पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणाची सुरुवात करत असताना, ‘मेरे प्यारे देशवासीयों’ या शब्दाने करीत असत. यावेळी मात्र ९० मिनिटांच्या भाषणात ‘मेरे प्यारे परिवारजनों’ या शब्दांचा उपयोग केला. ’मेरे प्यारे भाई और बहनों’ या शब्दांऐवजी ‘मेरे प्यारे परिवारजनों’ या नव्या शब्दांचा उपयोग त्यांनी केला. नरेंद्र मोदींनी केलेला हा बदल अतिशय काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक केलेला आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून देशाला संबोधन करणारे पंतप्रधानांचे भाषण होते. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ही प्रथा सुरू झाली आहे. यावेळचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेले दहावे भाषण होते. लाल किल्ल्यावरील भाषण दरवर्षी होत असल्यामुळे ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे दरवर्षीच्या त्याच-त्याच घटनेची उत्सुकता फार राहत नाही. पंतप्रधान मोदी यांच्या यावेळीच्या भाषणाची मात्र देशाला उत्सुकता होती. त्याची दोन कारणे होती.
पहिले कारण संसदेत त्यांच्या शासनाविरुद्ध काँग्रेसने अविश्वासाचा ठराव आणला होता. पंतप्रधानांचे शेवटी भाषण झाले. या भाषणात त्यांनी सर्व विरोधी पक्षांचे पूर्ण वस्त्रहरण करून टाकले. स्वातंत्र्य दिनापूर्वी हे भाषण झाले असल्यामुळे पंतप्रधान मोदी काय बोलणार, असा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान कशा प्रकारे विषय मांडणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणाची सुरुवात करत असताना, ‘मेरे प्यारे देशवासीयों’ या शब्दाने करीत असत. यावेळी मात्र ९० मिनिटांच्या भाषणात ‘मेरे प्यारे परिवारजनों’ या शब्दांचा उपयोग केला. ’मेरे प्यारे भाई और बहनों’ या शब्दांऐवजी ‘मेरे प्यारे परिवारजनों’ या नव्या शब्दांचा उपयोग त्यांनी केला. नरेंद्र मोदींनी केलेला हा बदल अतिशय काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक केलेला आहे. ‘मेरे प्यारे परिवारजनों’ याचे दोन महत्त्वाचे अर्थ होतात. पहिला अर्थ असा की, “मी तुमच्या परिवारातील एक सदस्य आहे, मी कुणी बाहेरचा नाही. तुमचे आणि माझे आत्मीय संबंध आहेत.’ त्यांच्या भाषणातील वाक्य असे आहे, ‘मैं आपसे आया हूं, आपके लिए जीता हूं, आपके लिए सपने देखता हूं और अगर मैं पसीना भी बहाता हूं तो आपके लिए, मैं ऐसा इसलिए नहीं करता क्योंकी आपने मुझे जिम्मेदारी दी है लेकिन ऐसा इसलिए है क्योंकी आप मेरा परिवार हैं और मैं आपको दुखी नहीं देख सकता, या आपके सपने टूटते नहीं देख सकता। मैं चाहता हूं की आपके सपने सच हों और मैंने आपके साथ रहने का संकल्प लिया हैं।”
आपला देश भावनाप्रधान देश आहे. विवेकनिष्ठ व्हा, बुद्धिवादी व्हा वगैरे उपदेश ऐकायला गोड असतात. परंतु, आपला स्वभाव त्यामुळे बदलत नाही. पाश्चात्य माणूस परिवारवादी नसतो. पारिवारिक बंध त्याला बांधून ठेवत नाहीत. प्रत्येकजण एकांडा शिलेदार असतो. ’शेरलॉक होम’ ही गाजलेली मालिका आहे. नायक शेरलॉक त्याचा मित्र डॉ. वॉटसन, इन्स्पेक्टर लेस्ट्रेड आणि कथानकातील बहुतांश पात्रे स्वतंत्र जीवन जगणारी आहेत. आपले नेमके उलटे असते. आई, वडील, बहीण, भाऊ, काका, मामी, आत्या अशा सर्वांचा मिळून एक परिवार तयार होतो. रक्ताचं नातं सोडून अन्य कुणाला परिवाराचं सदस्य होता येत नाही. नरेंद्र मोदी या रक्ताच्या नात्याच्या पलीकडे जाऊन देशातील प्रत्येक परिवाराचे सदस्य होऊ इच्छितात. तुमच्या सर्व सुखदुःखात मी सहभागी असतो. तुमचे सुख हे माझे सुख, तुमचे दुःख हे माझे दुःख, या समरस भावनेने ते प्रत्येक परिवाराशी समरस होऊ इच्छितात.
