नवी दिल्ली : विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावाच्या चर्चेदरम्यान द्रमुक नेत्या कनिमोझी यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला होता. मणिपूरमधील महिलांवरील हिंसाचारावर विरोधकांच्या हल्ल्यांवर प्रत्युत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमके प्रमुख जयललिता यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची आठवण करुन दिली.
भारतातील महिलांवरील गुन्ह्यांबाबत द्रमुक नेत्या कनिमोझी यांच्या टीकेला उत्तर देताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, "महिलांना कुठेही त्रास होत असेल, मग ते मणिपूर असो, राजस्थान किंवा दिल्ली, आम्हाला ते गांभीर्याने घ्यावे लागेल, परंतु त्यावर राजकारण होता कामा नये."
त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी कनिमोझी यांना २५ मार्च १९८९ रोजी तामिळनाडू विधानसभेत जयललिता यांची साडी ओढण्यात आल्याच्या घटनेची आठवण करुन दिली. द्रमुकच्या खासदारांना संबोधित करताना त्या म्हणाल्या, "तुम्ही कौरव सभेबद्दल बोलत आहात, तुम्ही द्रौपदीबद्दल बोलत आहात, द्रमुक जयललिता यांना विसरली आहे का? अविश्वसनीय."