आपल्या आजूबाजूला असलेल्या वनसंपदेमधून हजारो स्थानिकांच्या हाती ‘शाश्वत रोजगाराचं’ रोपटं देऊन त्याचं योग्य संवर्धन करायला शिकवणार्या योगेश फोंडे यांच्या हरितकार्याचा घेतलेला आढावा...
पर्यावरणाशी नाळ जोडलेली असल्यामुळे, शाश्वत रोजगाराची संकल्पना राबविणार्या योगेश फोंडे यांचं मूळ गाव कोल्हापुरात असलं, तरी त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातला. कोल्हापूर या त्यांच्या मूळ गावी त्यांचं दहावीपर्यंतचे शिक्षण झालं. पुढे त्यांनी ’एमसीव्हीसी’ या नावाचा एक व्यवसायाभिमुख कोर्सही केला. इतिहासात पदवी मिळवलेल्या योगेश यांनी पुढे पत्रकारितेचे शिक्षण ही घेतले. त्यानंतर टसर रेशीम उत्पादनामध्ये डॉ. ओम प्रकाश कलमे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्थानिक लोकांनी अवलंबलेल्या तंत्रज्ञानाचा अभ्यास’ या विषयात ‘डॉक्टरेट’ मिळवली. पण, त्यांना प्राध्यापकी करण्यात फारसा रस नव्हता, प्रत्यक्ष काम करण्यावर त्यांचा विशेष भर. या गोष्टी लक्षात घेता, कोल्हापुरातील सुभाष पाटील यांनी आंबा येथे राहण्याची सोय केली आणि दि. १ जानेवारी २०१५ पासून सह्याद्रीमधील कामाचा शुभारंभ केला.
’पीएचडी’च्या काळात टसर रेशीमसाठी ज्या-ज्या गावांशी पूर्वी संपर्क आला होता, त्यांच्यापासून सुरुवात केली. मधपाळ झाडाच्या खाली आग लावून मधमाशांना हाकलवून मध काढतात व यामध्ये मधमाशांचे मोठे नुकसान होते. यासाठी मधमाशी संवर्धन करण्याची गरज आहे. यातूनच २०१६ मध्ये त्यांनी पहिल्यांदा ’मधमाशी संवर्धन प्रकल्प’ सुरू केला. यात मधपाळांना प्रशिक्षित करून मधमाशांना त्रास न देता, मध गोळा करायला शिकवले जाते. पुढे २०१७ साली शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ. निखील गायकवाड यांच्याकडे स्थानिक भात वाणाचे जतन करण्याचा एक प्रकल्प होता. यातूनच जतन केलेल्या जुन्या बियाणांचे संकलन करून ते १४ गावांमध्ये लागवडीसाठी वाटले गेले. यातूनच ‘स्थानिक भात वाण पिकांचे जतन’ हा प्रकल्प सुरू झाला. आता त्याची ‘सीड बँक’ २८ गावांमध्ये तयार झालेली आहे.
२०१८ मध्ये कोल्हापूर तत्कालीन उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांच्या पुढाकारातून ‘वनअमृत’ प्रकल्पाचा जन्म झाला. स्थानिकांना त्यांच्याच उत्पादनांमधून रोजगार निर्मिती करून देण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीला बरकी, येळवण जुगाई आणि बोरबेट या तीन गावांपासून सुरुवात झालेला ‘वनअमृत’ प्रकल्प आता १४ गावांमध्ये राबविण्यात येतो. या प्रकल्पात करवंद, जांभूळ, आंबा, फणस यांसारख्या फळांवर प्रक्रिया करून त्यापासून गावकर्यांनीच तयार केलेल्या विविध उत्पादनांची विक्री केली जाते.
आधीचे तपशील पाहता, सह्याद्रीच्या विराट जंगलांमध्ये उगवणारी फळसंपदा केवळ पाच ते दहा टक्के इतकीच वापरली जात होती. जवळजवळ ८५ टक्के फळे वाया जायची. शिवाय मुळातच रोजगार नसलेल्या गावात शाश्वत रोजगार निर्माण करण्याची ही सुवर्णसंधी होती. २०१९ मध्ये उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला यांची बदली झाली आणि प्रकल्प गुंडाळला जातो की काय, अशी भीती होती. पण, त्याचवेळी मुख्य वनसंरक्षक म्हणून डॉ. व्ही क्लेमेंट बेन यांची नियुक्ती झाल्यामुळे पुढे हा प्रकल्प आणखी विस्तारास लागला. डॉ. बेन यांनी योगेश फोंडे यांची उपजीविका तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली. तसेच, मधमाशी संवर्धन प्रकल्प, टसर रेशीम, भातबियाणे प्रकल्प तसेच ‘वनअमृत’ प्रकल्पाचा पाच जिल्ह्यांमध्ये विस्तार करून काम सुरू केले. या पाच जिल्ह्यांतील १ हजार, १०० गावांपर्यंत पोहोचण्याचा मानस ठेवला. या १ हजार, १०० गावांमध्ये वनसंवर्धनाची तसेच शाश्वत रोजगाराची संकल्पना रुजवायची, हे त्यामागचे उद्दिष्ट. तसेच, हा प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हा नियोजन समितीकडून आवश्यक निधी मिळवून दिला.
यातूनच वनसंवर्धन आणि शाश्वत रोजगाराची एक चळवळ रुजली. शाहुवाडी ते चंदगड या सात तालुक्यांतील दहा गावांची निवड करून तिथेच कौशल्य विकास प्रशिक्षण, प्रक्रिया मशिनरी आणि त्यातून निर्माण केलेली उत्पादनाची केंद्र उभारली गेली. करवंद, जांभूळ, आंबा, फणस, काजुबोंड, कोकम, तांदूळ, नाचणी, शिकेकाई, हिरडा, बेहडा ही पिके फळ वाया जात होती. या कामाला लोकसहभागामुळे यश प्राप्त झाले. साधारण १०-२० टक्के लोकसहभाग मिळेल, एवढीच अपेक्षा असताना जवळजवळ ९९ टक्के लोक आज यामध्ये सहभागी झालेले आहेत. ग्रामीण भागातील महिला बचतगटांचा या प्रकल्पाला मोठा फायदा मिळाला. हा प्रकल्प गावात आला, तर सुखी-समाधानी जीवन इथेच मिळू शकेल आणि गावाचे नंदनवन होईल, ही भावना आणि विश्वास गावकर्यांमध्ये निर्माण करण्यात फोंडे यशस्वी ठरले. म्हणूनच, ‘वनअमृत’ प्रकल्प, भात जतन प्रकल्प, टसर रेशीम प्रकल्प, मधमाशी संवर्धन प्रकल्प, ऐन डिंक प्रकल्प, काजू बोंड प्रकल्प, वनअमृत हर्बल प्रकल्प, जंगल आंबा जतन प्रकल्प, जंगल वृक्षवाटिका प्रकल्प, वन्यजीव बचाव प्रकल्प, द्राक्ष फळ प्रक्रिया प्रकल्प आणि कारवी संवर्धन प्रकल्प अशा १२ प्रकल्पांचा समावेश यात केला गेला आहे.
अधिकाअधिक विस्ताराच्या दृष्टीने या प्रकल्पाचे ‘सह्याद्री रक्षणार्थ मोहीम’ या नावाने काही दिवसांपूर्वीच लोकार्पण संपन्न झाले. हजारो हातांना शाश्वत रोजगार दिलेल्या आणि पुढेही देणार्या या प्रकल्पाचे जनक योगेश फोंडे यांच्या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!