पुणे : विकसित भारतातील अग्रेसर शहर

14 Aug 2023 16:57:36
Pune is the leading developed city in India
 
विद्येचे माहेरघर असलेले पुणे हे अनेक विद्वानांचे, कलाकारांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे आणि उद्योजकांचे शहर आहे. पुण्याची क्षमता अफाट आहे. सध्याच्या ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेच्या काळात पुणे शहराने देशामध्ये आघाडीवर असणे अपेक्षित आहे. २०४७ साली भारत स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करत असताना विकसित देश झालेला असेल, त्यावेळी त्या विकसित देशामध्ये पुणे हे अग्रेसर शहर असले पाहिजे, असा माझा आग्रह आहे.


सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अहिंसक सत्याग्रही, सशस्त्र क्रांतिकारक, आंदोलक अशा असंख्य देशभक्तांच्या संघर्षामुळे १९४७ साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. आज देशाचा ७६वा स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करून आपण अमृतकाळात प्रवेश केला आहे. अमृतकाळ म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे ते १०० वर्षे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृतकाळात देशाला विकसित देश बनविण्याचा निर्धार केला आहे.मोदीजींच्या नेतृत्वात देशाने गेल्या नऊ वर्षांत अशक्य वाटणारी कामे केली आहेत. अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी भव्य मंदिर व्हावे, हे कोट्यवधी भारतीयांचे शेकडो वर्षांचे स्वप्न होते. त्यासाठी लाखो लोकांनी संघर्ष केला. हे स्वप्न आता साकार होत आहे.

काश्मीरला भारतापासून अलग करणारे घटनेचे ‘कलम ३७०’ रद्द व्हावे यासाठी संघर्ष झाला. देशाच्या घटनेत तात्पुरती व्यवस्था म्हणून सामील केलेले, हे कलम कधीच रद्द होणार नाही, असे अनेकांना वाटत असे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निर्धाराने हे कलम रद्द केले. मोदीजींच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आली आणि आता आगामी पाच वर्षांत ती तिसर्‍या क्रमांकावर नेण्याचा निर्धार मोदीजींनी केला आहे. या देशातील प्रत्येकाचे बँक खाते आहे आणि त्यामध्ये सरकारकडून थेट मदत पाठविली जाते, ही आश्चर्यकारक घडामोड घडली, याचे आपण साक्षीदार आहोत. मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या साडेनऊ वर्षांत अशा अनेक गोष्टी घडल्या, ज्याची कल्पनाही केली नव्हती. देश बदलला आहे. गतीने पुढे जात आहे. आगामी २५ वर्षांत भारत हा जगातील एक प्रमुख विकसित देश होईल, यात कोणतीही शंका नाही.

भारत हा विकसित देश होईल, त्यावेळी त्यामध्ये पुणे महानगराचे आणि पुणे जिल्ह्याचे स्थान काय असेल, हा माझ्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. पुणे हे वैशिष्ट्यपूर्ण शहर आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आधुनिक काळात देशाला नेतृत्व देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे कर्तृत्व या शहरात बहरले. समाजसुधारणेच्या क्षेत्रात क्रांती करणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य पुण्यातच घडले. विद्येचे माहेरघर असलेले पुणे हे अनेक विद्वानांचे, कलाकारांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे आणि उद्योजकांचे शहर आहे. पुण्याची क्षमता अफाट आहे. सध्याच्या ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेच्या काळात पुणे शहराने देशामध्ये आघाडीवर असणे अपेक्षित आहे. २०४७ साली भारत स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करत असताना विकसित देश झालेला असेल, त्यावेळी त्या विकसित देशामध्ये पुणे हे अग्रेसर शहर असले पाहिजे, असा माझा आग्रह आहे.


Pune is the leading developed city in India


आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात पुणे शहराने झेप घ्यावी आणि देशातील प्रमुख केंद्र बनावे, यादृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महायुती सरकारने २०१४ पासून भरीव कार्य केले आहे, हे सांगताना मला आनंद होतो. नव्या चांदणी चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण झाले आहे. हा एक पूल नाही, तर अनेक पुलांचे संकुल आहे. पुण्याच्या वेशीवर होणारी वाहनकोंडी व त्यामुळे होणारा वेळेचा तसेच इंधनाचा अपव्यय नव्या उड्डाणपुलांच्या संकुलामुळे थांबणार आहे. चांदणी चौकातील काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये गडकरी यांनी रस्ते विकासाच्या बाबतीत ऐतिहासिक काम केले आहे. केंद्र सरकारच्या पुढाकाराला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आमच्या महायुती सरकारने साथ दिली.

