वन्यजीव उपवनसंरक्षक आणि ‘आयर्नमॅन’

16 Aug 2023 21:51:38
Article On Ironman Tushar Chavhan

अभ्यास आणि खेळ या दोन्हींमध्ये उत्तुंग यश संपादन करणार्‍या, प्रशासकीय सेवेत कार्यरत असूनही नुकताच ‘ट्रायथलॉन’ म्हणून ‘आयर्नमॅन’ हा किताब पटकाविलेल्या तुषार चव्हाण यांच्याविषयी...

पुण्यातील सध्याचे वन्यजीव उपवनसंरक्षक आणि नुकताच ’आयएफएस’मधील पहिलाच ‘आयर्नमॅन’ हा किताब पटकावणार्‍या तुषार चव्हाण यांचा जन्म सांगलीतील इस्लामपूरचा. त्यांचं बालपण सातार्‍यातील रहिमतपूर येथे गेलं. याच गावी ’पंचक्रोशी शिक्षण संस्थे’मध्ये त्यांचे वडील प्राध्यापकाच्या नोकरीवर असल्यामुळे तुषार यांचे प्राथमिकपासून बारावीपर्यंतचे शिक्षण तिथेच पूर्ण झाले. शालेय वयापासूनच अगदी हुशार असलेल्या तुषार यांनी वर्गातील पहिला क्रमांक कधीच सोडला नाही. शिक्षणाइतकीच खेळातही लहान वयापासूनच त्यांना गती होती. मात्र, शिक्षणाला प्रथम प्राधान्य द्यावं, हे बालमनावर बिंबवलेलं असल्यामुळे त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाकडेच लक्ष केंद्रित केलं. दहावी आणि बारावीतील घवघवीत यशप्राप्तीनंतर त्यांनी राहुरी विद्यापीठात ‘अ‍ॅग्रीकल्चर इंजिनिअरिंग’मध्ये ’बीटेक’ पूर्ण केले.

’बीटेक’नंतर ’इंडियन काऊंसिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चर रिसर्च’ची मास्टर्ससाठीची प्रवेश परीक्षा दिली आणि मुळातच हुशार असलेल्या तुषार यांना शिष्यवृत्तीसह प्रवेश मिळाला. या परीक्षेत त्यांनी देशभरातून पहिला क्रमांक मिळवला आणि ते प्रशिक्षणासाठी दिल्लीला गेले. दिल्लीमधील ‘इंडियन अ‍ॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट’ मध्ये त्यांची निवड झाली आणि ’मास्टर्स इन वॉटर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी’ या विषयात ‘मास्टर्स’ झाले. पुढे त्यांनी ‘युपीएससी’ करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात ते मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेही. मात्र, अवघ्या काही गुणांनी मागे राहिलेल्या तुषार यांनी निराश न होता, पुन्हा एकदा २०१२ मध्ये ‘युपीएससी’ची परीक्षा दिली आणि या परीक्षेतही भारतात सहावा क्रमांक पटकावला. पर्यावरणासाठी काम करण्याची पहिल्यापासून इच्छा असल्यामुळे त्यांनी ’आयएफएस’ म्हणजेच ’इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस’मध्ये काम करण्याचे निश्चित केले आणि त्यांना ‘महाराष्ट्र कॅडर’ मिळाले. गोंदिया जिल्ह्यात ’एसीएफ’ म्हणून सुरू केलेला प्रवास, त्यानंतर गडचिरोली आणि नाशिकचे ’डीसीएफ’ आणि सध्या पुण्यामध्ये ‘डीसीएफ’ म्हणून ते कार्यरत आहेत.

नोकरी सुरू असतानाही त्यांची क्रीडा क्षेत्रातील तयारी सुरूच होती. बालपणापासूनचं खेळाचंही पोषक वातावरण मिळाले असल्यामुळे नोकरीदरम्यान, त्यांचे विविध खेळात सहभागी होणे आणि त्यासाठीचा सराव सुरूच होता. शालेय वयात त्यांनी खेळात अनेक बक्षिसे ही मिळवली आहेत. ’आयआरआय’मध्ये राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत बास्केटबॉलमध्ये सुवर्ण पदक मिळाले. “मी सुरुवातीपासूनच अनेक खेळ खेळायचो. क्रिकेटमध्ये मी फारसा कधी रस घेतला नाही. पण, या विविध खेळांचा मला ’आयर्नमॅन’ स्पर्धेत मात्र खूप फायदा झाला,” असे ते सांगतात. नाशिकमध्ये काम करताना त्यांनी पहिल्यांदाच मॅरेथॉनमध्ये धावायला सुरुवात केली, त्याचबरोबर सायकलिंग करण्याला सुरुवात झाली. पुण्यात बदली झाल्यानंतर पुढे काय करावं, असा विचार त्यांच्या मनात घोळत होता. अभ्यासक्रम आणि शिक्षणात तर चांगली कामगिरी झाली, त्यानंतर करिअरमध्येही चांगली उंची संपादन केली. आता आणखी काय करावं, असा विचार सुरू असतानाच क्रीडा क्षेत्रात काहीतरी करावं, असं त्यांना वाटू लागलं.

मग तुषार यांनी ’आयर्नमॅन’ स्पर्धेत सहभाग घ्यावा, यासाठी त्यांना त्यांच्या बायकोनेही प्रेरणा दिली, असेही ते आवर्जून सांगतात. या स्पर्धेच्या तयारी आणि सरावावेळी त्यांच्या आहाराकडे बायकोने विशेष लक्ष दिले. तुषार यांच्याच शब्दात सांगायचे तर त्यांच्या बायकोने आहारतज्ज्ञाची भूमिका उत्तम पार पाडली. तुषार यांना पोहता सुरुवातीपासूनच येत होतं; मात्र प्रशिक्षण घेऊन योग्य तांत्रिक पद्धतीही त्यांनी शिकून घेतल्या. पुढे जानेवारी २०२३ मध्ये ’आयर्नमॅन’ स्पर्धेची तयारी त्यांनी सुरू केली. सतीश ननावरे हे ’आयर्नमॅन’ स्पर्धेची तयारी करून घेणारे त्यांचे प्रशिक्षक होते. दररोज सकाळी दोन तास वर्कआऊट, त्यानंतर नोकरी आणि पुन्हा संध्याकाळी एक तास वर्कआऊट असा त्यांचा दिनक्रम. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी ‘लाँग वर्कआऊट’मध्ये पाच ते सहा तास सलग व्यायाम आणि इतर प्रकारांचा सराव ते करत असत. या प्रदीर्घ मेहनतीचं फळ म्हणून त्यांना कझाकिस्तानमध्ये झालेल्या ’आयर्नमॅन’ स्पर्धेमध्ये १८० किमी सायकल, ४२ किमी धावणे आणि चार किलोमीटर पोहणे, असे सलग १५ तासांत पूर्ण करून हा किताब मिळवला.

क्रिकेट वगळता इतर जवळजवळ सगळेच खेळ खेळण्याचा अनुभव असलेले तुषार आपल्याकडे खेळांना फार महत्त्व दिले जात नाही, याबद्दल मात्र खंत व्यक्त करतात. माणूस सलग १८० किमी सायकल चालवू शकतो, यावर लोकांचा विश्वासच बसत नाही, याविषयी जनजागृती करण्याची तरुणांना यासाठी प्रेरित करण्याची नितांत गरज आहे, असे ते सांगतात आणि हेच काम पुढे आवर्जून करेन, असा विश्वास व्यक्त करणार्‍या तुषार यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरूण भारत’तर्फे शुभेच्छा!
 
Powered By Sangraha 9.0