सौंदर्यजतन, सौंदर्यवर्धन-आयुर्वेदासंगे...

21 Aug 2023 22:16:11
Article On Skin And Body Exercise

त्वचेला सौंदर्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्वचेची लवचिकता, एकसंगता, तेज, तुकतुकी, सुसंगत वर्ण इ. लक्षणे निरोगी स्वास्थ्याची निर्देशके आहेत. आभ्यंतर स्वास्थ्य हे त्वचेवर झळाळते व ते टिकविण्यासाठी आहार, निद्रा व व्यायाम महत्त्वाचे आहे. मागील लेखात आहार व निद्रेबद्दल माहिती घेतली. आज त्वचा व व्यायाम यांतील संबंध व महत्त्व याबद्दल जाणून घेऊया.

व्यायाम म्हणजे शरीराची विशिष्ट पद्धतीने केलेली हालचाल. गृहिणींमध्ये हा मोठा गैरसमज आहे की, सगळी घरकामे केली म्हणजे व्यायामच झाला. पण, असे अजिबात नाही. काहींना असेही वाटते की, व्यायाम हा न चुकता, दररोज सकाळीच व्हायला हवा. या सर्व मुद्द्यांवर आज आपण वाचूयात ‘व्यायाम’ या शब्दाची फोड - ‘वि + आयाम’ शरीराच्या विशिष्ट हालचाली (ज्यात केवळ एक अवयव अभिप्रेत नाही, पण संपूर्ण शरीराची हालचाल अपेक्षित आहे. घरकामांमधील उदाहरण घेतले, तर केर काढणे, लादी पुसणे, कपडे धुणे इ.मध्ये फक्त पुढे वाकले जाते. शरीर ताणले जाते. पण, ज्या अवयवांवर सतत ताण असतो, त्यांना ही विश्रांतीची गरज असते, आवश्यकता असते. उदा. लॅपटॉप, डेस्कटॉप, माऊसवर सतत काम केल्याने मानेचे स्नायू दुखतात, ताठरतात (STUFF होतात) माऊसचा खूप वापर केल्याने मनगटामध्ये स्तब्धता व हालचालीत वेदना उत्पन्न होतात. याचे कारण, या अवयवांवर एक विशिष्ट कोनातच ताण सतत पडतो. व्यायामामध्ये प्रत्येक स्नायूचे आकुंचन व प्रसरण (STRETCHING - RELAXING) गरजेचे आहे. प्रत्येक शरीराच्या अवयवाचा व्यायाम फक्त चालण्यानेही होत नाही. पायाचे सांधे (गुडघे व घोटा) हे WEIGHT BEARING JOINTS आहेत व अति चालल्याने फक्त पायावर अतिरिक्त ताण येतो व पुढे जाऊन सांध्यांची झीज झाली/होतेय, असे सांगितले जाते.

जेवढे वजन जास्त, तेवढे पायावर भार (चालताना) अधिक येतो. परिणामस्वरुप, त्या-त्या विशिष्ट सांध्यांची झीज लवकर सुरु होते.
आयुर्वेदामध्ये व्यायाम किती करावा, याचे एक उत्तम संकेत दिले आहे - अर्ध शक्ती व्यायाम म्हणजे, आपली क्षमता ओळखून त्यानुसार किती व्यायाम करावा याबद्दल प्रत्येक व्यक्तीने ठरवावे. अर्ध शक्ती ही क्षमता कशी ओळखावी? तर व्यायाम करते वेळी घाम येऊ लागला, दम लागू लागला, थकवा जाणवू लागला व घशाला कोरड पडू लागली की अर्ध शक्ती झाली असे समजावे. शरीराला व श्वसनाला थोडे टॅक्सिंग होऊ लागते. हृद्गती वाढू लागते - त्याला अर्ध शक्ती समजावे. पण, सातत्याने, अभ्यासाने प्रत्येक व्यक्तीला ही ’अर्ध शक्ती’ वाढविता येते. यालाच ’STAMINA BUILDING’ असे म्हटले जाते. सवय नसताना एकदम व्यायाम सुरु केला की, वरील लक्षणेे चटकन दिसू लागतात. पण, नियमित सरावाने क्षमता वाढू लागते. व्यायामामध्ये संपूर्ण शरीराची हालचाल आणि पुढे-मागे-दोन्ही बाजूने-वर-खाली अशा सगळ्या दिशांनी हालचाली अपेक्षित आहेत. यामध्ये सर्वांग सुंदर व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार त्याचबरोबर पोहणे, (सायकल चालविणे, विविध प्रकारचे व्यायाम प्रकार, नर्तन प्रकार इ.मध्ये या हालचाली होतात. ज्यांना व्यायामाची सवय नाहीये किंवा आजारपणामुळे व्यायाम सुटलाय, गर्भवती अवस्थेत, बाल्यावस्थेत वृद्धांनी, ज्यांना गंभीर आजार नुकताच होऊन गेला-अशा सर्वांनी एकदम व्यायाम (HEAVY EXERCISE) सुरु करू नयेत.

