सप्टेंबर २०२० मध्ये आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात सुमारे ४५ दिवस चाललेल्या युद्धात अझरबैजानने आर्मेनियाचा नामुष्कीजनक पराभव केला. रशिया आणि तुर्कीच्या मध्यस्तीने युद्धविराम लागू झाला. तेव्हापासून किरकोळ चकमकी वगळता दोन्ही देशांमध्ये शांतता आहे. युक्रेनमधील युद्धात रशिया गुंतला असल्याने आर्मेनियाला अझरबैजानकडून या संधीचा फायदा घेतला जाण्याची भीती आहे.
अझरबैजानच्या ‘कॅलिबर’ या वृत्तवाहिनीने इराणच्या सीमेवरून आर्मेनियामध्ये प्रवेश करणार्या वाहनांच्या ताफ्याचे फोटो प्रसिद्ध करून दावा केला की, त्यात भारताने पाठवलेली शस्त्रास्त्रे आहेत. ही शस्त्रास्त्रे इराणच्या ‘अब्बास’ या बंदरातून आर्मेनियाकडेरवाना झाली असून, त्यात ‘पिनाक’ ही मल्टिबॅरल रॉकेट प्रणाली असावी, असा अंदाज आहे. या प्रणालीने कारगिल युद्धात यशस्वी कामगिरी केली होती. एका ‘पिनाक एमके-१’ प्रणालीतून ४४ सेकंदांमध्ये १२ रॉकेटचा मारा करता येतो, तर एका बॅटरीद्वारे ७२ रॉकेटचा मारा करता येतो. ही रॉकेट १०० किलोपर्यंत स्फोटके वाहू शकतात. त्यांचा पल्ला ३८ किमी असून काही मिनिटांमध्ये ती ७०० गुणिले ५०० मीटरच्या युद्धक्षेत्रावरील लक्ष्यांना उद्ध्वस्त करू शकतात. ‘पिनाक’ प्रणाली वापरायला सोपी असून स्पर्धात्मकता आणि दर्जाच्या बाबतीत सर्वोत्तम आहे.
या बातमीची कंपनं केवळ अझरबैजानच नाही, तर तुर्की आणि पाकिस्तानमध्येही जाणवली. अझरबैजानच्या अध्यक्षांचे परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार हिकमत हाजियेव यांनी बाकूमधील भारताचे राजदूत श्रीधरन मधुसुदन यांना पाचारण करून त्यांच्याकडे आपला निषेध नोंदवला. सप्टेंबर २०२० मध्ये आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात सुमारे ४५ दिवस चाललेल्या युद्धात अझरबैजानने आर्मेनियाचा नामुष्कीजनक पराभव केला. रशिया आणि तुर्कीच्या मध्यस्तीने युद्धविराम लागू झाला. तेव्हापासून किरकोळ चकमकी वगळता दोन्ही देशांमध्ये शांतता आहे. युक्रेनमधील युद्धात रशिया गुंतला असल्याने आर्मेनियाला अझरबैजानकडून या संधीचा फायदा घेतला जाण्याची भीती आहे.
आर्मेनिया आणि अझरबैजान हे दोन्ही देश युरोपला आशियापासून विभागणार्या कॉकेशस पर्वतराजींच्या प्रदेशात येतात. आर्मेनिया हा ख्रिस्ती धर्म सर्वात प्रथम स्वीकारणार्या प्रदेशांपैकी एक आहे. अझेरी लोकसंख्या अझरबैजान, तुर्की आणि इराणमधील पश्चिम अझरबैजान या प्रदेशात विभागली गेली असल्याने इराण आणि अझरबैजान या दोन्ही शियापंथीय देशांचे एकमेकांशी पटत नाही. पण, सुन्नीधर्मीय तुर्की, पाकिस्तान आणि इस्रायलशी त्यांचे चांगले संबंध आहेत. शीतयुद्धाची समाप्ती होत असताना आर्मेनिया आणि अझरबैजान हे दोन स्वतंत्र देश झाले. त्यांच्यात सहा वर्षं चाललेल्या युद्धाला १९९४ साली विराम मिळाला. या युद्धात आर्मेनियाने देशप्रेम, कवायती सैन्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आकार आणि लोकसंख्येच्याबाबतील मोठ्या असलेल्या अझरबैजानच्या नागोर्नो-काराबाख या मोठ्या भागाचा लचका तोडला. ‘रिपब्लिक ऑफ आर्टझाख’ या नावाने ओळखला जाणारा हा प्रदेश जागतिक समुदायाच्या दृष्टीने अझरबैजानचा भाग असला तरी आर्मेनियाच्या ताब्यात होता. त्याच्या अवतीभवतीच्या अझरबैजानच्या प्रदेशातही आर्मेनियाचे सैन्य तैनात होते. या भागात आर्मेनियन वंशाच्या लोकांचे बाहुल्य असल्याने आर्मेनियाचात्यावर दावा होता.
