एसटीची आधुनिकतेकडे वाटचाल...

14 Aug 2023 19:13:18
article on Maharashtra State Road Transport Corporation

दि. १ जून, १९४८ रोजी पुणे-अहमदनगर मार्गावर पहिली एसटी धावली. या घटनेला यंदा दि. १ जून रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली. अर्थात, एसटीचे हे अमृत महोत्सवी वर्धापन वर्ष आहे. त्यानिमित्त ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या आजवरच्या प्रवासाचा आणि आधुनिकतेकडे सुरु झालेल्या वाटचालीचा आढावा घेणारा हा लेख...

गेली ७५ वर्षं ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता, चांद्यापासून बांद्यापर्यंत, गावखेड्यापासून आदिवासी पाड्यापर्यंत ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय!’ हे ब्रीद घेऊन एसटी सर्वसामान्य जनतेची सेवा करीत आली आहे. यापुढेदेखील करीत राहील आणि भविष्यात शतकोत्तर महोत्सव एसटी दिमाखात साजरा करेल..! यात तीळमात्र शंका नाही.७५ वर्षांत एसटीने समाजाला काय दिलं, असा ज्यावेळी प्रश्न पडतो, तेव्हा महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाचा टेंभा अगदी सुरुवातीपासून अभिमानाने मिरविण्याचं धारिष्ट फक्त एसटीने दाखविले आहे. देव-देवळे, नदीची घाट, अनेक उद्याने हे ज्या काळामध्ये अस्पृश्यांसाठी आणि इतर खालच्या जातींसाठी अवैध होते अथवा बंद होते, त्या काळातदेखील एकाच एसटीमध्ये सर्व जाती, धर्माचे, पंथाचे लोक बसून एकत्र प्रवास करत होते. म्हणून खर्‍या अर्थाने सामाजिक अभिसरणाचा वस्तुपाठ एसटीने आपल्या जन्मापासून घालून दिला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणार्‍या शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांच्या जेवणाचे डबे पोहोचवणे, सासरी केलेल्या आपल्या मुलीला माहेरकडून नारळाची पोती आणि गोडधोड शिदोरीचे डबे घेऊन जाणे, वर्तमानपत्राचे गट्टे गावागावात पोहोचवणे अशा अनेक एसटीसोबतच्या आठवणी आता इतिहासजमा झालेल्या आहेत. आधुनिकतेमुळे माणसाच्या या गरजा एसटीवर अवलंबून राहिलेल्या नाहीत. तरीदेखील आजच्या काळात एसटीचे महत्त्व यत्किंचितही कमी होत नाही, हेच खरे...शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, दिव्यांग, विविध पुरस्कारप्राप्त व्यक्ती, पत्रकारांपासून आता नव्याने सुरू केलेल्या अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक व महिला अशा ३० पेक्षा जास्त घटकांना शासनाने एसटीच्या माध्यमातून दिलेल्या सवलतींमुळे एसटी या सगळ्यांसाठी मायमाऊलीच वाटते.आता हळूहळू एसटी बदलते आहे. नव्या बदलासह आधुनिकतेचा साज चढवलेली एसटी भविष्यात कशी असेल, हे पुढील मुद्द्यावरून स्पष्ट होईल.