व्यायामाचीसुद्धा शिस्त लावावी लागते. व्यायामाची पहिली पायरी म्हणून चालणे सुरु करावे. आधी हळू, मग थोडी गती वाढवावी (BRISK WALKING) मग J०GGING. असे करत-करत व्यायामाची सुरुवात करावी. सुरुवातीस २० मिनिटे (किमान) अशी सुरुवात करत ४० मिनिटे ते एक तास इतका अवधी वाढवावा. रिकाम्या पोटी व्यायाम करणे उत्तम. पण, म्हणून सकाळची वेळ टळली, तर दिवसभरात कधीच करू नये - असे नसावे. आयुर्वेदशास्त्रानुसार पूर्ण जेवणानंतर चार तासाने पोट रिकामे होते. म्हणजे दुपारी १ वाजता जर जेवण होत असेल, तर संध्याकाळी ५ वा. पोट संपूर्ण रिकामे होते (आहार नियमानुसार करत असल्यास), तसेच, हलके/ अन्न/ न्याहरी इ. नंतर अडीच-तीन तासाने व्यायाम केलेला चालतो. चहा-कॉफी-ज्यूस इ. नंतर दीड-दोन तासाने व्यायाम करावा आणि पाणी प्यायल्यानंतर ३० मिनिटाने व्यायाम करावा, असा एक सर्वसामान्य नियम आहे. पण, प्रकृतीनुसार, व्यक्तीनुसार, संहनन (शरीरयष्टी नुसार) आणि मानसिक स्थितीनुसार यात थोडा बदल करावा.

व्यायामाचा त्वचेवर काय परिणाम होतो? तर व्यायाम सुरू केल्यावर, सगळ्यात पहिले श्वासगती आणि हृद्गती वाढते आणि त्यानंतर स्वेद प्रवृत्ती (घाम) येऊ लागतो. घामामुळे त्वचेवरील रोमरंध्रे (PORES) उघडतात व आतील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात त्याचबरोबर त्वचेचे उष्ण तापमान वाढते व त्वचेतील रक्तप्रवाह वाढतो, सुधारतो. यानेसुद्धा त्वचेत साठलेले अनावश्यक घटक बाहेर पडून जातात. रोमरंध्र उघडल्याने त्वचा स्वच्छ होणे याचबरोबर त्वचेवर स्निग्धांश तयार होते. (मागील लेखांमध्ये आपण वाचलेच आहे की, त्वचा बाह्य वातावरणाशी संपर्कात आल्यामुळे सर्वात बाहेरील स्तर हा मृत पेशींचा असतो आणि तो विशिष्ट कालांतराने झडून जातो व त्या ठिकाणी आतील मऊ, तुकतुकीत त्वचा बाह्य स्तरावर येते.) व्यायामानंतर रक्तप्रवाह सुधारल्याने आणि स्वेद प्रवृत्तीमुळे स्वेदाबरोबर सेबम (त्वचेतील तैलीय घटक) देखील त्वचेच्या बाह्य स्तरापर्यंत पोहोचतो. यामुळे त्वचेला स्निग्धांशाची गरज असते, ती या पद्धतीने पुरवली जाते. कोरडी त्वचा लवकर सुरकुतते, रुक्ष-खरखरीत होते, खाज येते व तुळतुळीत राहत नाही. घामामुळे आर्द्रता व स्निग्धता दोन्ही त्वचेला मुबलक प्रमाणात मिळते. त्वचेचे रंध्र मोकळे झाल्यामुळेसुद्धा त्याचा तुकतुकीत व टवटवीत दिसू लागते.

या स्थानिक फायद्याबरोबरच रक्तप्रवाह वाढल्यामुळे लवचिकता ही उत्तम राहते. मन शांत व सकारात्मक होते. व्यायामामुळे नैराश्य निघून जाते. शारीरिक हालचालीमुळे, शरीर थकते आणि शांत झोप लागते. ज्यांना झोपेच्या तक्रारी आहेत, त्यांनी शारीरिक हालचाल आवश्य करावी. झोप शांत झाल्यास, शरीर WEAR & TEARचे कार्य रात्री उत्तमरित्या करते आणि त्याचाही सकारात्मक परिणाम त्वचेच्या आरोग्यावर आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वावरदिसतो.

डोळ्याखाली वर्तुळे बर्‍याचदा अल्प निद्रा, खंडीत निद्रा इ. झोपेच्या तक्रारींमुळे दिसतात. व्यायामानंतर शांत झोप जर लागत असेल, तर हा त्रास आपोआपच नाहीसा होतो. या पद्धतीने व्यायामाचा उत्तम फायदा त्वचेचे आरोग्य टिकविण्यासाठी आणि AGEING PROCESS SLOW DOWN करण्यासाठी होतो. फक्त व्यायामानंतर एक काळजी अवश्य घ्यावी. ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांना घाम आल्यानंतर त्वचा अधिकच तेलकट झाल्यासारखी वाटते. अशा वेळेस अंघोळ व्यवस्थित करावी. शूचिर्भूत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे, नाहीतर PIMPLES (मुख दूषिका येण्याचे प्रमाण वाढू शकते. तसेच, केसांमध्ये घाम जिरु देऊ नये, अन्यथा कोंडा होणे, डोक्यात फोड येणे, केस गळणे इ. तक्रारी उद्भवू शकतात.(क्रमश:)

वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
९८२०२८६४२९
Powered By Sangraha 9.0