एकात्मतेला धोका निर्माण करणार्‍यांना नायब राज्यपालांनी ठणकावले!

21 Aug 2023 21:38:07
Jammu and Kashmir Lieutenant Governor Manoj Sinha to Traitors

जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे ‘कलम ३७०’ रद्द केल्याच्या ऐतिहासिक घटनेस चार वर्षे पूर्ण झाल्यानंतरचा हा स्वातंत्र्य दिन सोहळा होता, असे असले तरी जम्मू-काश्मीरमधील काही ठिकाणी दहशतवादी अजूनही डोके वर काढत आहेत. अशा दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या देशद्रोह्यांना जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी कडक इशारा दिला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये यंदाचा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. अगदी श्रीनगरमधील लाल चौकासह सर्वत्र हा उत्साह ओसंडून वाहत होता. जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे ‘कलम ३७०’ रद्द केल्याच्या ऐतिहासिक घटनेस चार वर्षे पूर्ण झाल्यानंतरचा हा स्वातंत्र्य दिन सोहळा होता, असे असले तरी जम्मू-काश्मीरमधील काही ठिकाणी दहशतवादी अजूनही डोके वर काढत आहेत. अशा दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या देशद्रोह्यांना जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी कडक इशारा दिला आहे. अशा कारवायांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यामध्ये प्रशासन मुळीच मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा मनोज सिन्हा यांनी दिला आहे.

देशाच्या आणि राज्याच्या एकात्मतेस धोका निर्माण करणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे, असे नायब राज्यपालांनी स्पष्ट केले. जे सरकारी नोकर्‍या करतात, पण दहशतवाद्यांना आतून मदत करतात, त्यांच्याविरुद्ध कारवाईचा इशारा नायब राज्यपालांनी दिला आहे. जम्मू-काश्मीर बँकेच्या मुख्य व्यवस्थापकास दहशतवाद्यांना मदत करीत असल्याचा आरोपावरून कामावरून काढून टाकण्यात आले. त्याच्या दुसर्‍याच दिवशी मनोज सिन्हा याने हा इशारा दिला. जम्मू-काश्मीर बँकेचा मुख्य व्यवस्थापक असलेला सजाद अहमद बजाज हा अतिरेक्यांना मदत करीत होता. त्याचबरोबर त्याचे ‘जैश-ए-मोहम्मद’ संघटनेचा अझर मसूद याच्याशी त्याचे घनिष्ठ संबंध असल्याची माहिती बाहेर आली आहे. हा सजाद अहमद बजाज एका प्रभावी वृत्तपत्रामध्ये स्तंभलेखनही करतो. नायब राज्यपालांनी अशा ‘आयएसआय’ आणि अन्य दहशतवादी संघटनाच्या छुप्या हस्तकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

त्या आधी माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी, दहशतवाद्यांना मदत करीत असल्याचा ठपका ठेवून काही निवडक काश्मिरी कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यात येत असल्याचा आरोप केला होता. ज्यांना कामावरून काढून टाकण्यात आले, त्यांना आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याची संधीही देण्यात आली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. काश्मिरींना घाबरविण्यासाठी ही दडपशाही सुरु असल्याचे मुफ्ती याने म्हटले आहे. मेहबूबा मुफ्ती किंवा अन्य काश्मिरी नेते सध्या अस्वस्थ आहेत. ‘कलम ३७०’ पुन्हा जारी करण्यात यावे, यासाठी त्या सर्वांची केविलवाणी धडपड सुरु आहे. त्यामुळे शासनाने केलेली कोणतीही कृती या नेत्यांना काश्मिरी जनतेच्या विरुद्ध असल्याचे वाटत आहे. यासिन मलिक या फुटीर नेत्याची पत्नी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची सल्लागार म्हणून नेमली जाते, ही घटनाही फुटीर नेत्यांबाबत खूप काही सांगून जाते.

दरम्यान, केंद्र सरकारने ‘काश्मीर वाला’ हे न्यूज पोर्टल दहशतवादाचे उदात्तीकरण, हिंसाचारास चिथावणी आणि खोट्या बातम्या पसरवत असल्याबद्दल केंद्र सरकारने ‘ब्लॉक’ केले आहे. देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या या पोर्टलवर कारवाई करण्यात आली म्हणून काहींनी हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला असल्याचे सांगून आताच गळे काढण्यास सुरुवात केली आहे. ‘काश्मीर वाला’ हे पोर्टल म्हणे २०१९ मध्ये ‘३७० कलम’ रद्द करण्यात आल्यानंतर सत्य(?) बातम्या देणारी जी माध्यमे होती, त्यापैकी एक असल्याचा या पोर्टलच्या समर्थकांचा दावा आहे. देशविरोधी लोकांना साथ देणार्‍या पोर्टलवर निर्बंध आणले, तर गळा काढण्याचे काहीच कारण नाही. पण, अन्य देशांच्या ओंजळीने पाणी पिणार्‍या मंडळींच्या ते लक्षात कसे काय येणार!

