‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने उठलेले वादळ आपण नुकतेच पाहिले. चित्रपटावर ‘काल्पनिक’ असा शिक्का मारणे सोपे आहे. पण, इस्लामीकरणाच्या सुसंघटित प्रयत्नांना बळी पडलेल्या व्यक्तीचे अनुभव कसे नाकारता येतील? इस्लामी कट्टरतेचे जळजळीत वास्तव स्वत: अनुभवलेल्या ओ. श्रुती यांनी आपल्या धर्मांतराची आणि परतीची कहाणी ‘स्टोरी ऑफ अ रिव्हर्जन’ या पुस्तकातून मांडली आहे, तर ‘रिबॉर्न’ या पुस्तकातून ख्रिश्चॅनिटीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या संती कृष्णा नावाच्या केरळच्याच एका स्त्रीची विदारक कहाणी त्यांच्याच शब्दांत...
श्रुती हव्यक ब्राह्मण कुटुंबातील मुलगी. आपला धर्म, पूजा-अर्चा या गोष्टी आपल्यापुरत्या असाव्यात आणि परधर्माचाही आदर करावा, हा संस्कार आईवडिलांच्या आचरणातून मनावर लहानपणापासूनच झालेला. बीएसाठी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यावर मात्र आपल्यावर झालेले संस्कार आणि वर्गातल्या मुस्लीम सहाध्यायांवरचे धार्मिक संस्कार यांची जातकुळी पूर्ण भिन्न असल्याचे श्रुतीच्या लक्षात येऊ लागले.वर्गामध्ये बहुसंख्येने असणार्या मुस्लीम विद्यार्थिनी मोकळ्या वेळामध्येही आपापसात सतत धार्मिक वाचन, चर्चा करत. श्रुतीला हिंदू धर्माबद्दल उलटसुलट प्रश्न विचारत आणि त्यांची उत्तरे श्रुतीकडे नसत. या वातावरणाचा श्रुतीवर परिणाम होऊ लागला. बीएचे तसेच पुढे एमएचे शिक्षण घेत असताना संभ्रमित श्रुतीला मुस्लीम मैत्रिणी, महाविद्यालयाच्या व्यवस्थापनातील व्यक्ती यांच्याकडून इस्लामच्या प्रभावाखाली आणण्याचे प्रयत्न सुरू झाले.
‘ब्रेनवॉशिंग‘
श्रुतीवर इस्लामचा प्रभाव पाडण्यासाठी हिंदू धर्माच्या नालस्तीचा मार्ग अवलंबला जाऊ लागला. हिंदू धर्मातील अनेकेश्वरवाद, प्राणिमात्रांमध्येही देव पाहणे, या गोष्टी इस्लामी श्रद्धांच्या विपरित असून, अशा धर्माच्या अनुयायांना अल्लाकडून कठोर शिक्षा मिळते, मृत्यूनंतर नरकामध्ये हालहाल केले जातात, असे तिच्या मनावर ठसवले गेले. झाकीर नाईक, नौशाद बक्वी यांच्यासारख्या विखारी धर्मप्रसारकांच्या चित्रफिती श्रुती पाहू लागली.अशा कडव्या शिकवणुकीचे परिणाम अनेक पदरी होते. कपाळावर साधा टिळा/कुंकू लावणे, हेही ‘संघाचे कडवे हिंदुत्व’ असल्याचे श्रुतीला पढवले गेले. हिंदू देवतांची वर्णने, मूर्ती यांमधून दिसणारे स्त्रियांचे पोषाख; स्त्रियांनी परपुरुषाशी मोकळेपणाने बोलणे, या गोष्टी अशिष्ट असून, हिजाब आणि बुरखा घातल्यानेच शीलरक्षण होते, असे बिंबवले गेल्याने श्रुतीने हिजाब वापरायला सुरुवात केली. ती बंद खोलीत नमाज पढू लागली. आईवडील इस्लाम पाळणारे नसतील, तर त्यांना स्वीकारू नका, अशा अर्थाच्या कुराणातील आयतीमुळे श्रुतीला त्यांच्याबद्दलही घृणा वाटू लागली. एके दिवशी तर मशिदीतून ऐकू येणार्या अजानची अधीरतेने वाट बघणार्या श्रुतीला पूजेचा प्रसाद घेऊन आलेल्या आईचाही अडथळा वाटला आणि संतापाच्या भरात तिने आईला थप्पड मारून दूर ढकलले!
