स्वातंत्र्याची ७५ वर्षे, मुक्ततेची ९ वर्षे...

14 Aug 2023 21:24:12
Article On Indian 76th Independence Day And Its History

जे अस्मिता जागरण नरेंद्र उर्फ स्वामी विवेकानंदांनी केले आणि जे जागरण महात्मा गांधीजींनी शेवटच्या पंगतीतील निरक्षर माणसांपर्यंत पोहोचविले, त्या जागरणाची मशाल नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी हातात उंच धरली आहे. हा जागरणाचा प्रकाश अत्यंत तेजस्वी आहे आणि त्यामुळे काळ्या इंग्रजांना जे करणे जमले नाही, ते नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले आहे.

देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. हजारो वर्षांच्या पारतंत्र्यानंतर आपला देश राजकीय गुलामीतून मुक्त झाला. इंग्रजांचे शासन येण्यापूर्वी उत्तरेत वेगवेगळ्या मुस्लीम घराण्यांची सत्ता राहिली. दक्षिणेतदेखील वेगवेगळी मुस्लीम घराणी राज्ये करीत राहिली. आदिलशाही, बिदरशाही, निजामशाही, हैदरशाही अशा रानटी आणि क्रूर राजवटीखाली हिंदू समाज पिसला गेला होता. या हिंदू समाजाचे सत्व आणि तेज जागे ठेवण्याचे काम राजकीय क्षेत्रात महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, राणी दुर्गावती, राणी चन्नमा, गुरू गोविंदसिंग, विजयनगरचे साम्राज्य यांनी केले. हिंदू पिसला गेला; पण संपला नाही. त्याचे तेज थोडे धूसर झाले; पण अग्नी संपला नाही. युरोपातून आलेले इंग्रज रानटी मुस्लीम राजवटींपेक्षा अधिक बुद्धिमान होते. भारतासारख्या विशाल देशावर केवळ सैन्यशक्तीच्या आधारे दीर्घकाळ राज्य करता येणार नाही, हे त्यांना फार लवकर समजले. त्यांची पाशवी शक्ती त्यांच्या शस्त्रबळात होती, विज्ञानात होती आणि तंत्रज्ञानात होती. समाजाला कायद्याने कसं बांधून ठेवायचं, याचं शास्त्र त्यांनी विकसित केलेच; परंतु ते तिथेच थांबले नाहीत.

भारतावर दीर्घकाळ राज्य करायचे असेल, तर हिंदू समाजाची बुद्धी भ्रष्ट केली पाहिजे. आपण फार मागास आहोत, आपला धर्म निकृष्ट आहे, आपली समाजव्यवस्था सडलेली आहे, आपल्याकडे कधी शास्त्रांचा विकासच झाला नाही, आपण राज्य करण्यासदेखील नालायक आहोत, इंग्रजांचे राज्य हे ईश्वरी वरदान आहे, अशा सर्व गोष्टी शिक्षणाच्या माध्यमातून तरूण मनावर बिंबविल्या जाऊ लागल्या. हे नवीन प्रकारचं आक्रमण होतं. हिंदूंच्या अवनतीला ब्राह्मण जबाबदार आहेत. जातीवादाने समाजाचा घात झाला. मुस्लीम आक्रमकांसमोर जातीभेदग्रस्त समाज टिकला नाही. ‘जे जे हिंदू ते ते निंदू आणि जे जे इंग्रजी ते ते वंदू’ अशी मानसिकता असलेल्या पिढ्याच्या पिढ्या उभ्या राहत गेल्या.

इंग्रजांच्या या कूटनीतीला अनेक थोर पुरूषांनी धक्के दिले. धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात १०० अणुबॉम्बच्या स्फोटाचा धक्का देण्याचे काम स्वामी विवेकानंदांनी केले आणि राजकीय क्षेत्रात तेवढेच जबरदस्त काम महात्मा गांधींनी केले. स्वामी विवेकानंदांनी भरकटलेल्या तरूणांची डोकी ठिकाणावर आणली आणि महात्मा गांधीजींनी हेच काम स्वराज्याचा लढा लढवून राजकीय क्षेत्रात केले. जागतिक परिस्थितीच्या रेट्यामुळे इंग्रजांना भारत सोडावा लागला. भारतीयांचे सैन्य आपल्याशी एकनिष्ठ राहणार नाहीत, हे जेव्हा इंग्रजांना समजले, तेव्हा त्यांनी देशाची फाळणी करून देश सोडण्याचा निर्णय केला. दि. १५ ऑगस्टला आपण स्वतंत्र झालो.
 
दि. १५ ऑगस्टला आपण स्वतंत्र झालो, म्हणजे गोर्‍या इंग्रजांचे राज्य गेले आणि काळ्या इंग्रजांचे राज्य सुरू झाले. ’हिंद स्वराज्य’ या पुस्तकात महात्मा गांधीजींनी म्हटले होते की, ‘जर असे झाले, तर ते पूर्ण स्वराज्य नसेल.’ १९४७ सालानंतर जे राज्यकर्ते झाले, ते ‘इंडिया’वाले होते. त्यांच्या दृष्टीने ’इंडिया’चे दुसरे नाव ‘भारत’ आणि इंग्रजांनी बुद्धी भ्रष्ट केलेल्या या काळ्या इंग्रजांनी आपली बौद्धिक गँग तयार केली. तिला ‘खान मार्केट गँग’ म्हणतात. जे जे हिंदू ते ते निंदू, जे जे भारतीय ते ते लाथाडू, जे जे संस्कृतनिष्ठ ते ते सर्व कनिष्ठ. त्यांनी ‘इंडिया’ची संकल्पना मांडायला सुरुवात केली. आपल्याला ‘नवीन इंडिया’ घडवायचा आहे. ज्या ‘नवीन इंडिया’त हिंदू देवस्थानांचे सरकारीकरण केले जाईल, हज यात्रेला सबसिडी दिली जाईल, घटनेचे ’३७०’ कलम तसेच ठेवले जाईल, हिंदू यात्रांवर कर बसविला जाईल, हिंदूना दोन बायका करण्यास प्रतिबंध केला जाईल, मुसलमानांना चार बायका करण्यास सूट दिली जाईल, देशाच्या साधनसंपत्तीवर अल्पसंख्याकांचा पहिला अधिकार राहील, अशा या ’आयडिया ऑफ इंडिया’त, ’आयडिया ऑफ इंडिया’ची प्रवचने देणारी केंद्रे उभी केली गेली. त्यात हे सगळे काळे इंग्रज भरण्यात आले. ‘खान मार्केट गँग’ समृद्ध झाली आणि तिला असे वाटू लागले की, आपणच देश चालवित आहोत आणि बाकी सगळे लोक येडे आहेत.

