्ण भारतभर आरोग्य शिबिरेही आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण भारतातील १८० गावांमध्ये अडीच लाख सॅनिटरी पॅडचे वाटपही संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. तसेच, ही संस्था वर्षाला १२ जनजागृतीचे प्रकल्प राबवते.
२०१२ साली ’फिआपो वर्ल्ड कॉन्फरन्स’ मध्ये रोहित यांना सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. तसेच ‘रोटरॅक्ट क्लब कल्याण’कडून ’सर्वोत्कृष्ट वैयक्तिक विकास दूत’ म्हणून रोहित यांना सन्मानित करण्यात आले आहे. पुढील वाटचालीसाठी रोहित आचरेकर यांना दै. ’मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
सुप्रिम मस्कर