रिक्षाच्या स्टेअरिंगला अनितांचे ‘भुज’बळ

20 Aug 2023 20:29:34
Article On rickshaw Driver Anita Bhujbal

डोंबिवलीच्या आद्य महिला रिक्षाचालक म्हणून ओळखल्या जाणार्‍या अनिता भुजबळ यांनी अनेकविध अडचणींवर मात करत, कौटुंबिक जबाबदार्‍यांचे पालन करत रिक्षा व्यवसाय सुरुच ठेवला. त्यांच्याविषयी...

रिक्षा व्यवसायावर पूर्वी फक्त पुरुषांची मक्तेदारी होती. परंतु, आता बर्‍याच शहरांमध्ये महिला रिक्षाचालक सहज दृष्टिपथास पडतात. डोंबिवलीच्या अनिता विलास भुजबळ यांनीही धाडस करत रिक्षाचालक म्हणून आपला प्रवास सुरु केला. अनिता जेव्हा या व्यवसायात उतरल्या, तेव्हा महिला रिक्षाचालक म्हणून त्या एकट्याच कार्यरत होत्या. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पण, त्या संकटातूनही मार्ग काढत त्या आपले काम जोमाने करीत आहेत.

अनिता यांचा जन्म सांगलीचा आणि त्यांचे दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण पुणे येथे झाले. अनिता यांचे वडील शंकर जाधव हे रिक्षा व्यावसायिक होते, तर आई घरकाम करीत असे. अनिता दहावीत असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. अनिता यांना दोन बहिणी. पितृछत्र हरपल्यानंतर अनिता या घरात मोठ्या असल्याने घरची जबाबदारी थोडीफार त्यांच्यावर आली. अनिता यांनी एका कपड्याच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली. त्यांची आई घरकाम करून आणि अनिता दुकानात काम करून घराचा उदरनिर्वाह करीत होते. त्यामुळे दोन्ही बहिणींच्या शिक्षणात अनिता यांनी खंड पडू दिला नाही. वडिलांच्या निधनानंतर कधीतरी अनिता त्यांची रिक्षा चालवून बघत असे. पण, रिक्षाकडे त्यांनी कधीही व्यवसाय म्हणून त्याकाळात पाहिले नव्हते. पुढील चार वर्षांतच अनिता यांचे लग्न ठरले. २००४ साली त्यांचा विवाह विलास भुजबळ यांच्याशी झाला आणि लग्नानंतर त्या डोंबिवलीकर झाल्या. सध्या त्या डोंबिवलीतील आजदेपाडा परिसरात वास्तव्यास आहेत.

डोंबिवलीत आल्यानंतर प्रारंभी घरी जाऊन पोळी-भाजी बनविण्याचे काम त्या करीत होत्या. त्यात त्यांना डोंबिवलीतील एका खासगी शाळेत शिपाई पदावर नोकरी मिळाली. पाच वर्षं त्यांनी शाळेत कामही केले. हे काम करीत असतानाच महिलांसाठीदेखील रिक्षा परवाना निघणार असल्याचे त्यांचे पती विलास यांनी सांगितले. अनिता यांनीही रिक्षाच्या परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज केला आणि त्यांनाही रिक्षाचालक म्हणून परवाना प्राप्त झाला. आपल्या पतीकडून रिक्षा चालविण्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. २०१७ पासून त्यांनी शाळेतील नोकरीला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ त्या रिक्षा व्यवसायात उतरल्या.

अनिता जेव्हा रिक्षाचालक म्हणून रस्त्यावर उतरल्या, त्यावेळी रिक्षाचालक म्हणून फारशा महिला कार्यरत नव्हत्या. अनिता या व्यवसायात आल्या, तेव्हा जवळ-जवळ एक ते दीड वर्षं त्या एकट्याच महिला रिक्षाचालक म्हणून डोंबिवलीत परिचित होत्या. हळूहळू महिला रिक्षाचालकांची संख्या वाढू लागली. आरती पवार, दिपाली यांसारख्या महिलादेखील रिक्षा व्यवसायात उतरू लागल्या. सध्या डोंबिवलीत २० महिला रिक्षाचालक आहेत.

अनिता यांनी रिक्षा व्यवसायाला सुरुवात केली, तेव्हा त्या सकाळी ६.३० वाजता रिक्षा घेऊन घराबाहेर पडायच्या. त्यावेळी सामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्याचे काम त्या करीत होत्या. पण, नंतरच्या काळात शाळांनी सुट्टी असली की, त्याकाळात रिक्षाच्या भाड्याचे पैसे मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना ने -आण करण्याचे काम सोडून दिले. आजही सकाळी घरातील कामे आटोपून ९.३० वाजता घरातून बाहेर पडतात आणि सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत रिक्षा चालवून घरी परततात. त्यामुळे त्यांना कुटुंबाकडेही लक्ष देता येते. अनिता यांचे पती विलास हे ‘बेस्ट’मध्ये बसचालक पदावर कार्यरत आहेत. भुजबळ दामपत्याला दोन मुले असून त्यांची मुलगी आता सेंकड इयरला आहे, तर मुलगा पाचवीत शिकत आहे.

अनिता या प्रारंभी एकमेव महिला रिक्षाचालक असल्याने, त्याकाळात त्यांना अनेक अडचणींचादेखील सामना करावा लागला. रिक्षा लाईनमध्ये त्यांना इतर रिक्षाचालक थांबून देत नव्हते. पुरूष रिक्षाचालकांकडूनही त्यांना अनेकदा हेटाळणी सहन करावी लागली. पण, तरीही अनिता यांचा रिक्षा व्यवसाय चांगला चालत होता. त्यामुळेच इतर पुरूष रिक्षाचालकांकडून जाणूनबुजून त्यांना त्रास दिला गेल्याचे अनिता सांगतात. एक महिला स्वतःच्या पायावर उभी राहू पाहत असताना समाजातून मात्र तिचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला जात होता. या कठीण काळात अनिता यांना भाजपची साथ मिळाली. भाजप ग्रामीण मंडल अध्यक्ष नंदू परब आणि भाजप ग्रामीण मंडल महिलाध्यक्षा मनीषा राणे यांनी अनिता यांना भक्कम आधार दिला अन् अनिता यांना एका रिक्षावाल्याकडून होणारा कायमचा त्रास कमी झाला.

आता महिलांसाठी वेगळे रिक्षा स्टॅण्ड द्यावी, अशी आग्रही मागणी महिला रिक्षाचालकांनी केली आहे. तसेच मीटरप्रमाणे भाडे आकारणी झाल्यास प्रवाशी आणि रिक्षाचालकांमधील वाद कमी होतील, असेही अनिता सांगतात. भविष्यात अनिता यांचा ‘तेजस्विनी’ बस चालविण्याचा मानस आहे, अशा या हिरकणीच्या पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरूण भारत’कडून शुभेच्छा!


Powered By Sangraha 9.0