article on Maharashtra State Road Transport Corporation


१) हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान : गेल्या अनेक वर्षांपासून कळकट-मळकट, जीर्ण झालेल्या बस स्थानकांच्या इमारती, पाण्याची डबकी, चिखलमय झालेला बस स्थानक परिसर, दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृह आणि अस्वच्छ बसेस यामुळे विटलेल्या प्रवाशांना एक प्रसन्न, स्वच्छ, सुंदर वातावरणामध्ये प्रवास करण्याचा आनंद मिळावा, या उद्देशाने एसटी महामंडळांने स्पर्धात्मक स्वरूपात ‘स्वच्छता अभियान’ राबविण्याचा संकल्प केला आहे. ‘आपलं गाव, आपलं बस स्थानक’ या संकल्पनेवर आधारित जास्तीत जास्त लोकसहभागातून बस स्थानकाचा विकास, सुशोभीकरण, सौंदर्यीकरण आणि दररोजची स्वच्छता करणे अपेक्षित आहे. यासाठी करोडो रुपयांचे बक्षीस हे अभियानाच्या शेवटी पहिला क्रमांकाच्या बस स्थानकांना मिळणार आहेत. बस स्थानक हे त्या गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असते. त्यामुळे ते त्या गावची शान असली पाहिजे. लोकांना त्या बस स्थानकाचा अभिमान असला पाहिजे. त्यासाठी लोकांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे बस स्थानकाच्या विकासासाठी पुढे आलं पाहिजे, हा या अभियानामध्ये मुख्य आत्मा राहणार आहे. अनेक ठिकाणी स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळ, दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांनी या योजनेचा स्वागत करून प्रत्यक्ष कामाला सुरुवातदेखील केली आहे. हे अभियान न राहता ती एक चळवळ बनली पाहिजे. अर्थात त्याचा थेट फायदा सर्वसामान्य प्रवासी जनतेलाच होणार आहे. भविष्यात एसटीच्या प्रत्येक बस स्थानकाचे रूपडं पालटलं, तर गुणात्मक दर्जा राखल्याबद्दल एसटी प्रशंसास होईल.

२) नवीन बसेस : कोरोना महामारी आणि दीर्घकाळ चाललेला कर्मचार्‍यांचा संप यामुळे मागील दोन अडीच वर्षांमध्ये एसटीच्या नवीन बसेसची खरेदी ठप्प झाली होती. त्यामुळे एसटीकडे असलेल्या जुन्या बसेस रूपांतरित करून आणखीन काही काळ चालवणे एसटीला भाग होते. सध्या जुन्या बसेस निम्म्यापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे तांत्रिक बिघाडाचे, मार्गस्थ बिघाडाचे प्रमाण वाढलेले आहे. प्रवाशांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी एसटीने नव्या बसेस खरेदी करण्याचा व भाडेतत्त्वावर घेण्याचा मेगा प्लॅन आखलेला आहे. यंदा त्यापैकी एक हजार नव्या बसेस दाखलदेखील झालेल्या आहेत. विशेष म्हणजे, नवीन साध्या लालपरीमध्ये प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न एसटीने केलेला आहे. मोठ्या खिडक्या, सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील अशी अंतर्गत रचना, पुशबॅक आसने, मोबाईल चार्जिंग करण्याची सोय अशा आधुनिक काळातील सोईसुविधांनी सज्ज बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने उतरवले आहेत. भविष्यात या बसेसची संख्या वाढत जाईल तसे एसटीचा वाहन ताफा तरुण होत जाईल. त्यामुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा सुरक्षित प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

३) प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक प्रवास हाच एसटीचा ध्यास! 
संपूर्ण जगाला ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा धोका भविष्यात अटळ आहे. पण, तो कमी करणे, नक्कीच आपल्या हातात आहे. जीवाश्म इंधनाचा कमीत कमी वापर आणि पर्यावरणपूरक प्रदूषणमुक्त अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा जास्तीत जास्त वापर करून आपण प्रवासी वाहने चालवल्यास होणारे प्रदूषण टाळता येणे शक्य आहे. याचा विचार करून एसटीने भविष्यासाठी तब्बल ५ हजार, १५० इलेक्ट्रिक वाहने आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याचा निश्चय केलेला आहे. ‘शिवाई’ या नावाने सध्या अनेक इलेक्ट्रिक बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. अत्याधुनिक, वातानुकूलित तरीही प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक अशा या बसेस राज्यातील दोन महानगरांना जोडणार आहेत. त्यासाठी आवश्यक असणार्‍या ‘चार्जिंग स्टेशन’ची निर्मिती राज्यभरात करण्यात येत आहे. राज्याच्या सर्वसामान्य जनतेचा भविष्यातील प्रवास हा अत्यंत सुरक्षित, प्रदूषणमुक्त आणि आरामदायी व्हावा, यादृष्टीने एसटीचे प्रयत्न सुरू असून, या बसेस टप्प्याटप्प्याने एसटीच्या ताफ्यात दाखल होतील.


