नामे पाषाण तरले...

05 Jul 2023 22:32:15
Article On Ramnam
 
बुद्धिवंत हनुमानाने सुचवले की, रामाचे सामर्थ्य अफाट असल्याने त्याच्या नामाचे दगड बुडणार नाहीत. या रामनामाच्या दगडांनी अल्पावधीत सेतू बांधणे शक्य झाले. म्हणून समर्थ म्हणतात की, रामनामाने पाषाण तरले. भगवंताच्या नामाने निश्चितपणे (नेमस्त) पाषाणांना तारले. तसेच अनेक देहधारी पाषाणांना रामनामाने तारले आहे.

मनाच्या श्लोकातील श्लोक क्र. ९७ वर मागील लेखात चर्चा केली होती. श्लोक क्र. ८१ पासून समर्थ, भगवंताच्या नामाचे श्रेष्ठत्व, नामाची आवश्यकता वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगत आले आहेत. तसेच यापुढील चार श्लोकांतूनही ते नाममहात्म्य सांगणार आहेत. त्यातील विचारांच्या पुष्ट्यर्थ स्वामी मधून पौराणिक कथांचे दाखले देत असतात. ही पौराणिक उदाहरणे त्या काळच्या लोकांना माहीत होती. आज पुराणकथा म्हणून आपण त्या कथांकडे दुर्लक्ष करतो. तसेच, त्या कथा माहीत असणारी पिढी हळूहळू संपत आहे. या पौराणिक कथा शालेय शिक्षणाचा भाग होऊ शकत नसल्याने नवी पिढी त्याबाबत अनभिज्ञ आहे. ही पिढी वेगळ्या विचारप्रवाहात वाढत आहे. आज सर्वांचाच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. सभोवतालच्या भौतिक पसार्‍यात माणूस स्वतःच हरवला आहे. विज्ञान रोज नवे नवे आश्चर्यकारक शोध लावत आहे.

मानवाने आपल्या बुद्धीकौशल्याच्या जोरावर पदार्थ विज्ञानाच्या प्रगतीतून अनेक सुखसोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यातून जीवनाचा आस्वाद घेण्याची सोय निर्माण झाली. स्वामींनी प्रपंच नेटका करताना ऐश्वर्य प्राप्त करायला सांगितले आहे. जीवनाचा रसिकतेने आस्वाद घेण्यात काही गैर आहे, असे स्वामींनी कोठेही सांगितलेले नाही. परंतु, त्या अनुषंगाने उद्भवणार्‍या दुष्परिणामांची जाणीव करून द्यायला समर्थ विसरले नाहीत. तसेच, या दुष्परिणामांच्या बाधेपासून वाचण्यासाठी रामनामासारखा सोपा उपाय त्यांनी सांगितला आहे. प्रापंचिक सुखसोयींच्या उपभोगातून उत्पन्न होणारा अहंभाव किंवा अहंता गुण कसा फुकटच्या यातना निर्माण करतो, हे स्वामींनी श्लोक क्र. ९७ मध्ये सांगितले आहे. अहंता गुणाचा सूक्ष्म विचार करताना लक्षात येते की, समाजातील भांडणे, मारामार्‍या, द्वेष, मत्सर हे या अहंता गुणाचे फलित आहे. इतकेच नव्हे, तर उच्चभ्रू समजले जाणार्‍या लोकांचे आरोप-प्रत्यारोप, अश्लाघ्य निंदानालस्ती हे प्रकार त्यांच्या अतीव अहंभावातून आले आहेत, हे उघड आहे. या ठिकाणी ‘मी श्रेष्ठ’ या भावनेतून सारे उद्भवलेले असते. ऐहिक सुखसोयींची हाव करण्यातून आलेली अहंभावाची ही कडू फळे आहेत.

वस्तुत: माझ्या श्रेष्ठत्वाला मर्यादा आहेत, श्रेष्ठत्वासाठी प्रचंड चढाओढ आहे, त्या स्पर्धेतदुःखाशिवाय काही वाट्याला येत नाही. श्रेष्ठत्वाबद्दल बोलायचे, तर भगवंत हाच सर्वश्रेष्ठ असून, त्याच्या नामसाधनेने अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय समाधान मिळणार नाही आणि अहंकाराच्या दुष्परिणामांची जाणीव होणार नाही. स्वामी मागील ९७व्या श्लोकात म्हणाले की, ’मुखीं नाम नाही तथा मुक्ति कैंची.’ परंतु, अहंकाराने पछाडलेले लोक म्हणू लागले की, आम्हाला मुक्तीची जरूरी नाही, आम्हाला अहंकार, द्वेष, मत्सर यात आनंद मिळत आहे. तथापि असे अविचारी जीवन माणसाचा घात करते. भगवंताच्या नामाशिवाय आत्मचिंतन घडत नाही आणि आत्मचिंतनाशिवाय मानवाचा उद्धार शक्य नाही.