अशा रितीने श्रुतीच्या श्रद्धेमध्ये संपूर्ण परिवर्तन होऊन मनाने (आणि खासगीत आचरणानेही) ती पूर्णपणे मुस्लीम बनली. फक्त धर्म स्वीकारण्याची औपचारिकता शिल्लक होती. ती पार पाडण्यासाठीच तिने घरातून पळ काढला आणि ती पोन्नानी येथील ‘मौनतुल इस्लाम सभा’ या धर्मांतर केंद्रामध्ये दाखल झाली. तिथे धर्मांतरासाठी ६५ स्त्रिया आलेल्या होत्या. त्यात काही ख्रिस्तीही होत्या. अनेक जणी आपल्या मुस्लीम प्रियकराने इस्लाम स्वीकारण्यासाठी टाकलेल्या दबावापोटी आल्या होत्या, तर काही जणी आर्थिक आमिषामुळे आल्या होत्या. श्रुतीला तिथेही अन्य धर्म सैतानाचे असून, त्यांचे अनुयायी मुस्लिमांचे शत्रू आहेत, असे कडवेपणाचे डोस पाजले गेले आणि कलमा पढवला जाऊन श्रुतीची ‘रहमत‘ बनली.
दरम्यान, हवालदिल झालेल्या आईवडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची पोलिसांमध्ये तक्रार केली होती. चौकशीची चक्रे फिरली आणि पोलिसांनी रहमतला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. तिथेही ती धर्मपरिवर्तनावर ठाम होती. परंतु, आईवडिलांची केविलवाणी अवस्था पाहून ती केवळ दोन दिवस त्यांच्यासोबत राहण्यासाठी तयार झाली.घरी घेऊन गेल्यावर आईवडिलांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करूनही तिच्यावर काहीही परिणाम न झाल्याने तिला विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पोन्नानी येथील ‘आर्ष विद्या समाज’ या संस्थेच्या योगकेंद्रात पाठवले गेले. तिथे आचार्य मनोज यांनी रहमतच्या सर्व शंकांचे निरसन करण्याची तयारी दाखवली. कुराण आणि हदीसमधील उदाहरणे एव्हाना तोंडपाठ असणार्या रहमतने त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आपल्या जुन्या धर्मातील तथाकथित कुरिती आणि नव्याने स्वीकृत धर्मातील उदात्तता या गोष्टी ठासून सांगितल्या.
आचार्य मनोज अशा प्रकारच्या प्रकरणांशी सरावलेले होते. त्यांनी तीन तास चर्चा करून तिच्या प्रत्येक शंकेचे आणि आरोपाचेही उदाहरणाच्या साहाय्याने उत्तर दिले. अखेर तिच्या डोक्यातले इस्लामचे भूत उतरले. आपल्याला फसवून अर्धवट माहिती दिली गेली होती, याची जाणीव झालेली रहमत पुन्हा एकदा ‘श्रुती‘ बनली. एवढेच नव्हे, तर ती ‘आर्ष विद्या समाजा’ची पहिली पूर्णवेळ महिला कार्यकर्ती बनली. आज श्रुती ज्येष्ठ कार्यकर्त्या बनल्या असून, अनेक भ्रमित हिंदू तरुण-तरुणींना स्वधर्माकडे घेऊन येत आहेत.ही आहे एक जीवंत ‘केरला स्टोरी.’ दुर्दैवाने ती एकमेव नाही आणि ती फक्त इस्लामच्या प्रसारापुरतीही मर्यादित नाही. कारण, याच्याशीच मिळतीजुळती कहाणी आहे, ‘ब्रेनवॉशिंग’ झाल्याने ‘ख्रिश्चॅनिटी‘च्या उंबरठ्यावर पोचलेल्या संती कृष्णा नावाच्या केरळच्याच एका स्त्रीची.
