मुंबई : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी पाकिस्तानची संसद बरखास्त करून निवडणुकांचा मार्ग मोकळा केला आहे. पाकिस्तानच्या संसदेचा कार्यकाळ १२ ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यामुळेच राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी संसदेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार घटनेच्या कलम ५१-१ अंतर्गत संसद बरखास्त केली.
पुढील निवडणुकी पर्यंत काळजीवाहू पंतप्रधान पाकिस्तानची कमान सांभाळतील. या काळजीवाहू पंतप्रधानाची नियुक्ती सर्वसंमतीने करण्यात येईल. काळजीवाहू पंतप्रधानाकडे पाकिस्तानच्या संसदेच्या निवडणूका घेण्यासाठी ९० दिवसांचा वेळ असेल. या ९० दिवसात निवडणूका घेणे कायद्याने बंधनकारक आहे.
विशेष म्हणजे शाहबाज शरीफ यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान समजले जाणारे इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे शाहबाज शरीफ यांच्यासमोर कोणतेही मोठे आव्हान उरलेले नाही. पाकिस्तानामधील दुसरा प्रमुख राजकीय पक्ष पीपीपीचे नेते बिलावल भुट्टो झरदारी हे स्वत: शाहबाज यांचे भागीदार बनले आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर शाहबाज शरीफ पुन्हा सत्तेवर येऊ शकतात. पाकिस्तानच्या सैन्याचा त्यांना पुर्ण पाठिंबा आहे.