‘मेरे प्यारे परिवारजनों’ याचा दुसरा अर्थ असा होतो की, भारत हा देश १४० कोटी लोकांनी बनलेल्या कोट्यवधी परिवारांचा देश आहे. हा देश तुमच्या सर्वांचा देश आहे. कोणत्याही एका परिवाराचा हा देश नाही. कोणत्याही चार-दोन परिवाराचा हा देश नाही. आपल्या देशात परिवारवादाने पक्ष चालतात. काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत परिवारवादावर चालणारे पक्ष आहेत. त्या सर्वांची नावे वाचकांना माहीत आहेत. त्यावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, “आज ‘परिवारवाद’ और तुष्टीकरण ने हमारे देश को बर्बाद कर दिया हैं। किसी राजनीतिक दल का प्रभारी केवल एक ही परिवार कैसे हो सकता हैं? उनके लिए उनका जीवन मंत्र हैं-परिवार की पार्टी। परिवार द्वारा और परिवार के लिए। हमारे देश का दुर्भाग्य हैं की, यह उन राजनीतिक दलों से त्रस्त हैं जिन्होंने परिवार का परिवार के लिए और परिवारद्वारा के सिद्धांत पर काम किया हैं। उन्होंने कहा, कुछ पार्टीयों की तुष्टीकरण की नीतीयों ने देश के विकास को बर्बाद कर दिया हैं। भ्रष्टाचार बर्दाश्त नहीं किया जाना चाहिए। अब यह खत्म करना हमारा कर्तव्य हैं।”
‘मेरे प्यारे परिवारजनों’ या संबोधनातून नरेंंद्र मोदी यांना हे सूचवायचे आहे की, आपला देश दोन-चार परिवारांच्या कल्याणासाठी चालवायचा नसून, आपला देश देशातील सर्व परिवारांच्या कल्याणासाठी चालवायचा आहे. परिवार म्हणजे घराणेशाही लोकशाहीला मारक आहे, हा झाला सैद्धांतिक विचार. सामान्य माणसाला तो समजत नाही. सामान्य माणसाला हे समजते की, राजकारणातील परिवारवाद अन्य सर्व परिवारांच्या विकासाला घातक आहे. एखादी गोष्ट सिद्धांतता कशी वाईट आहे, हे जसे सांगता येते, तसे ही गोष्ट तुमच्या परिवाराला कशी घातक आहे, याप्रकारेदेखील सांगता येते. दुसरा प्रकार अतिशय प्रभावी असतो.
नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सरकार बनविण्याचे सर्व श्रेय भारतातील परिवाराला दिले. त्यांनी चार इंग्रजी शब्दांचा उपयोग केला. ‘फॉर्म’, ‘रिफॉर्म’, ’ट्रान्सफॉर्म’, ‘परफॉर्म.’ मोदी म्हणाले की, ”सरकार बदलल्यानंतर सुधारणा सुरू करण्यात आल्या, नोकरशाहीने या सुधारणा कार्यान्वित करायला सुरूवात केली. नंतर त्याचे परिणाम दिसू लागले.” मोदींना हे सांगायचे आहे की, मी तुमच्या परिवाराचा एक सदस्य आहे. परिवाराच्या सदस्यावर तुम्ही जबाबदारी टाकली, ती जबाबदारी मी स्वीकारली आणि काम करू लागलो. आजच्या ९० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत काय केले, हे सांगितले.
या सर्व परिवारांना त्यांनी आवाहन केले की, देशाच्या इतिहासात एखादा कालखंड असा येतो की, या कालखंडात आपण जे काही करू, त्याचे परिणाम पुढील हजार वर्षे राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या परिवारजनांना एक स्पष्ट संदेश द्यायचा आहे की, पुढील वर्षी निवडणुका आहेत. या निवडणूक पर्वात तुम्ही जे काही कराल, त्याचे परिणाम एक हजार वर्षांसाठी होणार आहेत.आपल्या देशाला एक हजार वर्षांचे पारतंत्र्य का आले? कुठलातरी एक राजा लढाई हरतो आणि बघता-बघता देश पारतंत्र्यात जातो. यासाठी गाफिल राहता कामा नये. सतत जागरूक असले पाहिजे. आपण जागरूक राहिलो, तरच देश प्रगती करील. एक हजार वर्षांच्या पारतंत्र्याची पुनरावृत्ती नको. आता पुढील एक हजार वर्षांसाठी पराक्रमाची आपल्याला शर्थ करायची आहे, हेच त्यांनी थोडया वेगळ्या भाषेत मांंडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लाल किल्ल्यावरील भाषण ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या सत्रात मोडणारे नाही. पुढील वर्षी होणार्या निवडणुकांची विषयसूची तर यात आहेच. परंतु, त्यापेक्षा भावनिक बंध अधिक महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश स्पष्ट आहे. आपला देश १४० कोटी लोकांच्या परिवाराचा देश आहे. या सर्व परिवारांशी मोदी आत्मीयतेचे संबंध जोडू इच्छितात.परंतु, प्रश्न असा आहे की, तेवढे पुरेसे आहे का? त्याचे उत्तर असे की, तेवढे पुरेसे नाही. केवळ राम आल्याशिवाय राहून चालत नाही. रामाचा संदेश बरोबर नेण्यासाठी वानरसेना लागते. वानरसेना याचा अर्थ वाचक शब्दशः घेणार नाही, अशी आशा करतो. वानरसेना याचा अर्थ कार्यकर्त्यांची सेना तीदेखील मोदींप्रमाणे सक्रिय असली पाहिजे. राजकारण हा सत्तेचा खेळ असतो, प्रत्येकाला सत्तेची पदे हवी असतात. सत्ता कशासाठी, याचा विचार जो करतो, त्याचे नाव असते-नरेंद्र मोदी. त्यातील थोडासा अंश सर्व कार्यकर्त्यांनी आपल्यामध्ये उतरवला पाहिजे. २०२४चे लाल किल्ल्यावरून भाषण मोदींचेच व्हायचे असेल, तर ज्याप्रमाणे ‘हर घर तिरंगा’ ही घोषणा आपण करतो, त्याप्रमाणे ’हर घर मोदी’ याचे क्रियान्वयन केले पाहिजे.