‘ख्रिश्चॅनिटी’चा फास
संती कृष्णा नायर कुटुंबातील तरुणी. नर्सिंगचे शिक्षण घेत ती एका मोठ्या अपघातात सापडली. त्यातून सावरण्यासाठी ख्रिश्चन मित्रमंडळींकडून चर्चमध्ये नियमित प्रार्थना केल्या गेल्यामुळे तिला ‘ख्रिश्चॅनिटी‘बद्दल ममत्व वाटू लागले. त्यांच्या ख्रिस्ती धर्मावरच्या निष्ठेमुळे कृष्णावर मोठा प्रभाव पडला.परदेशात नोकरी करण्याच्या उद्देशाने कृष्णाने (खएङढडच) क्लास लावला होता. तसेच, रिक्रुटमेंट एजन्सीमध्येही नाव नोंदवले होते. या दोन्हीही ख्रिस्ती व्यवस्थापन असलेल्या संस्था होत्या. क्लासमध्ये इंग्रजीमध्ये संभाषण करण्यासाठी दिले जाणारे विषयही ‘ख्रिश्चॅनिटी’संबंधितच असत. रिक्रुटमेंट एजन्सी तर एवढी फसवी होती की, तिथे परदेशी नोकरी मिळावी, यासाठी काहीही प्रयत्न न करता कृष्णाला फक्त आणि फक्त ख्रिस्ती धार्मिक साहित्य पुरवले गेले.
अखेर जेव्हा कृष्णाला मालदीवला जायला मिळाले, तेव्हा तिथेही तिला बहुतांशी ख्रिश्चन सहकारीच मिळाले. त्यांच्याकडून उघडपणे हिंदू धर्माची नालस्ती होत असे आणि ‘ख्रिश्चॅनिटी’चे गोडवे गायले जात. त्या प्रभावाखाली येऊन तिची वर्तवणूक बदलू लागली. ते पाहून तिथल्या एका परिचित हिंदू व्यक्तीने तिच्या घरी सर्व परिस्थिती कळवली. कृष्णाच्या वडिलांनी काळजीपोटी अंथरूण धरले. ते ऐकून अगदी उपकार केल्याप्रमाणे त्यांची भेट घेऊन कृष्णा घरातून निघून गेली आणि गुपचूप एका ख्रिस्ती मिशनच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी नोकरी करू लागली. पालकांनी कृष्णा बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली. अखेर पोलिसांनी तिचा शोध लावून तिला न्यायालयात हजर केले गेले. परंतु, ती सज्ञान असल्याने न्यायालय तिच्यावर जबरदस्ती करू शकत नव्हते.
नव्याने स्वीकारलेल्या श्रद्धेला आपण अंतर देणार नसल्याचे स्पष्ट करून तिथून निघालेल्या कृष्णाला तिच्या आईवडिलांनी संघाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने वाटेतच अडवले आणि सक्तीने आपल्यासोबत घरी नेले. काही दिवसांतच कृष्णालाही ‘आर्ष विद्या समाजा’त आणले गेले. तिथे तिचीही आचार्य मनोज यांच्यासोबत वैचारिक लढाई झाली. परंतु, त्यांच्या ज्ञानासमोर तिचा टिकाव लागला नाही. धर्मांतराच्या उंबरठ्यावर उभी असलेली कृष्णा आपल्या मुळांकडे परतली.
