मुंबई : 'पॉलिसी ऍडव्होकसी रिसर्च सेंटर' (PARC) या संस्थेतील वन्यजीव संशोधक ओंकार पाटील आणि ह्रशिकेष वाघ यांनी लिहिलेल्या मुंबईतील पाणमांजराविषयीची केस स्टडी 'आंतरराष्ट्रीय ऑटर सर्व्हायवल फंड्स'च्या (IOSF) नियतकालिकामध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. गतवर्षी दादर परिसरात आढळलेल्या पाणमांजराविषयीचे विश्लेषण यामध्ये करण्यात आले आहे.
नोव्हंबर २०२२ मध्ये दादर पूर्व येथील कोहिनूर मिल्सच्या आवारात एक पाणमांजर आढळून आले होते. ही माहिती मिळताच पार्कच्या संशोधकांनी संशोधन करायला सुरूवात केली होती. या संशोधनामध्ये स्थानिकांच्या माहितीनुसार पाणमांजर असल्याची खात्री झाली. परिसरात कॅमेरा ट्रॅपींग केल्यानंतर त्या भागात नर पाणमांजर वास्तव्यास असल्याचे लक्षात आले. डिसेंबर २०२२ मध्ये रस्त्यावर इतस्तः फिरत असलेल्या या पाणमांजराला रेस्क्यू करण्यासाठी महाराष्ट्र वन विभागाचा चमू आणि स्थानिक संस्थांचे स्वयंसेवक आले होते. मात्र, अनेक पिंजरे लावुनही हे पाणमांजर कैद झाले नाही.
त्यानंतर त्याला पकडण्यासाठी जाळ्यांचाही वापर करण्यात आला. कुणाच्याही हाती न आलेले हे पाणमांजर अखेर एका रिकाम्या घरात शिरले. पुढे बचाव कार्यादरम्यान या पाणमांजराचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईतील गजबजलेल्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या या पाणमांजराची कहाणी आणि त्याचा संशोधन अहवाल पाणमांजरासाठी कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या नियतकालिकामध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
“पाणमांजरासारखे बरेच वन्यजीव अवैध वन्यजीव तस्करीचे बळी पडत आहेत. वन्यजीवांचा तस्करीच्या सिंडिकेटवर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. त्याच बरोबर पाणमांजरासारख्या चपळ प्राण्यांना सुखरुप रेस्क्यू करणाऱ्या प्रोटोकॉल्सची गरज आहे.”
- ओंकार पाटील
वन्यजीव संशोधक, पॉलिसी ऍडव्होकसी रिसर्च सेंटर
“वन्यजीवांच्या अवैध व्यापारामुळे दुर्मिळ वन्यजीव प्रजाती व त्यांच्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांचे व्यावसायिक मूल्य वाढले आहे. कारण, दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये त्यांची मागणी वाढत आहे. विशेषतः लहान सस्तन प्राण्यांची तस्करी रोकण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या समस्येवर उपाय करण्यासाठी धोरणात्मक बदलाची गरज आहे.”
- ह्रशिकेष वाघ
वन्यजीव संशोधक, पॉलिसी ऍडव्होकसी रिसर्च सेंटर