शरद पवारांनी आजवर केवळ दाढ्या कुरवाळण्याचेच राजकारण केले. खरा इतिहास सामान्यांसमोर कधीही येऊ दिला नाही. म्हणूनच देशाचे पंतप्रधान फाळणीचा दिवस हा ‘विभाजन विभीषिका स्मृती दिवस’ म्हणून साजरा करा, असे एकीकडे आवाहन करत असताना, दुसरीकडे शरद पवार हे फाळणीचा इतिहास नव्या पिढीला शिकवण्याची काहीही गरज नाही, असे वक्तव्य करतात. असे हे पवारांचे दडवा आणि दडपाचे राजकारण!
भारताच्या फाळणीचा इतिहास हा रक्तपात, हिंसा, कटुतेचा आहे. तो वाचला तर त्यातून वेदनेऐवजी हिंसा, रक्तपात, कटुता रुजण्याची शक्यता आहे. तो इतिहास नव्या पिढीच्या मनावर बिंबवणे हे देशाच्या आणि समाजाच्या ऐक्यासह सांघिक भावनेच्या दृष्टीने योग्य नाही,” असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ते पुण्यात एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाळणीचा दिवस हा ‘विभाजन विभीषिका स्मृती दिवस’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन केले आहे.
देशाची फाळणी झाल्यामुळे ज्यांचे आयुष्य या निर्णयाने उद्ध्वस्त झाले, ज्यांच्यावर आपल्याच देशात विस्थापित म्हणून जगण्याची नामुष्कीची वेळ ओढवली, त्यांचे स्मरण ठेवणे हे नितांत गरजेचे आहे, अशी भावना त्यांनी नुकतीच व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार तो इतिहासच शिकवू नका, असे का म्हणत असतील? भारतावर ज्यांनी आक्रमणे केली, त्या आक्रमक धर्मांधांचा चुकीचा इतिहास आजही नवीन पिढीला शिकवला जात आहे. त्यांचे उद्दातीकरण केले जात आहे. त्याला पवारांची ना नाही. ‘छत्रपती संभाजीनगरला मी औरंगाबादच म्हणणार,’ अशी ते दर्पोक्ती करतात. ही कुठली मानसिकता? याला रुढार्थाने ‘लांगूलचालन’ असे म्हणत असले, तरी प्रत्यक्षात ते दाढ्या कुरवाळणेच! मावळ येथे शेतकरी बांधवांवर झालेल्या गोळीबाराला भाजपची चिथावणी होती, असेही पवार मध्यंतरी म्हणाले होते.
याच न्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जी आंदोलने होत आहेत, त्याला पवारांची फूस आहे का? असे आम्ही का म्हणू नये? समृद्धी महामार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघातात २५ प्रवाशांचा बळी गेला. या घटनेवरही निलाजरेपणाने व्यक्त होताना, ‘ते देवेंद्रवासी झाले,’ असे म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया देणारे शरद पवारच होते. असे का? तर हा महामार्ग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याने शक्य झाला म्हणून! दि. १२ मार्च, १९९३ रोजी मुंबईत एक-दोन नव्हे, तर तब्बल १२ बॉम्बस्फोट झाले आणि संपूर्ण देश हादरला. २५७ पेक्षा जास्त बळी या बॉम्बस्फोटांनी घेतले. शेकडो जखमी झाले.
राज्याचे मुख्यमंत्री होते शरद पवार! बॉम्बस्फोट घडवून आणला कुख्यात टायगर मेमन, याकुब मेमन आणि याचा सूत्रधार होता दाऊद इब्राहिम. दि. ६ मार्च, १९९३ रोजी पवार मुख्यमंत्री झाले आणि लगेचच मुंबईत बॉम्बस्फोटांचा धमाका उडाला. याची माहिती देताना मात्र पवारांनी त्यांच्या स्वभावाला अनुसरून मुंबईत १३ स्फोट झाले असल्याचे सांगितले. बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणांच्या यादीत त्यांनी मुस्लीमबहुल मस्जिद बंदराचा उल्लेख केला होता. हा तेरावा बॉम्ब कधीही फुटला नाही. याच कुख्यात दाऊदच्या हॅण्डलरकडून तसेच त्याच्या बहिणीकडून-हसिना पारकरकडून नाममात्र दरात मुंबईत अब्जावधी रुपयांची संपत्ती खरेदी करणारे नवाब मलिक हे तत्कालीन महाविकास आघाडीचे मंत्री गजाआड गेल्यानंतरही त्यांचा राजीनामा पवारांनी घेतला नव्हता.