मधल्या काळात अझरबैजानमध्ये कॅस्पियन समुद्राच्या परिसरात तेल आणि नैसर्गिक वायूचे मोठे साठे मिळाल्याने तो अतिशय श्रीमंत झाला. इस्रायलच्या मदतीने त्याने अत्याधुनिक शस्त्रास्त्रं मिळवली. दुसरीकडे समुद्रकिनारा नसलेला आर्मेनिया रशिया आणि इराण या दोन आंतरराष्ट्रीय निर्बंध असलेल्या देशांनी वेढला गेला असल्यामुळे तुलनेने गरीब राहिला. ‘कोविड-१९’च्याकाळात तुर्कीच्या पाठिंब्याने अझरबैजानने आर्मेनियाने ताब्यात घेतलेला प्रदेश मिळवण्यासाठी युद्ध छेडले. या युद्धात अझरबैजानने ड्रोनचा प्रभावी वापर करून आर्मेनियाच्या पारंपरिक सैन्याचे मोठे नुकसान केले. युद्धविराम करारानुसार या युद्धात अझरबैजानने ताब्यात घेतलेल्या प्रदेशांवर आर्मेनियाने पाणी सोडावे लागले. स्वतःच्या ताब्यात राहिलेल्या प्रदेशातही माघार घेऊन तिथे रशियन शांतीसेना तैनात केली. युक्रेनमधील युद्धाने रशियाला जेरीस आणले असून भविष्यात रशिया आर्मेनियाला किती शस्त्रास्त्रं विकू शकेल किंवा रशियाचे शांतीसैन्य किती काळ आर्मेनियात राहू शकेल, याबाबत शंका आहे. अझरबैजानची दोन भागांमध्ये विभागणी झाली असून त्यांच्या मधोमध आर्मेनिया आहे. तुर्कीच्या मदतीने आर्मेनियाच्या दक्षिणेतील प्रदेशातून या दोन भागांना जोडणारा मार्ग बनवल्यास आर्मेनियाला त्याच्या इराणच्या सीमेपासून तोडणेही शक्य होणार आहे. हे टाळण्यासाठी आर्मेनिया कसोशीने प्रयत्न करत आहे.
भारताचे आर्मेनिया आणि अझरबैजान या दोघांशी चांगले संबंध असले तरी आर्मेनियाने जम्मू-काश्मीर प्रश्नावर कायमच भारताला पाठिंबा दिला आहे. आर्मेनियनव्यापारी मुघलांच्या शासन काळात भारतात प्रवास करत असल्यामुळे दोन्ही देशांमध्ये अनेक शतकांपासून सांस्कृतिक संबंध आहेत. आर्मेनियाला मान्यता न देणारा पाकिस्तान हा एकमेव देश आहे. पाकिस्तानने अझरबैजानला वेळोवेळी सैनिक आणि शस्त्रास्त्रं पुरवली आहेत. सध्या अझरबैजान पाकिस्तानकडून चिनी बनावटीची ’जेएफ १७’ विमाने विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. इमरान खान पंतप्रधान असताना पाकिस्तान आखाती अरब देशांपासून दूर जाऊन तुर्कीच्या गटात सामील झाला. तुर्कीने अझरबैजानला मदत करून मुस्लीम विरुद्ध बिगर मुस्लीम देशांच्या संघर्षात आपण मुस्लीम देशांना विजयी होण्यास मदत करत असल्याचे चित्र उभे केले. तुर्कीच्या नादाला लागून अझरबैजाननेही वेळोवेळी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून भारतावर टीका केली. पाकिस्तान वगळता अन्य देशांनी काश्मीरचा मुद्दा छेडल्यास भारत त्यांना जशास तसे उत्तर द्यायला शिकला आहे.
