ठाणे : मोदी सरकारच्या विश्वकर्मा योजनेमुळे विकासापासून वंचित राहिलेल्या कारागिरांना, गावगाड्यातील बलुतेदारांना मोठा फायदा होणार आहे. ही योजना जाहीर करून मोदी सरकारने 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास '' ही घोषणा प्रत्यक्षात आणली आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष संजय वाघुले यांनी केले आहे. या योजनेबद्दल वाघुले यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे.
संजय वाघुले यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘पंतप्रधान विश्वकर्मा योजना’ सुरू करण्याची घोषणा केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने १६ ऑगस्ट रोजी १३ हजार कोटी खर्चाच्या या योजनेला मंजुरी दिली. समाजातील वंचित स्तरांमध्ये मजुरी आणि कारागिरी करणाऱ्या ३० लाख कारागिरांना या योजनेचा लाभ मिळणार असून या योजनेत १८ व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. कारागिरांना व शिल्पकारांना विश्वकर्मा प्रमाणपत्र तसेच, ओळखपत्र देण्यात येईल. साधनांच्या मदतीने काम करणारे हस्त-कलाकार आणि कारागिरांची गुरु-शिष्य परंपरा, त्यांच्या कुटुंबाची पारंपरिक कौशल्य जोपासणे आणि त्याला बळकटी देणे, हेही या योजनेचे उद्दिष्ट आहे.
या योजनेत कारागिरांना, शिल्पकारांना प्रथम टप्प्यात एक लाख रूपये, द्वितीय टप्प्यात दोन लाख रूपये फक्त ५ टक्के व्याजदराने उपलब्ध करण्यात येणार आहेत. कारागिरांना त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक साहित्य, तांत्रिक, आधुनिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षण, डिजिटल व्यवहारासाठी तांत्रिक साहाय्य या योजनेद्वारे केले जाणार आहे. सुतार, नाव बांधणारे कारागीर, औजार बनवणारे कारागीर आदींना या योजनेचा लाभ मिळणार आहे, असेही वाघुले यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
या कारागिरांना मिळणार लाभ
१) सुतार २) होडी बांधणी कारागीर ३) चिलखत आदी अस्त्र बनवणारे ४) लोहार ५) हातोडी आणि अवजार संच बनवणारे ६)कुलूप बनवणारे ७) सोनार ८) कुंभार ९) शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम), पाथरवट (दगड फोडणारे) १०) चर्मकार (पादत्राणे कारागीर) ११) मेस्त्री १२) टोपल्या/चटया /झाडू/ कॉयर साहित्य कारागीर १३) बाहुल्या आणि खेळणी (पारंपरिक) बनवणारे १४) नाभिक (केश कर्तनकार) १५) फुलांचे हार बनवणारे कलाकार १६) परीट (धोबी) १७) शिंपी १८) मासेमारी साठीचे जाळे विणणारे.