चार वर्षांत हा अवघड प्रकल्प पूर्ण झाला. चारही बाजूने सतत वेगाने धावणारी वाहने, टेकडीवरील खडकाळ जमीन आणि कोरोनाचे संकट, अशी आव्हाने पेलत हा प्रकल्प पूर्ण झाला. चांदणी चौकातील काम सुरू झाले, त्यावेळी ते अशक्य वाटत होते. पण, ते काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. पुणेकरांची अनेक दशकांची गरज पूर्ण झाली.पुण्यातील वाहतूक समस्या सोडविण्याच्या प्रयत्नातील चांदणी चौक हा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख केला. एकंदरित पुण्यासाठी सध्या वाहतूककोंडी ही प्रमुख समस्या झाली आहे. काळाच्या ओघात शहरातील संपन्नता वाढत गेली आणि वाहनांची संख्याही वाढली. त्याबरोबर वाहतूककोंडी ही समस्या वाढत गेली. पुणे शहराने आपल्या क्षमतेप्रमाणे झेप घेण्यासाठी या शहरातील वाहतूक सुरळीत राहणे अत्यंत आवश्यक आहे. मी ‘पुणे शहर’ म्हणतो. त्यावेळी पुणे, पिंपरी-चिंचवड, खडकी असा पुणे नागरी समूह अपेक्षित असतो.

पुणे नागरी समूहासाठी आमच्या सरकारने आणखी एक अत्यंत महत्त्वाचा वाहतूक प्रकल्प साकारला आहे, तो म्हणजे पुणे मेट्रो. पुण्यात मेट्रो सुविधा असावी, हा प्रस्ताव फार जुना आहे. पण, देशात २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आणि राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भाजप महायुती सरकार सत्तेवर आले आणि पुण्याच्या मेट्रो प्रकल्पाला गती मिळाली. मेट्रो प्रकल्प हा पुणे आणि पिंपरी-चिंचवड या नागरी क्षेत्रातील वाहतूककोंडीवरील रामबाण उपाय आहे. मोदीजींच्या हस्ते नुकतेच मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटन झाले. त्यानंतर या मार्गावरील मेट्रोचा वापर चांगलाच वाढला आहे. मेट्रोने प्रवास करून पुणे रेल्वे स्थानकावरून कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉप स्थानकापर्यंत केवळ २० रुपयांत आणि २० मिनिटांत पोहोचलो, अशा पोस्ट प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या पुणेकरांनी सोशल मीडियावर केलेल्या दिसतील. पुण्यात सायंकाळच्या गर्दीत इतक्या कमी वेळात शहराच्या एका टोकापासून दुसरीकडे पोहोचणे किती महत्त्वाचे आहे, हे पुणेकर चांगलेच जाणतात.

तसेच, पुणे मेट्रो प्रकल्पात तंत्रज्ञानाची कमाल पाहायला मिळेल. पिंपरी- चिंचवड महानगरपालिका ते जिल्हा न्यायालय आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली आहे. मेट्रो प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण झाल्यावर हा प्रकल्प पुणे-पिंपरी-चिंचवडसाठी वरदान ठरेल. पुणे मेट्रोचेही काम कधी होणार नाही, असे लोक बोलत असत. पण, प्रत्यक्षात या प्रकल्पाचे बरेच काम पूर्ण झाले. त्यातून लोकांना सेवा मिळण्यास सुरुवात झाली आहे आणि लवकरच हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल, हे भाजप महायुती सरकारचे वैशिष्ट्य आहे. प्रकल्प लटकवायचे नाहीत, तर ते पूर्ण करायचे, हा मोदीजींचा संदेश आहे. त्यांनी ते करून दाखविले आहे. पुण्यातही मेट्रोचा अशक्य वाटणारा प्रकल्प साकारला आहे.

मी लेखाच्या सुरुवातीला ‘ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था’ असा उल्लेख केला आहे. या अर्थव्यवस्थेचे ज्ञान हेच भांडवल असते. ‘आयटी’ हे त्याचे ठळक उदाहरण आहे. दीर्घकाळची समृद्ध शैक्षणिक परंपरा आणि खूप मोठ्या संख्येने उपलब्ध असलेला युवा वर्ग, हे अशा अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त भांडवल पुण्याकडे आहे. याबाबतीत देशातील खूप थोडी शहरे पुण्याशी स्पर्धा करू शकतील. पुण्यात अशा अर्थव्यवस्थेमुळे वाढलेली उलाढाल आणि त्यामुळे शहराच्या समृद्धीत पडलेली भर आपण पाहतो आहोत. आगामी काळात या बाबतीत आणखी खूप मोठी प्रगती झालेली दिसेल. पुणे हे शैक्षणिक केंद्र असण्याबरोबरच महत्त्वाचे आर्थिक केंद्र झालेले दिसेल. त्यादृष्टीने पुण्यात वाहतुकीच्या सुविधा अत्याधुनिक असणे आवश्यक आहे. त्यामुळेच मी चांदणी चौक आणि मेट्रो प्रकल्पाचा उल्लेख केला.

