प्राणों से प्रिय हमे हैं। यह हिंदू भू हमारी।

11 Aug 2023 20:41:41
Article On Rashtriya Swayamsevak Sangh Founder Dr. Hedgewar Ideology

डॉ. महंमद इक्बाल नावाचे एक मोठे विद्वान कवी होऊन गेले. ‘सारे जहाँ से अच्छा’ हे गीत त्यांनी लिहिलेलं आहे. मुळात ती कविता आहे आणि तिचं नाव आहे-‘तराना-ए-हिंदी.’ आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात, हे गीत खूपच लोकप्रिय झालं. ‘सगळ्या जगात आमचा हिंदुस्थान देश श्रेष्ठ आहे,’ असे म्हटल्यामुळे सर्व भारतीयांना ते गीत आपलं वाटलं. पण, आपल्या संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी या गीताला ठामपणे विरोध केला.”
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा एका तासाची असते. साधारणपणे पहिली ४० मिनिटे ही शारीरिक कार्यक्रमांची असतात. यात व्यायामयोग, सूर्यनमस्कार, समता आणि खेळ असतात. नंतरची २० मिनिटे ही बौद्धिक विषयांची असतात. त्यात कथाकथन, गीतगायन, समाचार समीक्षा, बौद्धिक खेळ इत्यादी विषय असतात. अखेर प्रार्थना होऊन शाखा संपते. यात भगवा ध्वज चढवून शाखा लावणे म्हणजे सुरू करणे आणि प्रार्थना करून ध्वज उतरवून शाखा संपवणे, हे दोन मुद्दे अनिवार्य असतात. मधल्या काळात शारीरिक आणि बौद्धिक विषयांना कसा-कसा वेळ द्यायचा, हे शाखेचा मुख्य शिक्षक आणि कार्यवाह यांनी ठरवायचं असतं. काही व्यवसायी शाखा अर्ध्या तासाच्यासुद्धा असू शकतात किंवा काही विशेष प्रसंगी म्हणजे संचलन अभ्यास वगैरे असेल, तर शाखा दोन तासांचीसुद्धा असू शकते. पण, साधारणपणे एक तासाची शाखा, हीच देशभर प्रचलित आहे.

बर्‍याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. असाच स्वातंत्र्य दिन तोंडावर आला होता. आमच्या शाखा कार्यवाहांनी शारीरिक कार्यक्रम जरा लवकर आटपते घेतले. म्हणाले की, “आज आपण एक वेगळं सांघिक गीत म्हणणार आहोत. ते गीत म्हणता म्हणताच मी त्या गीतासंबंधातली गोष्ट; पण सांगणार आहे. म्हणजे कथाकथन आणि गीत गायन एकदमच होणार आहे.”आमची ती सायम् शाखा मुख्यतः बालकांची होती, दोन-चार तरुणही होते. कार्यवाहांनी प्रश्न केला, “ ‘जन-गण-मन’ आणि ‘वंदे मातरम्’ ही राष्ट्रगीतं कुणाकुणाला येतात? हात वर करा,” सगळ्यांचे हात वर झाले. कुणाला न येण्याचा प्रश्नच नव्हता. कारण, अगदी शिशुवर्गात असल्यापासून प्रत्येकजण शाळेत किंवा इतरत्रसुद्धा ही राष्ट्रगीतं ऐकतच मोठा होतो. मग कार्यवाहांनी प्रश्न टाकला,“ ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’, हे गीत कुणाला माहितेय?“ सगळे नाही. पण, बरेच हात वर झाले.

कारण, हे गीतसुद्धा साधारण चौथी-पाचवीपासून सगळ्या शाळांमधून शिकवलं जातंच. काही उत्साही बाल म्हणाले, “शिक्षक, आम्हाला हे गीत अख्खं पाठ आहे. दर स्वातंत्र्य दिनाला आम्ही शाळेत झेंडावंदनाला सगळे विद्यार्थी एकत्र हे गीत म्हणतो. म्हणून दाखवू का तुम्हाला.” त्यांच्या उत्साहाला आवर घालत स्मितहास्य मुद्रेने कार्यवाह पुढे म्हणाले की, “थांबा-थांबा अजून माझं विचारणं संपलं नाहीये. आता मला सांगा, ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा,’ हे गीत कुणाकुणाला येतं?” तेे उत्साही बाल पुन्हा पुढे सरसावत म्हणाले, ”शिक्षक, आम्हाला येतं, हे पण गीत. आमच्या गायनाच्या बाई याला ‘राष्ट्रीय एकात्मता गीत’ म्हणतात. यातल्या एका कडव्यात ’हिंदी हैं हम, हिंदी हैं हम,’ असं तीन वेळा म्हणायचे असतं.

