मुंबई (समृद्धी ढमाले): ‘पर्यावरण दक्षता मंडळ’ आणि ‘ठाणे महानगरपालिका’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माझा तलाव’ मोहिमेचे मंगळवार दि.१५ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ ते १२ या वेळेत आयोजित केलेल्या या मोहिमेमध्ये ठाणेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
पर्यावरण दक्षता मंडळाचे सदस्य आणि काही स्वयंसेवकांनी ठाण्यातील २९ तलावांना भेट दिली. या प्रत्येक तलावावर एक ते दोन स्वयंसेवक मोहिमेचे बॅनर घेऊन उपस्थीत होते. तलावावर फिरायला येणाऱ्या, तेथे राहणाऱ्या किंवा बाजूने चालत असणाऱ्या लोकांमध्ये तलावांबद्दल जनजागृती व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाची सुरूवात आयुक्त अभिजीत बांगर यांच्यातर्फे मासुंदा तलावावर झाली.
या मोहिमेत मो. ह. विद्यालय, भगवती विद्यालय, गोएंका शाळा, वसंत विहार शाळा, एसव्हीपीएम शाळा आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्नीक कॉलेज यांनी सहभाग घेतला होता. या मोहिमेमध्ये १३० स्वयंसेवक आणि भेट देणाऱ्या व्यक्ती अशा तब्बल १००० पेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवुन हा विषय समजून घेतला.
'माझा तलाव' संकल्पना 'पर्यावरण दक्षता मंडळा'चे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांची आहे. त्यांना पर्यावरण दक्षता मंडळाने आणि जागरूक ठाणेकरांनी मोलाची साथ दिली. नूतन बांदेकर या ठाणे महानगरपालिका शाळेतील शिक्षेकेने 'मुक्काम पोस्ट तलाव' हे पुस्तक 15 फेब्रुवारी 2023 रोजी प्रकाशित केले होते. त्यानंतर बरोबर ६ महिन्यांनी 'माझा तलाव मोहिमेची' पहिला जनजागृती कार्यक्रम पार पडला.
“पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'माझा तलाव' मोहिमेला खूप छान प्रतिसाद मिळाला. आपल्या देशाच्या पुढच्या पिढीच्या मनात तलावाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी, त्यांनी तेथील जैवविविधता जाणून घ्यावी आणि त्यामुळे त्या तलावांचे केवळ सुशोभीकरण न होता संवर्धन देखील व्हावे या उद्देशाने आपण ही मोहीम सुरू केली आहे.
- सुरभि वालावलकर ठोसर,
पर्यावरण दक्षता मंडळ
“आज हा सगळा उत्साह आणि उत्सव पाहून मन भरून आलंय, डोळे पाणावलेत. १ जानेवारी २०२२ रोजी 'एकला चालो रे' म्हणत तलावांची शोध मोहीम सुरू करताना, ती अशी व्यापक होईल याची कल्पना नव्हती. पण पर्यावरण दक्षता मंडळ आणि तुम्ही सारे पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी मंडळींनी माझ्या विचारांना मूर्त रूप देण्यासाठी पुढे आलात, त्यामुळेच आज आपण सर्वांनी मिळून एक नव्याने 'माझा तलाव' मोहीम सुरू केली. आजचा दिवस माझ्यासाठी संस्मरणीय झाला आहे. त्यासाठी वालावलकर कुटुंबीय आणि 'माझा तलाव' परिवार, तुम्हा सर्वांचे अभिनंदन आणि मनस्वी आभार मानावेसे वाटतात. ही सुरुवात म्हणजे माझा तलावचं रोपटं आपण लावत आहोत, त्याचा डेरेदार वटवृक्ष होईल अशी अपेक्षा आहे. पुढच्या पिढीच्या मनात आपण हे रुजवूया आणि जोपासूया. 'एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ.'”
- नूतन बांदेकर ,
लेखिका