परंतु, ‘भारत’ कधी ‘इंडिया’ झाला नाही. जो भारत बाबर, अकबर, औरंगजेब, टिपू, मॅकोले, कर्झन, माऊंटबॅटन, यांच्या छाताडावर पाय देऊन उभा राहिला, तो काळ्या इंग्रजांना पाताळात गाडण्यासाठी २०१४ साली उभा राहिला. २०१४ साली खर्‍या अर्थाने काळ्या इंग्रजांची सत्ता गेली आणि भारतीयांची सत्ता आली. १९४७चे सत्तांतर राजकीय सत्तांतर होते आणि २०१४चे सत्तांतर हे केवळ राजकीय सत्तांतर नसून, ते सांस्कृतिक सत्तांतर आहे. २०१४ ते २०२३ ही मुक्ततेची नऊ वर्षे आहेत. मुक्ततेच्या या नऊ वर्षांत पारतंत्र्याच्या एकेक बेड्या तुटून पडत चालल्या आहेत. आपण एक सनातन राष्ट्र आहोत, अतिप्राचीन राष्ट्र आहोत, आपली म्हणून काही स्वतंत्र विचारधारा आहे, अखिल मानवजातीला आपल्या एकात्म चिंतनाने आपण सुखी करू शकतो. ‘हे विश्वचि माझे घर’ ही आपली नियती आहे. संकुचित डबक्यात पोहण्यासाठी आपला जन्म झालेला नसून, भारतमातेला विश्वगुरूपदावर पोहोचविण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. या सर्व भारतीयात्वाचे नेतृत्त्व आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. ज्यांची राजकीय दुकाने दिवाळखोरीत चालली आहेत, ते स्वतःवर अविश्वास व्यक्त करण्यासाठी लोकसभेत अविश्वास ठराव आणतात. स्वतःच्याच पादत्राणाने स्वतःचेच थोबाड रंगवून घेतात. शकुनी, कंस, दुःशासन यांचे दिवस आता भरत आले आहेत.
 
जे अस्मिता जागरण नरेंद्र उर्फ स्वामी विवेकानंदांनी केले आणि जे जागरण महात्मा गांधीजींनी शेवटच्या पंगतीतील निरक्षर माणसांपर्यंत पोहोचविले, त्या जागरणाची मशाल नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी हातात उंच धरली आहे. हा जागरणाचा प्रकाश अत्यंत तेजस्वी आहे आणि त्यामुळे काळ्या इंग्रजांना जे करणे जमले नाही, ते नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले आहे. अयोध्येत राम मंदिर उभे राहत आहे, काश्मीरघाटीतील फुटीरतावादी मुस्लिमांचे भरणपोषण करणारे ’३७० कलम’ दफन झाले आहे. दहशतवादी वेचून-वेचून ठार मारले जात आहेत, देवस्थानांचा प्रचंड विकास होत आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा महान देशभक्तांकडे नव्या दृष्टिकोनातून नवी पिढी बघू लागली आहे. उद्धट, उर्मट, घमेंडी आपला माज उतरवायला तयार नाहीत, या ‘इंडियावाल्यां’ना हिंदू महासागरात बुडविण्याचे काम भारताला करायचे आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा जसा सुखदायक आहे, त्याहून अधिक सुखदायक मुक्ततेचा नऊ वर्षांचा हा कालखंड आहे. आपल्याला अजूनही मुक्त होण्यासाठी काही बेड्या तोडायच्या आहेत. अस्पृश्यतेची भयानक बेडी ही पहिली बेडी आहे, जातिगत अहंकार ही दुसरी बेडी आहे, आर्थिक विषमता ही तिसरी बेडी आहे. वेगवेगळ्या विषयांच्या अज्ञानाची चौथी बेडी आहे-ज्यात संविधानाचे अज्ञान, स्वधर्माचे अज्ञान, संस्कृतीचे अज्ञान, असे अनेक विषय येतात. म्हणून नऊ वर्षांचा कालखंड हा बेड्या मोडण्याचा कालखंड मानला पाहिजे. पुढे आणखी २५ वर्षे हा कालखंड भारताने भारतासाठी आरक्षित करून ठेवला पाहिजे. आपल्या सर्वांना ‘इंडिया’ म्हणून, जगायचे नसून, ‘भारत’ म्हणून जगायचे आहे आणि भारताच्या संकल्पनेचा जन्म १९४७ साली झाला नसून, हजारो वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्या वेदमंत्राचे उच्चारण झाले असेल, तेव्हाच झालेला आहे. स्वातंत्र्याचा आनंद साजरा करीत असताना मुक्ततेच्या नऊ वर्षांचा स्वरदेखील आपण एकदिलाने आळवावा.
९८६९२०६१०१

Powered By Sangraha 9.0