दुर्मीळ मूर्ती, कलाकृती पुन्हा भारताकडे!

भारतावर राज्य करणार्‍या परकीयांनी आपल्या देशातील प्रचंड संपत्ती लुटण्याबरोबरच आपल्या देशातील अमूल्य असा ऐतिहासिक ठेवा पळवून नेला. त्यामध्ये विविध प्रकारच्या कलाकृतीबरोबरच हिंदू देवदेवतांच्या प्राचीन मूर्तींचा समावेश होता. तसेच, तस्करीद्वारेही असा ऐतिहासिक ठेवा अन्यत्र देशांमध्ये पाठविण्यात आला आणि तेथे त्यांची विक्री करण्यात आली. इंग्लंड, अमेरिका यासह अनेक देशांमध्ये भारताच्या या प्राचीन कलाकृती असून त्या परत आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातून अनेक मूर्ती, कलाकृती भारतामध्ये आणण्यात यश आले आहे. विदेशी भूमीवरून भारताच्या या कलाकृती मायदेशात आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जून २०२३ मध्ये झालेल्या अमेरिका दौर्‍यानंतर भारताच्या १०५ ऐतिहासिक कलाकृती, मूर्ती भारताच्या ताब्यात देण्याचा कार्यक्रम न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासामध्ये संपन्न झाला.

भारत आणि अमेरिका यांच्यादरम्यान सांस्कृतिक मालमत्ताविषयक जो करार झाला, त्यामुळे भारताचा हा ठेवा परत मिळण्यास मदत झाली. या वस्तूंमध्ये राजस्थानमधील १२-१३व्या शतकातील संगमरवरी कमान, मध्य भारतातील १४-१५व्या शतकातील अप्सरा, १४-१५व्या शतकातील साम्बादर, १७- १८व्या शतकातील नटराजाची धातूची मूर्ती आदींचा समावेश आहे. या वस्तू परत केल्याबद्दल अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजित सिंह यांनी अमेरिकेचे आभार मानले. त्याचबरोबर आमच्यासाठी हा आमच्या परंपरा आणि संस्कृतीचा अमूल्य असा ठेवा आहे, असे त्यांनी सांगितले. भारताचा हा ठेवा परत करण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपियन देशांमधून भारताचा ऐतिहासिक ठेवा परत मिळावा म्हणून भारत सरकारकडून प्रयत्न करण्यात आले होते.

सांस्कृतिक कार्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, २००३ ते २०२३ या कालावधीत ३२४ प्राचीन, ऐतिहासिक वस्तू, कलाकृती भारतात परत आणण्यात आल्या. त्यातील २९१ कलाकृती या २०२० आणि त्यानंतर भारताकडे आल्या. यापूर्वी भारतास कॅनडाने अन्नपूर्णेची दुर्मीळ मूर्ती परत केली होती. काशीमधून ही ऐतिहासिक मूर्ती चोरण्यात आली होती. आता त्या मूर्तीची काशिविश्वनाथ मंदिर परिसरात त्या मूर्तीच्या मूळस्थानी दोन वर्षांपूर्वी प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. भारताचा हा समृद्ध ठेवा तस्करीद्वारे आंतरराष्ट्रीय बाजारात विकण्यात आला होता. सध्या १५७ शिल्पे आणि कलाकृती विदेशात असल्याचे लक्षात आले असून, त्या वस्तू भारतात परत आणण्यासाठी विविध देशांसमवेत बोलणी सुरु आहेत. सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, बेल्जियम या देशांतून मूर्ती आणि कलाकृती परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

केरळ : त्रिसूरमध्ये ५५ फुटांची हनुमानाची मूर्ती

त्रिसूरच्या श्री सीताराम स्वामी मंदिराच्या परिसरामध्ये हनुमानाची भव्य ५५ फुटी मूर्ती उभारण्यात आली आहे. या मूर्तीचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने केले. याच कार्यक्रमात या मंदिरात प्रवेश करण्यासाठी ज्या सोन्याच्या पायर्‍या (सोपान) तयार करण्यात आल्या, त्याचे समर्पणही पंतप्रधान मोदी यांच्याद्वारे करण्यात आले. या पायर्‍या पूर्णपणे सोन्याने मढविलेल्या आहेत. ही हनुमानाचे भव्य मूर्ती एका अखंड पाषाणातून घडविण्यात आली आहे. ज्या ठिकाणी ही मूर्ती उभारण्यात आली आहे, ती जागा देवस्थानची आहे. हनुमानाच्या मूर्तीसाठी अमेरिकास्थित आर. राधाकृष्णन यांनी ५० लाख रुपये दिले आहेत. या प्रसंगी बोलताना, त्रिसूर ही प्रदीर्घ काळापासून केरळची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी निदर्शनास आणून दिले. परंपरा, आध्यात्मिकता, उत्सव आणि कला यांची ही भूमी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. जेथे सीताराम असतात, तेथे हनुमान असतोच. हनुमानाची ही भव्य मूर्ती भक्तांना सदैव आशीर्वाद देईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.

९८६९०२०७३२

Powered By Sangraha 9.0