महाकार्डमुळे नागपूरकरांचा प्रवास झाला कॅशलेस

14 Aug 2023 19:18:04

mahametro


नागपूर :
सध्या अनेक क्षेत्रांत डिजिटल माध्यमांचा वापर होताना दिसत आहे. आता नागपूरमध्ये मेट्रोच्या प्रवासाकरिता महामेट्रोने महाकार्डवर अनेक सवलती दिल्या आहेत. त्यामुळे नागपूरकर याचा पुरेपुर फायदा घेत आहेत.
 
महाकार्डच्या माध्यमातून नागपूर मेट्रो विविध सवलती देत असल्याने महाकार्डच्या खरेदीला नागरिक पसंती देत आहेत. महाकार्डने प्रवास केल्यास प्रवासी भाड्यात दहा टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे ७० हजार नागरिकांनी हे कार्ड खरेदी केल्याचा महामेट्रोने दावा केला आहे.
 
महाकार्डने करण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवासावर १० टक्के सवलत देण्यात येत आहे. तसेच यामध्ये विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के सवलत देण्यात येते. महामेट्रोने आता १४ ऑगस्टपर्यंत २०० रुपयांचा टॉपअप करून महाकार्ड मोफत देण्याची मुदत वाढविली आहे.
 
महामेट्रोने कॅशलेस प्रवासासाठी युरो, मास्टर, व्हीसा स्मार्ट कार्ड आधारित एएफसी प्रणाली स्वीकारली असून शहरातील सर्वच मेट्रो स्टेशनवर ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून प्रवाशांना ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना मेट्रो स्टेशनवरील ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) द्वारावर केवळ महाकार्ड टॅप केल्यानंतर त्यातून प्रवासी भाड्याची कपात होत असते. त्यामुळे आता नागपुरकरांचा प्रवास कॅशलेस झाला आहे.

Powered By Sangraha 9.0