अविचारी माणसाचे जीवन हे एखाद्या पाषाणाप्रमाणे असते. कारण, अविचारी मनुष्य आपल्याच अहंकारात, श्रेष्ठत्वाच्या मस्तीत, द्वेष, मत्सरात मग्न असतो. त्याची प्रगती कुंठित झालेली असते. पाषाण स्वत: कसलीही धडपड करीत नसल्याने पाण्यात टाकला की तो बुडणार हे ठरलेले असते. अध्यात्म विचारात संसाराला भवसागराची दिलेली उपमा सर्वपरिचित आहे. सर्व संतांनी भवसागराची कल्पना उचलून धरली आहे. पाषाण जसा पाण्यात टाकल्यावर बुडतो, तशी अविचारी, अहंकारी भगवंतावर विश्वास न ठेवणारी माणसे भवसागरात अवगुणांमुळे गटांगळ्या खात बुडणार आहेत, असा संतांचा अभिप्राय असतो. समर्थ या विचाराला पुढे नेऊन पुढील श्लोकात सांगत आहेत की, रामनामाने पाषाणसुद्धा तरले, मग ते नाम जीवांना तारेल यात शंका कसली घेता? तो श्लोक असा आहे.
हरीनाम नेमस्त पाषाण तारी।
बहू तारिले मानवदेहधारी।
तया रामनामी सदा जो विकल्पी।
वदेना कदा जीव तो पापरूपी॥९८॥
या श्लोकातील पहिल्या ओळीचा संबंध रामायणातील सेतू बांधण्याच्या कथेशी आहे. रामायणाची कथा सर्वांना माहीत आहे. रावणाने कपट करून सीतेला पळवले. तिला लंकेत नेऊन ठेवले. सीतेचा शोध लागल्यावर रामाने समुद्र ओलांडून वानरसैन्यासह दुष्ट रावणाच्या लंकेवर स्वारी करायचे ठरवले. परंतु, मध्ये आलेला सागर ओलांडायचा होता. रामाच्या सैन्यात नल-नील हे स्थापत्यविशारद होते. त्यांना आपल्या ज्ञानाचा, कलेचा गर्व झाल्याने त्यांचा सागरावर पूल बांधण्याचा प्रयत्न यशस्वी होईना. बांधकामाचे दगड पाण्यात बुडू लागले. अशावेळी बुद्धिवंत हनुमानांनी सुचवले की, रामाचे सामर्थ्य अफाट असल्याने त्याच्या नामाचे दगड बुडणार नाहीत. या रामनामाच्या दगडांनी अल्पावधीत सेतू बांधणे शक्य झाले. म्हणून समर्थ म्हणतात की, रामनामाने पाषाण तरले. भगवंताच्या नामाने निश्चितपणे (नेमस्त) पाषाणांना तारले. तसेच अनेक देहधारी पाषाणांना रामनामाने तारले आहे. या ठिकाणी काही अभ्यासक गौतम ऋषींच्या शापाने शिळा होऊन पडलेल्या सती अहिल्येचा उल्लेख करतात.

पण, तो तितकासा सुसंगत वाटत नाही. अहिल्या रामनामाने, रामाच्या पदस्पर्शाने शिळामुक्त झाली, हे खरे. पण, ती मानवदेहधारी पाषाण नव्हती. तिच्या रामनाम तपस्येने, रामांनी तिला पदस्पर्शाने शिळामुक्त केले. तिचा उद्धार केला. ती महान पवित्रता व रामभक्त होती, मानवदेहधारी पाषाण नव्हती! बहू तारिले मानवदेहधारी पाषाण’ असे समर्थ म्हणतात. तेव्हा त्याचा अर्थ अनधिकारी व्यक्तीसुद्धा रामनामाने हा भवसागर तरून जातात, असा होतो. रामनामाने अनेक अनधिकारी जीवांना भवसागरात बुडू दिले नाही. त्यांची आध्यात्मिक पातळी उंचावून, उद्धरून नेले. असे असले तरी काही माणसे नेहमी रामनामाबद्दल संशय उत्पन्न करतात. हे रामनाम तारुन नेते हे खरे आहे का? असे विकल्प निर्माण करून लोकांच्या मनात भ्रम निर्माण करीत असतात. आपल्या मनातील शंकांमुळे ते रामनाम घेत नाहीत आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. म्हणून समर्थांनी या श्लोकाच्या शेवटच्या ओळीत ’जीव तो पापरूपी’ असा त्यांचा निर्देश करून त्यांचे खरे स्वरूप उघड केले आहे. अशा पापरूपी जीवांच्या नादी न लागता माणसाने रामनामाचे सामर्थ्य ओळखून आपला उद्धार करून घ्यावा. समर्थांनी दासबोधातही सांगितले आहे,
‘नामें पाषाण तरले।
असंख्यात भक्त उद्धरले। (४.३.१८)’

७७३८७७८३२२
Powered By Sangraha 9.0