अनुभवांतले साधर्म्य
श्रुती आणि कृष्णा यांनी अनुभवलेल्या धर्मांतराच्या कार्यपद्धतीमध्ये विलक्षण साम्य आहे. केरळमध्ये असणारी अहिंदूंची मोठी संख्या, त्यांच्या प्रभावी धार्मिक संस्था, आपल्या धर्माप्रती असणारी त्यांची कडवी निष्ठा, कुठलीही भीडभाड न बाळगता केला जाणारा स्वधर्माचा आक्रमक प्रसार आणि हिंदू धर्माबाबत पसरवला जाणारा विखार, शिक्षण संस्थांच्या माध्यमातून या प्रयत्नांना संपूर्ण बळ पुरवणे, हे सगळेच सारखे आहे आणि हो सारखे आहे, ते हिंदूंचे आपल्या धर्माबद्दलचे अज्ञान आणि औदासिन्य!दोघींनी सांगितलेले अनुभव अस्वस्थ करणारे आणि असंख्य प्रश्नांचे मोहोळ उभे करणारे आहेत. शिक्षिका म्हणून शिकवत असताना अवघ्या सहावीतल्या मुस्लीम विद्यार्थ्याने श्रुती यांना उघडपणे धर्मांतर केल्यास सात लाख रुपये मिळवून देण्याची ‘ऑफर‘ देण्याचा प्रसंग वाचताना धक्का बसल्याशिवाय राहात नाही. सार्वजनिक प्रार्थनेत सहभागी न होणारे, पूजेचा प्रसाद म्हणजे ‘सैतानी’ गोष्ट आहे, असे समजणारे नि त्याचवेळी कृष्णा यांना बायबल मात्र चटकन देणारे सहाध्यायी बघितले की, धर्मप्रसाराचे महत्त्व लहान वयातच किती खोलवर भिनवले जाते, याची जाणीव होते.
शंका निरसन
प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शंका निरसन, तात्त्विक चर्चा करण्याची परंपरा हिंदू धर्मामध्ये पूर्वापार आहे. कठोपनिषदातील नचिकेता-यम संवाद, महाभारतातील यक्ष-युधिष्ठिर प्रश्नोत्तरे ही याची ठळक उदाहरणे. दुर्दैवाने काळाच्या ओघात आपण ही परंपरा विसरलो आणि अजाणत्या वयामध्ये मुलांना पडणार्या प्रामाणिक प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी त्यांना गप्प बसवण्याचा प्रघात पडला. अन्य धर्मीयांमध्ये लहान वयापासून असणारी जागरूकता बघणार्या श्रुती म्हणतात, “मी घरी माझ्या धर्माबद्दल शंका विचारल्या असत्या, तर त्यांची उत्तरे देण्याऐवजी मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले असते.“ योग्य वेळी शंका निरसन न झाल्याने श्रुती हिंदू धर्मापासून किती लांब गेल्या, हे पुस्तकामधून दिसून येतेच.
सुदैवाने आचार्य मनोज यांनी श्रुती आणि कृष्णा यांच्या धर्मविषयक प्रश्नांची उत्तरे दिली. आचार्य मनोज यांनी केलेले सविस्तर शंका निरसन हे वर उल्लेखलेल्या परंपरेचीच आठवण करून देणारे आहे. त्यामध्ये हिंदू धर्म आणि इतर धर्मांमधली अध्यात्मिकता, अनुयायांना दिले जाणारे स्वातंत्र्य अथवा घालण्यात येणारी भीती, पाप-पुण्य किंवा स्वर्ग-नरक संकल्पना, धर्माची उद्दिष्टे अशा अनेक मुद्द्यांच्या अनुषंगाने कोणते फरक आहेत, यावर धर्मग्रंथांमधील उदाहरणांसह विवेचन केले आहे. दोन्ही पुस्तकांचा मोठा भाग या प्रश्नोत्तररूपी संवादांनीच व्यापला आहे. तोच दोन्ही पुस्तकांचा खर्या अर्थाने गाभा आहे.