तेव्हा बाई आम्हाला सांगतात, ’जोरजोरात ओरडून म्हणा, ते तीन वेळा आणि शाळा दणाणून सोडा! मग आम्ही सगळी मुलं जोरजोरात ओरडतो. खूप मज्जा येते.”कार्यवाह किंचित गंभीर होत म्हणाले की, “हं आता गोष्ट ऐका. आपला देश स्वतंत्र होण्यापूर्वी आपल्या देशावर इंग्रज लोक राज्य करीत होते. या काळात डॉ. महंमद इक्बाल नावाचे एक मोठे विद्वान कवी होऊन गेले. ‘सारे जहाँ से अच्छा’ हे गीत त्यांनी लिहिलेलं आहे. मुळात ती कविता आहे आणि तिचं नाव आहे- ’तराना-ए-हिंदी.‘ आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात, हे गीत खूपच लोकप्रिय झालं. ‘सगळ्या जगात आमचा हिंदुस्थान देश श्रेष्ठ आहे,’ असे म्हटल्यामुळे सर्व भारतीयांना ते गीत आपलं वाटलं. पण, आपल्या संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी या गीताला ठामपणे विरोध केला.” शाखेवरचे सगळे बाल-तरुण एकदम सचेत झाले. अरेच्चा! आपल्या शाखेचे, आपल्या संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार. त्यांनी या एवढ्या छान गीताला विरोध केला? का बरं? कार्यवाह पुढे बोलू लागले, “ ’सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ताँ हमारा’ ही पहिली ओळ ठीक आहे.

पण, पुढची ओळ, ‘हम बुलबुलें हैं इसकी, ये गुलिस्ताँ हमारा’ यातून प्रकट होणार्‍या भावनेला डॉ. हेडगेवारांचा आक्षेप होता. बुलबुल म्हणजे गाणारा पक्षी आणि गुलिस्ताँ म्हणजे काय? माहितेय कुणाला?” एक उत्साही बाल पुढे सरसावत जोरात म्हणाला, “शिक्षक, मला माहितेय. देवानंद आणि शर्मिला टागोरचा पिच्चर होता, ‘ये गुलिस्ताँ हमारा.’ गेल्या वर्षी गणपतीत आमच्या वाडीत दाखवला होता. (पिक्चर नव्हे बरं का, पिच्चर!)” कार्यवाहांना हसू आवरेना. ते म्हणाले की, “देवानंदचा काही संबंध नाही इथे. ‘गुलिस्ताँ’ म्हणजे ‘बगीचा’. कवी इथे, अशी भावना व्यक्त करतोय की, हा देश म्हणजे एक सुंदर बगीचा आहे आणि आम्ही बगीचातले गाणारे बुलबुल आहोत. या भावनेलाच डॉ. हेडगेवारांचा विरोध होता.” वातावरण पुन्हा गंभीर झालं.

डॉ. हेडगेवार म्हणायचे, कार्यवाह पुढे म्हणाले, ”हा देश म्हणजे आमच्या दृष्टीने बगीचा नसून, आमची मातृभूमी आहे. आमची आई आहे. आम्ही कुणी गाणारे बुलबुल नसून, आमच्या अत्यंत प्रिय अशा आईचे, मातृभूमीचे पुत्र आहोत. काय फरक आहे, या दोन भावनांमध्ये? तर कोणत्याही कारणांमुळे जर बगीचा संकटात सापडला, तर बुलबुल खुशाल त्या बगीचातून स्थलांतर करतात आणि दुसरा सुस्थितीतला बगीचा शोधून तिथे गाणं गात बसतात. बुलबुलांना स्वतःचं सुख, स्वतःची सुस्थिती हवी असते. बगीच्याच्या सुखदुःखाची त्यांना पर्वा नसते. आम्ही आणि आमचा हा प्रियतम भारत देश यांच्यामधील भावबंध बगीचा आणि बुलबुल यांच्याप्रमाणे नसून, आई आणि मुलाप्रमाणे आहेत.

संकटात सापडलेल्या आईला तशीच सोडून पुत्र दुसरीकडे कधीच जाणार नाही. प्राण पणाला लावून तो आपल्या आईला सांभाळेल, सुखी ठेवेल. तसेच, आम्ही आमच्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी हवे तर प्राण खर्ची घालू.” “डॉ. हेडगेवारांच्या वेळी आपला देश पारतंत्र्यात होता, म्हणून त्यांंनी तसं म्हटलं होत,”ं कार्यवाह पुढे बोलतच होते, “आता आपण स्वतंत्र आहोत. आपल्याला स्वराज्य मिळालंय; पण अजून आपल्याला त्याचं सुराज्य करायचंय. त्यासाठी आपण, ‘सारे जहाँ से अच्छा,’ हे गीत बाजूला ठेवून त्याच्याच चालीवर आपली भावना व्यक्त करणारे वेगळं गीत निर्माण केलं आहे. चला, आता म्हणा माझ्या पाठोपाठ- प्राणों से प्रिय हमें हैं। यह हिंदू भू हमारी। हम हैं सपूत इस के, माँ भारती हमारी॥” बुलंद आवाजात कार्यवाह गीत सांगू लागले.