दि. २३ नोव्हेंबर, १९९४ रोजी नागपुरात गोवारी समाज बांधवांनी आदिवासी दर्जा मिळावा व जातप्रमाणपत्रे मिळावीत, या मागणीसाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता. तत्कालीन राज्य सरकारचे हेकेखोर धोरण, तसेच पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधव बळी पडले. हा शासकीय आकडा आहे. प्रत्यक्षात तो जास्त असू शकतो. अनेक मंत्र्यांना विनवण्या करूनही एकही मंत्री या मोर्च्याला सामोरा गेला नाही. चारी बाजूंनी या मोर्चेकर्यांची कोंडी करून पोलिसांनी त्यांच्यावर लाठ्यांचा वर्षाव केला. गोवारी बांधव तुडवले गेले. न्यायाच्या अपेक्षेत आलेल्या या बांधवांच्या नशिबी मात्र मृत्यू आला. या हत्याकांडाची चौकशी झाली, ती कागदोपत्रीच. याला कोण कोण जबाबदार होते? हे सत्य मात्र आजही उघडकीस आले नाही. शासन, पोलीस, नेते, शासकीय यंत्रणा यापैकी कोणीच या दुर्दैवी घटनेला जबाबदार नव्हते, तर मग हे गोवारी बांधव कशामुळे बळी पडले? पवारांनीही याचे उत्तर आजवर दिलेले नाही. हे गोवारी बांधव ‘शरदवासी’ झाले असे म्हणायचे काय?
देशाची फाळणी ही घटना देशाच्या अखंडतेवर घाला घालणारी तर ठरलीच, त्याचवेळी लाखो हिंदूंवर जे अन्याय झाले, त्यांच्या आठवणीही अंगावर शहारा आणणार्या अशाच आहेत. एका दिवसांत लाखो हिंदू रस्त्यावर आले. आपल्याच देशात विस्थापित म्हणून लाजिरवाणे जगणे, त्यांच्या नशिबी आले. देशाची फाळणी झाली, हे पाप कोणाचे? याचा विसर का पडू द्यायचा? म्हणूनच देशाचे पंतप्रधान या घटनेचे स्मरण करा, म्हणून आवाहन करतात. त्याचवेळी शरद पवार फाळणीचा इतिहास नव्या पिढीला शिकवण्याची काहीही गरज नाही, असे जाहीर कार्यक्रमातून सांगतात. दाढ्या कुरवाळणे ही पवारांची राजकीय, मानसिक गरज असू शकते, आमची नाही. म्हणूनच मुस्लीम सणांना ते आवर्जून उपस्थित राहतात, शुभेच्छा देतात.
हिंदू सणाला त्यांनी शुभेच्छा दिल्याचे कधी ऐकण्यात, पाहण्यात नाही आले. श्रीमंत दगडूशेठ मंदिराला ते बाहेरून भेट देतात, आतही जात नाहीत. दडवा किंवा दडपा हे पवारांचे राजकारण आहे. मुंबई बॉम्बस्फोट, गोवारी हत्याकांड, नवाब मलिक यादी खूप मोठी आहे. सत्य कितीही दडवले, तरी ते स्वयंप्रकाशी असल्याने एक ना एक दिवस उघड होतेच. खरा इतिहास त्यांनी इतकी दशके सामान्यांसमोर येऊ दिला नव्हता. त्यांच्याच उपस्थितीत ‘अडगळी’तले नेमाडे काशीबद्दल धादांत खोटी व्यक्तव्ये करतात. पवार त्यावर कोणताही आक्षेप घेत नाहीत. म्हणजेच नेमाडे बदनाम झाले, त्यांचा बोलविता धनी नेहमीप्रमाणेच नामानिराळा राहिला, असेच म्हणावे लागेल.