मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांच्या यादीत अग्रस्थानी दादा कोंडकेंचे नाव येतेच. सत्तरच्या दशकात तमाशापटांचा काळ एकीकडे सरला होता तर दुसरीकडे विनोदी चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. आपल्या मातीतील कथा आणि विनोद, दैंनदिन जीवनातील गमती, यांची गट्टी जमवून दादा कोंडके या नावाचे एक पर्वच मराठी चित्रपटसृष्टीत होऊन गेले. आणि आजही दादा कोंडके यांचे नाव आणि त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आहेत. ८ ऑगस्ट १९३२ ला जन्मलेल्या दादांनी ‘तांबडी माती’ या चित्रपटाच्या निमित्ताने सुरु केलेला प्रवास १९९४ साली ‘सासरचं धोतर’ या चित्रपटावर येउन थांबला. आणि संपुर्ण मनोरंजनसृष्टीला अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक दादा कोंडके हे अष्टपैलु कलावंत मराठी प्राप्त झाले.
येत्या ८ ऑगस्टला दादा कोंडके यांची ९१ वी जयंती आहे. याच निमित्ताने दादांच्या गाजलेल्या चित्रपटांची मेजवानी झी टॉकीजने प्रेक्षकांसाठी आणली आहे. १९६९ साली प्रदर्शित झालेल्या दादांच्या चित्रपटांनी तर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलाच, पण त्यांच्या गाण्यांनी देखील सत्तरचा काळ गाजवला. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक दादांच्या चित्रपटांशी जोडला गेला. आजच्या तरूणाईलाही दादांच्या चित्रपटातील इरसाल विनोद हवाहवासा वाटतो.
दादा कोंडके हे असे एक हास्यपर्व होते ज्याने मराठी चित्रपटाला मातीतल्या अस्सल विनोदीपटाचा परिसस्पर्श दिला. त्या दादांना ज्युबिलीस्टार ६ चित्रपटाद्वारे मानाचा मुजरा देण्यात येण्याचा मानस झी टॉकीजचा आहे. दादांच्या चित्रपटांना पाट दशके जरी होऊन गेली तरी आजही ते चित्रपट तितकेच ताजेतवाने वाटतात. विनोदातील निखळपणा कायम ठेवत शाब्दिक कोट्यांमधून इरसाल फटाके वाजवणाऱ्या विनोदवीर अभिनेते, दिग्दर्शक ज्युबिलीस्टार दादा कोंडके यांच्या सहा ब्लॉकबस्टर चित्रपटांची मेजवानी दादांच्या चाहत्यांना मिळणार आहे.
६ ऑगस्टपासून दर रविवारी दादा कोंडके यांच्या छप्परफाड प्रतिसाद मिळालेल्या सहा सिनेमांतून विनोदाच्या श्रावणसरी बरसणार आहेत. दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता दादा कोंडके यांच्या गाजलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून मनोरंजनाचा पाऊस पडणार आहे. दादांनी त्यांच्या कारकीर्दीत १६ चित्रपटांची निर्मिती केली आणि ते सगळे सिनेमे रौप्यमहोत्सवी ठरले. दादा कोंडके यांचा नवा चित्रपट प्रदर्शित झाला की तो सिल्वर ज्युबिली साजरी करूनच पोस्टर खाली उतरणार हे समीकरण जुळलेलं होतं. त्यामुळे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दादांचे नाव देखील नोंदवले गेले. त्यातूनच दादांच्या चित्रपटांना ज्युबिलीस्टार सिनेमा अशी ओळख मिळाली.
झी टॉकीजवर दाखवले जाणार हे चित्रपट ( वेळ - दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता)
६ ऑगस्ट - येऊ का घरात
१३ ऑगस्ट - सासरच धोतर
२० ऑगस्ट - राम राम गंगाराम
२७ ऑगस्ट - हयौच नवरा पाहिजे
३ सप्टेंबर - बोट लावेल तिथे गुदगुल्या
१० सप्टेंबर - आलिया अंगावर