ग्रीन स्माईल उपक्रमात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण; डॉ. प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून झाला सोहळा

20 Aug 2023 19:56:42
Green Smile Initiative Plantation In Kalyan

कल्याण :
कल्याणच्या टिटवाळा - आंबिवली रिंगरोडवर राबवण्यात आलेल्या ग्रीन स्माईल उपक्रमाच्या माध्यमातून कल्याणकरांनी नविन इतिहास घडवला. इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याण, कल्याण संस्कृती मंच, कडोंमपा आणि आयुष हॉस्पिटलच्या माध्यमातून झालेल्या वृक्ष लागवडीसाठी पहिल्यांदाच शहरातील सामाजिक संस्था, प्रतिष्ठित नागरिक आणि सामान्य नागरिक एकत्र आले. रिंगरोडच्या टिटवाळा, आंबिवली भागात रविवारी सकाळी ग्रीन स्माईल उपक्रम राबवण्यात आला.

आगामी रौप्य महोत्सवी गुढीपाडवा स्वागतयात्रेचे समन्वयक डॉ. प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत रिंगरोडवर तब्बल २ किलोमीटरपर्यंत दोन्ही भागांत वेगवेगळ्या देशी प्रजातीच्या झाडांची रोपे लावण्यात आली. कडोंमपा आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, डीसीपी सचिन गुंजाळ, कडोंमपा घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, कल्याण संस्कृती मंच अध्यक्ष डॉ.सुश्रुत वैद्य, सचिव श्रीराम देशपांडे, खजिनदार अतुल फडके, हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय अनेक प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक संस्था यांनी उपस्थिती लावली होती. या उपक्रमात काही मुंबई, ठाण्यात स्थायिक झालेले माजी कल्याणकर नागरिक ही सहभागी झाले होते. ५ वर्षांच्या चिमुरडीपासून ते ९० वर्षांच्या आजीबाईंपर्यंत शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे कल्याणकरांनी ही सर्व झाडे स्वखर्चातून लावली आहेत . आणि झाडे जगविण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. प्रत्येक झाडाची देखभाल करण्यासाठी आयएमए कल्याणने विशेष संस्था नियुक्त केली आहे. तर रविवारी ज्या व्यक्तींनी झाडे लावली त्यांच्या नावाचे बोर्ड त्या झाडांवर लावण्यात आले आहेत. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एकता मानव वृक्ष, डॉ. आनंदी गोपाळ यांच्या नावाचा, कोविडशी लढताना मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची आठवण म्हणून आणि देश रक्षणासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांप्रति कृतज्ञता म्हणून एक अशा पाच मानाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयएमए कल्याण अध्यक्षा डॉ. ईशा पानसरे, उपाध्यक्षा डॉ.सुरेखा इटकर, सचिव विकास सुरंजे, डॉ अश्विन कक्कर, डॉ. राजेश राजू, डॉ. शुभांगी चिटणीस, डॉ. नितीन चिटणीस, डॉ. भाग्यश्री मोघे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Powered By Sangraha 9.0