पुण्याला वाहतुकीची सुविधा अधिक चांगली असण्यासाठी आमच्या सरकारने लोहगाव विमानतळाच्या विस्ताराचा प्रकल्प मार्गी लावला आहे. त्यासोबत पुण्याला लवकरच आणखी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध होणार आहे. नवी मुंबईजवळ मुंबईचा नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यात येत आहे. ‘पुणे-मुंबई एक्सप्रेस वे’मुळे हा विमानतळ पुण्याहून तीन तासांपेक्षा कमी वेळात गाठता येईल. मुंबई-पुणे दरम्यानच्या घाटात मिसिंग लिंकचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने चालू आहे. ही लिंक पूर्ण झाल्यावर एक्सप्रेस वेने पुणे-मुंबई प्रवास आणखी सोपा आणि गतिमान होईल. विमानतळापर्यंत पोहोचण्याच्या वेळेचा विचार करता, नवी मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा पुण्यासाठी अत्यंत सोईचा असेल. याशिवाय पुरंदरचा प्रस्तावित विमानतळ आहेच.

पुणे महानगर क्षेत्रातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी आमच्या सरकारने केलेल्या अनेक कामांची माहिती देता येईल. पुण्यातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी शहराभोवती १०० किलोमीटरचा रिंग रोड उभारण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरू आहे. इलेक्ट्रिक बसचा प्रकल्प सुरू झाला आहे. पुणेकरांना स्वस्त, वेगवान आणि सुरक्षित वाहतूक सुविधा मिळावी, यासाठी खूप मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. ते पूर्ण करू आणि त्यामुळे पुण्यातील जीवनमान उंचावलेले दिसेल.वाहतूक हा सध्या पुण्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा झाल्यामुळे त्याबद्दल सविस्तर लिहिले. पण, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हाती घेतलेल्या योजना तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पुणे शहरात दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस पाणीपुरवठा होण्यासाठी हाती घेतलेली ’२४ बाय ७ योजना’ ही प्रत्येकाला दिलासा देणारी आहे. पुणे शहरातून मध्यभागी वाहणार्‍या नदीचा परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी नदी सुधार योजना हाती घेतली आहे. त्यासाठी जपानच्या ‘जायका’ने आर्थिक मदत केली आहे.

नदीमध्ये १०० टक्के प्रक्रिया करूनच सांडपाणी सोडावे, हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर शहराच्या मध्यभागी वाहणार्‍या नदीचे स्वच्छ पाणी आणि त्यातून बोटिंग करणारे पुणेकर, असे रम्य दृष्य दिसेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक वैशिष्ट्य आहे. मोठे-मोठे विकास प्रकल्प हाती घेऊन पूर्ण करतानाच मोदी सरकार तितकेच महत्त्व सामान्य माणसाच्या कल्याणावर देते. पुण्यातही मोदी सरकारच्या मदतीने सामान्य लोकांसाठी हजारो घरे बांधण्यात येत आहेत. नुकत्याच पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात मोदीजींच्या हस्ते ‘प्रधानमंत्री आवास योजनें’तर्गत पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली १ हजार ,२८० हून अधिक घरे आणि पुणे महापालिकेने बांधलेली २ हजार, ६५०हून अधिक घरे लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात आली. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणार्‍या सुमारे १ हजार, १९० घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणार्‍या ६ हजार , ४०० हून अधिक घरांची पायाभरणीदेखील मोदीजींच्या हस्ते झाली.

आमच्या सरकारने पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ठोस पावले उचलली आहेत. त्यामुळे पुणे शहर व परिसराला क्षमतेनुसार आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या देशातील महत्त्वाचे शहर होणे शक्य होईल. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या आर्थिक विकासामुळे येथील प्रत्येकाला लाभ होणार आहे. रोजगाराची अधिकाधिक निर्मिती होईल आणि जीवनमान उंचावेल. त्यासोबत या महानगर क्षेत्रातील जनतेचे जगणे सोपे व्हावे, यासाठी वाहतूक, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, निवास या सर्व बाबतीत आमचे सरकार काम करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पाठबळ शहराच्या विकासाला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे शहरातील सुविधा विकसित करण्यास खर्‍या अर्थाने चालना मिळाली आहे. आगामी काळात मोदीजींच्या नेतृत्वात भारत विकसित राष्ट्र होईल व त्यामध्ये पुणे हे अग्रेसर शहर असेल, याची मला खात्री आहे.


-चंद्रकांतदादा पाटील


(लेखक राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.)



Powered By Sangraha 9.0