राष्ट्रवादीतील बंडाळी आणि दादांनी उचलेल्या पावलांमुळे महाविकास आघाडीला जबरदस्त मोठा धक्का बसला. दादांच्या रुपाने मैदाने गाजवणारा आणि विधिमंडळातही विरोधकांवर टीका करण्याची क्षमता असणारा नेता आघाडीने गमावला. दादांच्या बंडानंतर थोरल्या पवारांनी बंडखोरांविरोधात कोणतीही आक्रमक भूमिका घेतली नाही. कारवाईची पोकळ घोषणा केली; पण प्रत्यक्षात काहीही घडलं नाही. त्यात काका-पुतण्यात महिनाभरात चार बैठका झाल्या असून, या बैठकांमुळे मविआत अस्वस्थता आणि पवारांविषयी अविश्वास बळावला. दोन्ही पवारांमध्ये झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंमध्ये चर्चा झाली असून, पवारांना वगळून नवी समीकरणे जुळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्यांचे अचानक आक्रमक होणे, विजय वडेट्टीवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद गेल्यापासून विधिमंडळात काँग्रेस आमदारांनी आक्रमक भूमिका मांडणे, काँग्रेस नेत्यांचे सुरू झालेले दौरे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या जागांवर दावा ठोकणे, यातून काँग्रेसची पुढची दिशा काय असेल, हे स्पष्ट होते. पृथ्वीराज चव्हाण यांचे आक्रमक होणे, अशोक चव्हाणांनी शरद पवारांना लक्ष्य करून वक्तव्ये करणे, या गोष्टी बरंच काही सांगतात. ठाकरे गटानेही आपली पावलं हळूहळू टाकत थेट पवारांवर शरद’संधान’ साधायला सुरुवात केली आहे.’सामना’तून भीष्म पितामह यांच्याकडून, अशी वागणूक अपेक्षित नाही, असे संबोधून आपण आता पवारांच्या ताटाखालचे मांजर नाही, असे दाखवला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे आणि पवारांच्या बंद झालेल्या भेटीगाठी आणि चर्चा यामागे पवारांची कमी झालेली विश्वासार्हता आणि सहयोगी पक्षांना ऐनवेळी धोका देण्याची पद्धत ही कारणे मुख्यत्वे मानली जातात. यासोबतच वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांची पवारांमुळे रखडलेली ‘एंट्री’ जर येत्या काळात झाली, तर पवारांना बाजूला सारून महाविकास आघाडी नव्या समीकरणांसह निवडणुकीत उतरली, तर नवल वाटायला नको. त्यामुळे कधीकाळी महाविकास आघाडीचे जन्मदाते असलेल्या पवारांनाच आघाडीतून वगळण्यासाठी धडपड सुरू झाली आहे, हे पवारांसाठीच क्लेशदायक आहे.
काँग्रेसच्या फुकाच्या बाता !
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळल्यापासून अनेक विधाने, दावे करत राज्याचे लक्ष स्वत:कडे वेधण्याचा ते प्रयत्न करत आहेत. काल त्यांनी अजितदादा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदर्भात मुख्यमंत्रिपदाचा दाखल देत केलेल्या विधानातून काँग्रेस नेते प्रसिद्धीसाठी कुठल्या थराला जाऊ शकतात, याचा पुरेपूर अंदाज राज्याला आला. “पंतप्रधान मोदींनी एकाच अटीवर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही पवारांना सोबत आणत असाल, तरच तुम्हाला मुख्यमंत्री करता येईल,” असे पंतप्रधानांनी अजितदादांना सांगितल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. आता क्षणभरासाठी जरी आपण ही गोष्ट मान्य केली, तरी राज्याच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेता निवडताना ज्या पक्षाच्या नाकी नऊ आले, त्या पक्षाला मुख्यमंत्रिपदाबाबत असली विधाने करण्याचा हक्क आहे का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो. महायुतीत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सामील झालेले अजित पवार हे उद्धव ठाकरेंसारखे अचानक राजकारणात आलेले नेते नाहीत किंवा राहुल गांधींसारखे अनेकदा ’लॉचिंग’ करूनही अपयशी ठरलेले लादलेले युवराजची नाहीत. शरद पवारांचे पुतणे असण्याव्यतिरिक्त आपली स्वतःची ओळख आणि दबदबा निर्माण करून लोकप्रियता मिळवलेले नेते म्हणून दादांची प्रतिमा आहे. पवारांनी दिल्लीत बस्तान बसवल्यानंतर राज्याची जबाबदारी दादांवर देण्यात आली आणि त्यांनीही ती खुबीने निभावली. त्यामुळे आधीच मुख्यमंत्रिपदावर असलेल्या एकनाथ शिंदेंना बाजूला करून आपल्याला मुख्यमंत्री करण्याची अवास्तव मागणी अजित पवारांसारखा मुरब्बी नेता करेल का? याचं उत्तर राज्यातील सामान्य कार्यकर्त्यालाही कळू शकतं. आज महायुती भक्कमपणे फडणवीस-शिंदे आणि अजितदादांच्या नेतृत्वात मार्गक्रमण करत आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी एकमेकांच्या पायात पाय घालून त्रांगडे सोडवण्याच्या प्रयत्नात अडकली आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाने थोरल्या पवारांना दुर्लक्षित करण्यास सुरुवात केल्यानंतर आता काँग्रेसचे लक्ष महायुतीकडे आहे आणि या प्रयत्नांमधूनच काँग्रेस नेते फुकाच्या बाता मारत आहेत, हेच या वक्तव्यांचे सार...