नवीनच माहिती कळल्यामुळे आम्ही सगळे बाल-तरुण उत्साहाने त्यांच्या पाठोपाठ म्हणू लागलो. तीन कडवी झाल्यावर कार्यवाह म्हणाले, “त्या मूळ गीतात जे शब्द आहेत ना, ‘मजहब नही सिखाता आपस में बैर रखना, हिंदी हैं हम वतन हैं हिंदोस्ताँ हमारा’ आणि मग शाळेत तुम्ही तीनदा जोरात ओरडता ना, ‘हिंदी हैं हम’ म्हणून, तर तिथे आपण शब्द योजलेत-‘हिंदुत्व ही सिखाता एकात्म भाव सब में, हिंदू हैं हम, यही हैं राष्ट्रीयता हमारी.’ तेव्हा ‘हिंदू हैं हम’ ही ओळ तशीच तीन वेळा जोरात म्हणायची. असा आवाज लावा की, हे आपले संघस्थान आणि आसपासची सगळी वस्ती दणाणून गेली पाहिजे.” आता ओरडण्याचं एवढं ’लायसन्स’ मिळाल्यावर, मग काय? सगळ्या बालांनी संघस्थान डोक्यावरच घेतलं. या दिवशीची शाखा संपली आणि सर्वजण एका वेगळ्याच उत्साहाने घरोघरी परतले.

घरी जात असताना कार्यवाह आम्हा काही तरुण-बालांना (म्हणजे साधारण आठवी ते दहावीचा वयोगट) आणि तरुणांना म्हणाले, “अरे, आपण आपलं हे संघस्थान, ‘हिंदू हैं हम’ असं म्हणून दणाणून सोडण्याला एक वेगळंच ऐतिहासिक महत्त्व आहे. कारण, ते पाहा, ते समोर गोकुळदास तेजपाल सभागृह दिसतंय ना, तिथेच या देशातल्या काही सुशिक्षित हिंदू नेत्यांंनी एकत्र जमून असा ठराव केला होता की, आम्ही हिंदू नसून, हिंदी आहोत. आज आम्ही ठणकावून सांगतोय की, आम्ही हिंदू आहोत!” कार्यवाहांना जे सांगायचं होतं, त्याचा आशय थोडक्यात सांगतो. १८५७ साली भारतातल्या हिंदू नेत्यांनी सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रजांना या देशातून हाकलून देण्याचा जोरदार प्रयत्न केला. या प्रमाणात मुसलमानांनी हिंदूंना साथ दिली. पण, इंग्रजांनी श्रेष्ठ शस्त्रबळ आणि श्रेष्ठ संघटन यांच्या जोराने त्यांचा पराभव केला. मग इंग्रजांनी भेदनीतीचा वापर करून मुसलमानांना हिंदूंपासून फोडलं, सर सय्यद अहमद यांनी मुसलमान हे वेगळं राष्ट्र आहे, असं प्रतिपादन करायला सुरुवात केली. १८७५ मध्ये त्यांनी अलिगढ येथे मुसलमानांचं वेगळं विद्यापीठ स्थापन केलं.

भारताला राजकीय सुधारणा मिळून काही काळाने पूर्ण स्वातंत्र्य मिळावं. म्हणून डिसेंबर १८८५ मध्ये मुंबईत गवालिया टँक मैदानाच्या काठावर गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेच्या सभागृहात काँग्रेसची स्थापना झाली. या काँग्रेसचे कर्तेधर्ते असणार्‍या प्रमुख हिंदू नेत्यांची अशी धारणा होती की, इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवायचं, तर हिंदू-मुसलमानांनी एक व्हायला हवं, यासाठी दोघांनी आपला धर्माभिमान बाजूला ठेवून हिंदी व्हायला हवं. यामुळे पहिली काही वर्षे काँग्रेसच्या या ’हिंदित्वा’चा प्रभाव सगळ्यांच्याच मनावर होता. १९०३-०४ या सुमारास जेव्हा डॉ. महंमद इक्बाल यांनी ’तराना-ए-हिंदी’ नावाची ही कविता लिहिली, तेव्हा त्यांच्या मनावरही हा ’हिंदित्वा’चा प्रभाव होता. पण, १९२१ पासून मुसलमान समाज ‘हिंदित्वा’पासून वेगाने दूर झाला. हिंदू समाज मात्र आपलं ’हिंदुत्व’ विसरून ‘हिंदी’ बनला. या हिंदुत्व विसरलेल्या हिंदू समाजाच्या मनान ती हिंदुत्वाची जाणीव, धारणा ती अस्मिता पुन्हा जागी करणं, हेच तर संघाचं काम आहे.

१९३४ साली मुंबईत सर्वप्रथम मारवाडी विद्यालयाच्या मैदानावर संघाची शाखा लागली. यानंतर केव्हातरी वर्षा-दोन वर्षांत या गवालिया टँक मैदानावर शाखा सुरू झाली असावी. कारण, डॉ. हेडगेवार स्वतः या शाखेवर येऊन गेलेले आहेत. पुढे दि. ९ ऑगस्ट १९४२ ला इथूनच महात्मा गांधींनी ’चले जाव चळवळ’ सुरू केली. म्हणून आता या मैदानाला ‘ऑगस्ट क्रांती मैदान’ म्हणतात. अशा ऐतिहासिक ठिकाणी ’हिंदू हैं हम’ असा जयघोष करणं, हे मोठं भाग्यच आहे.



Powered By Sangraha 9.0