आर्मेनिया आणि अझरबैजानमधील युद्धाच्या वेळेसही भारताने आर्मेनियाला सुमारे ३५० कोटी रुपयांचे स्वाती रडार पुरवले होते. पण, ते स्वसंरक्षणात्मक होते. गेल्यावर्षी आर्मेनियाचे संरक्षणमंत्री सुरेन पापकियान यांनी एका मोठ्या शिष्टमंडळासह भारतातील ‘डिफेन्स एक्स्पो’ला भेट दिली. त्यात आर्मेनियाने भारताशी दोन हजार कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रं खरेदीच्या करारांवर स्वाक्षर्या केल्या. आर्मेनियाने संपूर्णतः भारतीय बनावटीच्या पिनाक एमके एक रॉकेट प्रणालीची निवड केली. भारताकडे त्यांचा साठा असून जलदगतीने उत्पादन करता येऊ शकते. ही रॉकेट प्रणाली रशियन तंत्रज्ञानावर आधारित असल्याने ती आर्मेनियाच्या रशियन शस्त्रास्त्रांसोबत सहज वापरता येऊ शकते.
आर्मेनियाकडून पिनाक रॉकेट प्रणाली खरेदी हा भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांची पहिलीच निर्यात आहे. यापूर्वी निर्यात करण्यात आलेली शस्त्रास्त्रं अन्य देशांच्या उत्पादकांसोबत बनवण्यात आली होती. भविष्यात आर्मेनियाभारताच्या साथीने शस्त्रास्त्रं निर्मिती प्रकल्प सुरू करण्यासही इच्छुक आहे. खनिजसंपदा आणि समुद्र किनार्यांच्या अभावी आर्मेनिया गरीब असला तरी तिथे कुशल तंत्रज्ञ मोठ्या संख्येने आहेत. असे झाल्यास भारताला रशिया, तुर्की आणि इराणच्या मधोमध स्वतःचे लष्करी अस्तित्व निर्माण करता येईल. चीनच्या ‘बेल्ट रोड’ प्रकल्पाला पर्याय म्हणून भारत उत्तर दक्षिण मार्गिका विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी भारत, इराण आणि आर्मेनिया यांनी एक गटनिर्मिती केली आहे. इराण, आर्मेनिया आणि जॉर्जियामार्गे भारत रशियाशी व्यापार करू शकेल. इराण आणि रशियावरील आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे या मार्गिकेच्या व्यवहार्यतेबद्दल शंका असली, तरी त्यातून तुर्की आणि पाकिस्तानच्या महत्त्वाकांक्षांना शह देता येईल.
‘मेक इन इंडिया’ तसेच ‘आत्मनिर्भर भारत’च्या घोषणा देण्यापासून कूटनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या देशांना शस्त्रास्त्रं निर्यात करण्यापर्यंत भारताने मोठी मजल मारली आहे. भारत हा युद्धाचा नाही, तर गौतम बुद्धांचा आणि महात्मा गांधींचा देश आहे. भारताने केवळ स्वसंरक्षणापुरता विचार करावा, या वृत्तीला छेदून शस्त्रास्त्रांचा उत्पादक आणि निर्यातदार बनण्याला विरोध करणार्यांची संख्या मोठी आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वैचारिक गोंधळात न पडता, देशाला स्पष्ट दिशा दिली आहे. राष्ट्रहिताच्या दृष्टीने जे काही आवश्यक आहे, ते मानवतेच्या चौकटीत राहून करण्यास नवा भारत कटिबद्ध आहे.