ठाणे : कथ्थक नृत्य क्षेत्रामधील सुपरिचित नाव असलेले आचार्य डॉ. राजकुमार केतकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नटराज नृत्य निकेतन या शिष्यांच्या संस्थेने गडकरी रंगायतन येथे तथास्तू हा कार्यक्रम आयोजित करुन अनोखी मानवंदना दिली. कथ्थक नृत्य आचार्य डॉ. राजकुमार केतकर गुरुजींना गंडाबंध शिष्या कथ्थक नृत्य अलंकार प्रिती विद्याधर घाणेकर यांनी गुरुपुजन करुन गुरुदक्षिणा अर्पण करीत १११ विद्यार्थिनींसोबत नृत्यातून मानवंदना दिली.
याप्रसंगी डॉ. राजकुमार केतकर, नटेश्वर डान्स अकॅडमी प्रमुख वैभव जोशी, लोकनृत्य अभ्यासक सदानंद राणे, नृत्यदर्पण फाऊंडेशन लायब्ररीच्या संस्थापक पौलमी मुखर्जी उपस्थित होते. कथ्थक या शास्त्रीय नृत्य प्रकारातील २० विविध प्रकारच्या नृत्यांचे सादरीकरण कलाकारांनी केले. मधुरम, तीन ताल, तराना, शिव स्तवन, दुर्गा स्तुती, ठुमरी या नृत्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली.कार्यक्रमाचा समारोप प्रिती घाणेकर यांनी रचलेल्या गुरुभजनाने झाला.