मध्य आफ्रिकेतील कॅमेरूनच्या बेनू नॅशनल पार्कमध्ये कोर्डोफन जिराफांवर नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या कोर्डोफन जिराफांची शिकार सुरू राहिल्यास १५ वर्षांत ही उपप्रजाती नामशेष होण्याची शक्यता आहे. ‘आफ्रिकन जर्नल ऑफ इकोलॉजी’मध्ये प्रकाशित ‘ब्रिस्टल युनिव्हर्सिटी’ आणि ‘ब्रिस्टल प्राणिशास्त्र सोसायटी’च्या नवीन अभ्यासानुसार असे दिसून आले आहे. दरवर्षी फक्त दोन कॉर्डोफन जिराफ मारले गेल्यास, अवघ्या १५ वर्षांत उपप्रजाती स्थानिक पातळीवर नामशेष होऊ शकतात. शास्त्रज्ञांना अपेक्षा होती की, शिकारीमुळे बेनू नॅशनल पार्कमधील कॉर्डोफन जिराफची लोकसंख्या कमी होईल. परंतु, इतक्या कमी कालावधीत नामशेष होण्याचा धोका निर्माण होतील, याची अपेक्षा नव्हती. ‘ब्रिस्टल झूलॉजिकल सोसायटी’च्या संवर्धन विज्ञान आणि शिक्षण संस्थेच्या अभ्यासकांनी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हंटले आहे.
कॉर्डोफान जिराफ (जिराफा कॅमलोपार्डालिस अँटीकोरम) ही कॅमेरून, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक, चाड, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि दक्षिण सुदानमध्ये आढळणारी जिराफांची उपप्रजाती आहे. या जिराफांची एकूण लोकसंख्या सुमारे २ हजार, ३०० इतकी आहे, त्यापैकी बेनू नॅशनल पार्कमध्ये ३०० पेक्षा कमी जिराफ असल्याचा अंदाज आहे. कॉर्डोफन जिराफ ही उपप्रजातींपैकी सर्वांत लहान उपप्रजाती आहे. त्यांची उंची ३.८-४.७ मीटर (१२.५-१५.४ फूट) इतकीच असते. ते पाने, गवत, कळ्या, कोंब आणि बिया खातात आणि कमी-फ्रिक्वेंसी इन्फ्रासोनिक रेंजद्वारे संवाद साधतात. या कोर्डोफन जिराफांची बेकायदेशीरपणे शिकार केली जाते. त्यांचे मांस, हाडे, केस आणि शेपटी यासाठी त्यांची शिकार केली जाते. त्यांची कातडी काही चैनीच्या वस्तूंमध्ये आणि रग्ज म्हणूनही वापरली जाते. हे मोठे सस्तन प्राणी इतर प्राण्यांच्या तुलनेत सहज मरतात.
कॅमेरूनच्या आजूबाजूच्या राजकीय अस्थिरतेमुळे तिथल्या कॉर्डोफन जिराफांना शिकार, बेकायदेशीर पशुपालन आणि खाण अतिक्रमण यांसारख्या गोष्टींचा धोका आहे. ‘ब्रिस्टल युनिव्हर्सिटी’ आणि ‘ब्रिस्टल प्राणिशास्त्र सोसायटी’कडून या जिराफ लोकसंख्येचे संरक्षण करण्यासाठी अभ्यासात विविध मार्गांचे मूल्यांकन केले गेले. पुढील १०० वर्षांमध्ये जिराफ लोकसंख्येवर आणि नामशेष होण्याच्या संभाव्यतेवर त्यांचा कसा परिणाम होईल, हे पाहण्यासाठी त्यांनी या धोरणांची स्वतंत्रपणे आणि एकत्रितपणे चाचणी केली. त्यांना असे आढळले की, दर पाच वर्षांनी एक नर आणि एक मादी मरण पावल्यास १०० वर्षांमध्ये जिराफांची नामशेष होण्याची शक्यता ९८ टक्के इतके असते आणि एका वर्षांतून एक नर आणि एक मादी मरण पावल्यास अवघ्या १५ वर्षांत नामशेष होतील.
या अभ्यासात असे आढळून आले आहे की, हे विलुप्त होण्यापासून रोखण्यासाठी शिकार पूर्णपणे रोखणे हा सर्वांत प्रभावी उपाय आहे. यासाठी वनरक्षकांद्वारे होणारी गस्त अधिक प्रभावी करणे, शिकारविरोधी कायद्याची अंमलबजावणी कडकरित्या करणे समाविष्ट आहे. या सोबतच सामुदायिक सहभागदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. हवामान बदलामुळे होणारे वाळवंटीकरण आणि दहशतवादी कारवायांमुळे होणार्या विस्थापनामुळे संपूर्ण प्रदेशात निर्वासितांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे केवळ कायद्याची अंमलबजावणी करणारे उपाय या राष्ट्रीय उद्यानातील खनिज उत्खनन रोखू शकणार नाहीत. त्याऐवजी संवर्धन उपक्रमांच्या माध्यमातून उद्यानाच्या आसपास राहणार्यांना शाश्वत उपजीविका कशी निर्माण करता येईल, यावर भर दिला पाहिजे. मादी जिराफची शिकार नरांच्या शिकारीपेक्षा त्यांच्या संख्येवर लक्षणीय परिणाम करते.
मादी जिराफ ही चार वर्षांची झाल्यावरच गरोदर राहू शकते आणि त्याचा गर्भधारणेचा काळ हा १५ महिन्यांचा असतो. अभ्यासात असे दिसून आले की, या राष्ट्रीय उद्यानात मादी जिराफ अधिक संख्येने आणल्यास संख्येला मदत होईल. पण, अभ्यास करणार्या शास्त्रज्ञ इतर ठिकाणचे जिराफ इथे स्थानांतरित करण्याची शिफारस करत नाहीत. कारण, एकतर ही प्रक्रिया कठीण आणि महाग आहे आणि जोपर्यंत बेकायदेशीर शिकार रोखली जात नाही, तोपर्यंत नवीन जिराफ आणूनही काही उपयोग नाही. त्याऐवजी अधिवासंमधील मार्गांचे (कॉरिडोर) संरक्षण करण्याचे सुचवण्यात आले आहे. हे कॉरिडोर जिराफांची संख्या वाढवण्यास मदत करू शकतात. हे कॉरिडोर त्यांना नैसर्गिकरित्या अनुवांशिक विविधता राखण्यास मदत करतात.