मराठवाड्यात पुन्हा दुष्काळ पडणार? जायकवाडी धरणात केवळ ३४ टक्के पाणीसाठा

    16-Aug-2023
Total Views |

jayakwadi dam


छत्रपती संभाजीनगर :
यावर्षी आधीच पावसाचे आगमन उशीरा झाले असताना त्यात आता अर्धा ऑगस्ट महिना उलटून गेल्यानंतरही अनेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. त्यातच मराठवाड्यातील जायकवाडी धरणात केवळ ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे मराठवाड्यावर चिंतेचे सावट ओढवले आहे.
 
यावर्षी जुलै महिन्यात पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी तर केली परंतू, त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचे १५ दिवस उलटल्यानंतरही अनेक भागांत पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पिकं कोरडी पडायला सुरुवात झाली आहे. त्यातच मराठवाड्यातही अजूनपर्यंत पुरेसा पाऊस पडलेला नाही.
 
मराठवाड्याची तहान भागावणाऱ्या जायकवाडी धरणात ३४ टक्केच पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आधीच दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या मराठवाडा विभागात यंदाही दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे जायकवाडी धरणात मागील वर्षी याच दिवशी ९४.९९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे यावर्षी दमदार पाऊस न झाल्यास या भागातील परिस्थिती कठिण होऊ शकते. या परिस्थितीत आता सर्वांजण पावसाची आतूरतेने वाट बघत आहेत.