article on Maharashtra State Road Transport Corporation


४) एसटी लवकरच ‘कॅशलेस’ प्रवासाच्या दिशेने... आपण गाव-खेड्यात एखाद्या चहाच्या टपरीवर जरी चहा पिला, तरी तो चहावाला पैसे देण्यासाठी फोन पे अथवा गुगल पेचा क्यूआर कोड समोर करतो. दोन मिनिटांत आपण मोबाईल वरून त्याला त्याच्या चहाचे पैसे अदा करतो. इतके सहज ‘डिजिटिलायझेशन’ अथवा ‘कॅशलेस’ पेमेंट झाले असताना, एसटीच्या प्रवासात मात्र अजूनदेखील आपल्याला पैसे देऊन तिकीट काढावे लागते. विशेष म्हणजे, सुट्ट्या पैशांवरून अनेकदा वाहकाशी प्रवाशांचे वाद-विवाद घडत असतात. या सगळ्याला आता लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. कारण, येत्या महिन्याभरात एसटीतल्या वाहकांना नवे अ‍ॅण्ड्रॉईड तिकीट इशू मशीन मिळणार असून, त्याद्वारे प्रवाशांना फोन पे, गुगल पे, युपीआय, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अशा कोणत्याही स्वरूपामध्ये पैसे देऊन तिकीट काढणे शक्य होणार आहे.

सध्या प्रायोगिक तत्वावर मुंबई आणि ठाणे विभागांमध्ये सर्व वाहकांना अशा स्वरूपाची तिकीट इशू मशीन देऊन त्यामधील त्रुटी समजावून घेण्याचं प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे, या नव्या मशीनचे जुजबी प्रशिक्षणदेखील वाहकांना दिले जाणार आहे. महाराष्ट्रातील इतर आगारांतदेखील अंशतः या तिकीट इशू मशीनचे वाटप झालेले आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी हे नवीन तिकीट इशू मशीन प्रत्येक वाहकांच्या हाती दिसून येईल. त्यामुळे प्रवासी आणि वाहक यांच्यामध्ये सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद पूर्णत: संपुष्टात येतील. तसेच, खिशात रोख रक्कम न घेता कॅशलेस प्रवास करण्याची संधी प्रत्येकाला मिळणार आहे.

याबरोबरच आरक्षण प्रणालीमध्येदेखील आमूलाग्र बदल करण्यात येत असून, एसटीचे अधिकृत संकेतस्थळ व मोबाईल रिझर्व्हेशनचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. प्रवाशांना सहज आरक्षण करणे, त्यामुळे शक्य होणार आहे. अर्थात, येणार्‍या काळात आरक्षण करत असताना पैसे कट झाले व तिकीट आले नाही, आरक्षण प्रणाली अचानक हँग झाली, अशा अडचणी भेडसावणार नाहीत. अशा पद्धतीने प्रवासिभिमुख सुलभ आरक्षण प्रणाली विकसित करण्यात येत आहे.

कोणत्याही संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या संस्थेची प्रगल्भतेकडे वाटचाल सुरू होते. ७५ वर्षांची संस्था एका अर्थाने वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेली असते. अनेक पशुपक्ष्यांना हक्काचा निवारा, जीवजंतूंना मायेची सावली देऊन आधार देणार्‍या वटवृक्षाला आपण ‘आधारवड’ असे म्हणतो. एसटीदेखील असा वटवृक्ष आहे की, जो महाराष्ट्रातील तमाम सर्वसामान्य जनतेचा आधारवड बनलेला आहे.


अभिजित भोसले
 
(लेखक एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी आहेत.)




Powered By Sangraha 9.0