पुणे : प्री इंडिपेंडंन्स डे पार्टीच्या नावाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान करीत आक्षेपार्ह नृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात संबंधित कलाकार आणि आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 14 ऑगस्ट रोजी रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान कोरेगाव पार्क येथील हॉटेल फ्रॅक सुपर क्लबमध्ये घडला.
शांती पिपल्स या ग्रुपची मुख्य कलाकार उमा शांती उर्फ जियापिहा लॅरीना आणि आयोजक कार्तिक मोरे (रा. औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राष्ट्रप्रतिष्ठा अवमान प्रतिबंधक अधिनियम 1971 चे कलम 2, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 110, 117 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार तानाजी दादासाहेब देशमुख यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा येथील कोरेगाव पार्क अॅनेक्स रोड या ठिकाणी पिरामिड कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या हॉटेल फ्रॅक सुपर क्लबमध्ये प्री इंडिपेंडेंस डेच्या नावाखाली पार्टी आयोजित करण्यात आलेली होती. कार्तिक मोरे याने रियल स्टोरी आस्थापनेमार्फत ही पार्टी आयोजित केलेली होती. या कार्यक्रमादरम्यान शांती पीपल म्युझिक बँडला मनोरंजन करण्यासाठी बोलावण्यात आलेले होते. या बँडची मुख्य कलाकार उमा शांती उर्फ जियापिहा लॅरीना हिने मंचावर नृत्य करीत असताना दोन्ही हातामध्ये दोन भारतीय राष्ट्रध्वज घेतले. ते अस्ताव्यस्तपणे आणि विचित्र पद्धतीने फिरवून नृत्य केले.
त्यानंतर मंचासमोर नाचत असलेल्या लोकांमध्ये हे दोन्ही राष्ट्रध्वज अपमानकारक भिरकावून राष्ट्रध्वजाचा अवमान करीत ध्वज संहितेचा भंग केला. त्यानंतर हातवारे करून असभ्यपणाचे वर्तन केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जोरे करीत आहेत.