हो-नाही म्हणत, अखेरीस विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत काँग्रेसने निर्णय घेतला. माजी मंत्री आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या खांद्यांवर विरोधी पक्षनेते पदाची धुरा सोपविण्यात आल्याची घोषणा बाळासाहेब थोरात यांनी केली खरी; पण यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे दिल्लीत असणे खटकणारे होते. संघटनात्मक बदल, अध्यक्ष बदलाच्या चर्चा आणि त्यात विरोधी पक्षनेत्याची निवड, या पार्श्वभूमीवर नाना पटोले दिल्लीत असणे, आगामी काळात बदलणार्या राजकीय समीकरणांची नांदी म्हणावी लागेल. विधानसभेत संख्याबळ असूनही काँग्रेसकडून नेतानिवडीसाठी केला जाणारा विलंब आणि पक्षातील अंतर्गत कुरबुरी यामुळे ही निवड पक्षासाठी प्रचंड अडचणीची अन् गुंतागुंतीची ठरली होती. आता वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदावर नेमणूक करण्यात आली असली, तरी त्यांना काम करणे म्हणावे तितके सोपे असणार नाही. प्रथम तर काँग्रेसच्या बड्या धेंडांशी जुळवून घेणं, नाना पटोले यांच्यासारख्या व्यक्तीशी पक्ष आणि संघटनेच्या बाबतीत समन्वय साधणे, विधिमंडळातील लढाईचा परिणाम रस्त्यावर दिसण्यासाठी एकत्रितपणे काम करणे, नितीन राऊत आणि इतर काही नेत्यांशी असलेले वैर बाजूला ठेवून जबाबदारी पूर्ण करावी लागणार आहे. संग्राम थोपटे यांनी उघडपणे व्यक्त केलेल्या नाराजीमुळे पक्षात धुसफूस आहे, हे तर उघड आहे. वडेट्टीवार यांच्या नियुक्तीमुळे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेला पक्षातील एक गट सक्रिय होण्याची शक्यता आहे. या निवडीसोबतच आता प्रदेशाध्यक्षपद देखील दुसर्या चेहर्याला संधी देणं, पक्षासाठी गरजेचं बनलं आहे. प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते दोन्ही ओबीसी समाजातील असणे, सामाजिक समीकरणांच्या दृष्टीने पक्षाला नुकसानदायक ठरू शकेल आणि त्याचा निश्चित मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो. या अनुषंगाने नाना पटोले यांच्यासाठीदेखील पक्षामे धोक्याची घंटा वाजली आहे. विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपदी काम करण्याचा अनुभव गाठीशी आहे, असे असले तरी पक्षांतर्गत आव्हाने अन् ‘ट्रिपल इंजिन’ सरकार समोर लढाई लढण्याची जबाबदारी, यामुळे ’विजया’ची वाट खडतरच आहे, हे निश्चित!
काँग्रेसींना गांधी टोपीचे वावडे!
स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या काँग्रेसला १३८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रदीर्घ इतिहास. स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रवादाची भूमिका घेऊन राजकारण करणार्या काँग्रेसने गांधीजींच्या मृत्यूनंतर गांधीवादाचा आधार घेऊन आपली राजकीय पोळी भाजून घेतली. आजही गांधींविषयी शष्प माहिती नसणारी काही पप्पू सावरकरांना दुषणे देताना समाधान मानताना दिसतात. पण, काल विधिमंडळाच्या पायर्यांवर घडलेल्या घटनेमुळे काँग्रेसीना गांधींचीच टोपी नकोशी झाली, असे एकंदरीत दिसून आले. बुधवारी काँग्रेस आमदार लॉबीतून पायर्यांवर जात असताना विजय वडेट्टीवार सगळ्यांना गांधी टोपी घालायला देत होते. तेव्हा माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी गांधी टोपी घालण्यास साफ नकार दिला. वडेट्टीवार यांनी राऊतांना खूप आग्रह केला, तरी टोपी घालण्यास राऊतांनी असहमती दर्शवली. सरतेशेवटी वडेट्टीवार यांनी स्वतः हाताने राऊतांच्या डोक्यावर टोपी घातली आणि अखेरीस आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी नितीन राऊत यांच्या डोक्यावर गांधी टोपी दिसून आली. गांधी टोपी न घालण्यावरून झालेल्या या कुरबुरीमुळे सदासर्वकाळ महात्मा गांधींच्या विचारांचा दाखला देत फिरणार्या काँग्रेस नेत्यांनाच गांधी टोपीचे वावडे असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. यापूर्वी एकदा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सेवाग्राममध्ये जाऊन महात्मा गांधींना अभिवादन न केल्याने मोठा वाद उठला होता. काँग्रेसने गेल्या ७५ वर्षांत गांधींच्या नावावर राजकारण करून मते मिळवली. मुळात सध्या देशात राजकारण करत असलेल्या राजकीय कुटुंबाचे मूळ शोधायचे म्हटले तर त्यांची मोठी अडचण होऊ शकते. इंदिरा गांधींचे पती फिरोज गांधी यांचे मूळ आडनाव काय हा शोध घेतला तर परिवाराची पंचाईत होईल. महात्मा गांधींनी कधी परिवारवाद आणि घरणेशाहीच्या माध्यमातून सत्ता बळकावणे आणि एककेंद्री सत्ता राबविण्याचे उद्योग केले नाही. त्यांच्या विचारांशी असहमती असेलही, तर काही भिन्न मते व्यक्त करतील, तो भाग निराळा. पण, ७५ वर्षं त्याच गांधींच्या नावे देशात राजकारण करणार्या काँग्रेसी नेत्यांना आज गांधींचा विचार आणि टोपी नकोशी झाली आहे, हीच आजच्या दुटप्पी काँग्रेसची शोकांतिका म्हणावी लागेल!