पुणे : पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काल मध्यरात्री पुण्यातील मंगला टॉकीजसमोर कोयते व तलवारीने वार करत एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. १० ते १२ जणांच्या टोळीने मिळून ही हत्या केली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
एक तरुण चित्रपट पाहून चित्रपटगृहाच्या बाहेर पडला. त्यावेळी १० ते १२ जणांच्या टोळीने त्याला घेरले आणि तलवार व कोयत्याने त्याच्यावर वार केले. त्यानंतर दगडाने ठेचून त्याची हत्या केली. मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
नितीन म्हस्के असे मृत तरुणाचे नाव असून पूर्ववैमनस्यातून त्याची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी कोरेगाव पार्कमध्ये कुठल्यातरी कारणावरून नितीन म्हस्के याचे या आरोपींसोबत भांडण झाले होते. यावेळी आरोपीपैकी एकावर नितीनने हल्ला केला होता. या सगळ्याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी म्हास्केचा खून करायचे ठरवले.
चित्रपट बघून नितीन बाहेर पडताच त्याच्यावर कोयते, काठ्या व तलवारीने वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नितीनचा जागीच मृत्यू झाला. सागर कोळणटी, मलिक कोल्या, इम्रान शेख, पंडित कांबळे, विवेक नवघर, लॉरेन्स पिल्ले, सुशील सुर्यवंशी, बाबा आवले, आकाश गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.