काका-पुतण्याच्या राजकारणाचं भूत पवारांच्या मानगुटीवर!

04 Jul 2023 19:33:11
sharad
 
साल होत १९७८. महाराष्ट्रामध्ये वसंतदादांच सरकार स्थापन होऊन जेमतेम तीन-चार महिन्याचा काळ उलटला होता. याच सरकारमधील एक ३८ वर्षांचा युवा मंत्री मुख्यमंत्री पदाच्या महत्वकांक्षेपाई वसंतदादांच्या विरोधात बंड करतो आणि विरोधी गटात सहभागी होऊन. मुख्यमंत्री होतो. आणि हे युवा बंडखोर मंत्री होते शरद पवार. तेच शरद पवार जे वसंत दादांना जाहीर सभेत पितातुल्य व्यक्तीमहत्व मानत. त्यावेळी वसंत दादा म्हणाले होते की, माझ्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसला. कालच महाराष्ट्राच्या चालू असलेल्या घडोमोडींवर प्रतिक्रिया देतांना शालिनीताई म्हणाल्या, आज वसंतदादांच्या आत्म्याला शांती लाभली असेल. शरद पवारांनी जे वसंतदादांसोबत केल तेच आज पवारांसोबत सोबत होतयं.
 
पण शरद पवारांनी फक्त वसंतदादा विरोधातचं बंड केला नाही. तर राज्याच्या राजकारणात अनेक काका-पुतण्यात देखील कलह निर्माण करण्याच काम केलय. आज जरी शरद पवार आपल्या पुतण्याच्या बंडाने घायाळ झाले असले तरी त्यांनी स्वत: अनेक पुतण्यांना आपल्याच काकांच्या विरुध्द उभ केलं होत. हा राजकीय इतिहास सांगतो.
 
शरद पवारांनी काका-पुतण्याच्या राजकारणातील सर्वात मोठा डाव खेळला तो गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात. गोपीनाथ मुंडे हे मराठवाड्यातच नाहीतर राज्यात भारतीय जनता पक्षाचे सगळ्यात मोठे नेते होते. महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा म्हणून त्यांची ओळख. काकांच्या हाताला धरून धनंजय मुंडे राजकारणात आले. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष देखील झाले. त्यांना गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केल. पण परळी विधानसभा मतदारसंघात गोपीनाथ मुंडेनी पंकजा मुंडे ना आमदारकीच तिकीट दिलं आणि यामुळेच नाराज असलेल्या धनंजय मुंडेनी काकांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. धनंजय मुंडे यांच्या या बंडाला शरद पवारांची फूस आहे, असा आरोप त्यावेळी गोपीनाथ मुंडेंनी केला होता.
 
यावरच बोलतांना एका सभेत गोपीनाथ मुंडे म्हणाले होते, काय झालंय या राज्यातल्या सगळ्या पुतण्यांना, बाळासाहेबांना त्रास झाला मला त्रास झाला. त्यामुळे आता शरद पवार तुमची बारी आलेली दिसतेयं.दोन दिवसांपासून हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. आज गोपीनाथ मुंडेचे हे शब्द खरे ठरल्याच्या भावना अनेक जण व्यक्त करतायंत. पण आपण धनंजय मुंडेंची राजकीय कारकीर्द पाहिली तर आज आपल्या लक्षात येईल की, ते आज एक यशस्वी राजकारणी झालेत. राष्ट्रवादीत जाताच त्यांना गोपीनाथ मुंडेंना शह देण्यासाठी विधानपरिषदेमध्ये आमदार केलं. गोपीनाथ मुंडेंच्या हयातीतच धनंजय मुंडेंनी परळी नगरपालिकेवर विजय मिळवला. यानंतर त्यांना २०१४ मध्ये राष्ट्रवादी कडून विधानपरिषदेच विरोधीपक्ष नेते पद देण्यात आल. तेव्हा शरद पवारांच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होत. राष्ट्रवादीत एवढी दिग्गज मंडळी असतांना शरद पवारांनी पंकजा मुंडेंना पर्याय निर्माण करण्यासाठी त्यांना एवढी मोठी जबाबदारी देण्यात आली होती. ज्या कारणासाठी २०१९ धनंजय मुंडे यांनी काकांची साथ सोडली होती. त्या परळी मतदार संघाचे ते २०१९ ला राष्ट्रवादी कडून आमदार ही झाले. पण आज शोकांतिका अशी आहे की, ज्या धनंजय मुंडेंना शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात उभं राहण्यासाठी ताकद दिली. तेच धनंजय मुंडे आज पवार काका-पुतण्याच्या वादात पुतण्याच्या म्हणजे अजित पवारांच्या साईडने उभे आहेत.
 
यानंतर काका-पुतण्याचा आणखी एका संघर्षात शरद पवारांनी महत्वाची भुमिका बजावली. ती म्हणजे बीडच्या क्षीरसागर घराण्यात. क्षीरसागर घराण्यातील जवळपास सर्वच मंडळी राजकारणात आहेत, यांची सुरुवात केली होती केशरकाकूंनी. त्या तीनवेळा बीडच्या खासदार राहिल्या. त्याचेच पुत्र जयदत्त क्षीरसागर हे त्यानंतर बीडचे आमदार झाले. ते खुप वर्ष मंत्री पण राहिले. आपल्या राजकारणातील महत्वाचा काळ त्यांनी शरद पवार यांच्यासोबतच घालवला. पण २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी शिवसेना पक्षाकडून लढली. याला कारण होत, त्यांचेच पुतणे संदीप क्षीरसागर. संदीप क्षीरसागर यांना त्यावेळी राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणूकीत काकांचा पुतण्याने पराभव केला. संदीप क्षीरसागर सध्या आमदार आहेत तर त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर राजकीय दृष्ट्या अडगळीत पडले आहेत. यात मोठी भुमिका शरद पवार यांची होती.त्याचबरोबर बीडमध्ये शरद पवारांनी आणखी एका कुटुंबात गृहकलह निर्माण करण्यात महत्वाची भुमिका बजावली होती. महाराष्ट्राला आदरणीय असलेल्या छत्रपती घराण्यात सुध्दा वाद निर्माण करण्यात शरद पवारांची भुमिका होती हे पण महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेले आहे.
 
आज शरद पवार आपल्या पुतण्याच्या बंडाने व्यतीत झालेत. पण 'जे पेरालं तेच उगवतं' या म्हणीप्रमाणे शरद पवारांनी अनेक पुतण्यांना काकांच्या विरोधात उभं केलं. त्यामुळेच आज त्यांच्या विरोधात अजित पवारांनी नुसता बंडच केलेला नाहिये तर ते आज राष्ट्रवादी पक्षावरच आपला दावा सांगत आहेत. त्यांच्यासोबत आज राष्ट्रवादीचे ४० आमदार आहेत. यामुळे अजित पवार ही एकनाथ शिंदे यांच्यासारखी किमया करु शकतात का ? की शरद पवार आपल्या पुतण्याला चितपट करतात हा प्रश्न आहे.
 
श्रेयश खरात
 
 
Powered By Sangraha 9.0