कार्यकर्त्यांची खंत
इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मामध्ये प्रार्थनास्थळे आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या संस्थांमध्ये धार्मिक शिकवण देण्याची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असते. त्याला पूर्णपणे कौटुंबिक आणि संस्थात्मक पाठबळ मिळते. या उलट हिंदूंकडे मूलभूत धार्मिक शिक्षण देणारी सुसज्ज यंत्रणाही नाही आणि चौकस हिंदूंना धर्माबद्दल असणार्या शंकांचे निरसन करण्याची व्यवस्था नाही, ही श्रुती आणि कृष्णा या दोघींची मोठी खंत आहे. ‘सुसज्ज, सुसंघटित अब्राहमी धर्म विरुद्ध कोणतीही तयारी नसणारे बेसावध हिंदू‘ असा हा असमान सामना आहे. म्हणूनच ‘आर्ष विद्या समाज’तर्फे सनातन हिंदू धर्माचे मूलभूत शिक्षण देणारे अभ्यासक्रम चालवले जातात. या पुस्तकांच्या शेवटी संस्थेच्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली आहे. ‘आर्ष विद्या समाज’तर्फे मोठ्या प्रमाणावर ‘घरवापसी‘चे कार्य केले जाते. त्यापैकी श्रुती, कृष्णा आणि अन्य तीन स्त्रियांच्या आत्मकथा पुस्तकरूपाने प्रकाशित केल्या गेल्या आहेत.
याशिवाय पुस्तकात व्यक्त केलेली दुसरी खंत स्वगृही परतलेल्या हिंदूंच्या वर्तनाबद्दल आहे. अनेकदा हिंदू धर्मापासून दूर गेलेले आपले अपत्य परत आणा म्हणून आईबाप कार्यकर्त्यांच्या अक्षरशः हातापाया पडतात. पण एकदा मुलगी परत आली की, ती अथवा तिच्या घरची मंडळी त्यानंतर धर्मजागृतीच्या कार्याला कोणताही हातभार लावत नाहीत, असा अनुभव आहे. हिंदूंचा आपल्यापुरते पाहण्याचा स्वभाव खेदजनक आहे.
अखंड सावधान असावे
खरंतर भारतीय दंडविधान क्रमांक ’२९५ अ‘ नुसार एखाद्या धर्माविरुद्ध द्वेष पसरवणे अथवा वाईट हेतूंनी निंदानालस्ती करणे, दंडनीय अपराध आहे. परंतु, धर्मांतराचा बाजार इतका तेजीत चालत असूनही दोषींवर कोणतीही कारवाई केली जात नाही, हे खेदजनक आणि संतापजनकही आहे.ही दोन्ही पुस्तके केरळमधील चिंताजनक परिस्थितीची कल्पना देतात; पण हे फक्त केरळपुरते मर्यादित आहे, असे समजणे म्हणजे आत्मवंचना ठरेल. डोळे उघडून पाहिले, तर आपल्या आजूबाजूलाही अशी अनेक उदाहरणे दिसतील. आपापल्या धार्मिक श्रद्धा जपताना, वाढवताना दुसर्या धर्माबद्दल विखार का पसरवला जातो, याचे उत्तर हवे असेल आणि त्याविरुद्ध लढायचे असेल, तर धर्मांच्या अभ्यासाला पर्याय नाही. सर्वधर्मीय ग्रंथांचा सखोल अभ्यास आणि सदैव सतर्कता, आणि संघटन ही तीन आयुधेच हिंदू समाजाला धार्मिक आक्रमणापासून वाचवू शकतात, हेच या दोन्ही
पुस्तकांमधून अधोरेखित होते.
पुस्तकाचे नाव : ‘स्टोरी ऑफ अ रिव्हर्जन’
लेखिका : ओ. श्रुती
पृष्ठसंख्या : १७९
मूल्य : १८० रु.
-----------
पुस्तकाचे नाव : रिबॉर्न
लेखिका : संती कृष्णा
प्रकाशक : बौद्धिकम् बुक्स
पृष्ठसंख्या : १६२
मूल्य : १७० रु.