द्वारका एक्सप्रेस वेच्या बांधकामात भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवा
19 Aug 2023 19:37:16
नवी दिल्ली : देशातील अभियात्रिकी चमत्कार असलेल्या द्वारका द्रुतगती महामार्गाच्या बांधणीत १२ टक्के पैशांची बचत झाली आहे. त्यामुळे या महामार्गाच्या बांधणीत भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध करून दाखवा, असे आव्हान केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षांना दिले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी द्वारका द्रुतगती महामार्गाच्या बांधणीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. एका कार्यक्रमात ते म्हणाले, द्वारका एक्सप्रेसवे हा २९ किलोमीटरचा महामार्ग होता. मात्र, प्रत्यक्षात मार्गिकांच्या अंतरावरून हा महामार्ग ५६३ किमी एवढा होतो. यामध्ये ६ लेन बोगदा आहे. यासाठी काढण्यात आलेल्या निविदेतील दर 206 कोटी रुपये प्रति किलोमीटर इतका होता. या महामार्गाच्या बांधकामात आम्ही १२ टक्के पैसे वाचवले आहेत.
कॅगच्या अहवालानुसार द्वारका एक्स्प्रेस वे 29 किलोमीटरचा आहे, कारण त्यामध्ये बोगद्यांचे अंतर समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे आम आदमी पक्षासह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना माझे आव्हान आहे की यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध करून दाखवावे. तसे सिद्ध केल्यास ते सांगतील ते करण्यास आपण तयार असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.दरम्यान, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) अहवालामध्ये द्वारका द्रुतगती मार्गाच्या बांधकामात अधिक खर्च झाल्याचे म्हटले आहे. त्यानंतर या महामार्गाविषयी राजकीय वादास प्रारंभ झाला आहे.