फ्रान्समधील हिंसाचाराचा भारतासाठी धडा

04 Jul 2023 21:30:25
Global Crisis France Riots Indian Stand

२०१५ सालच्या सुरुवातीला ‘शार्ली हेब्दो’ नियतकालिकाच्या कार्यालयावरील हल्ल्यानंतर फ्रान्समध्ये इस्लामिक दहशतवादाने धुमाकूळ घातला होता. यात जसे मोठे हल्ले आहेत, तसेच हातात सुरा घेऊन लोकांना भोसकणे किंवा गर्दी पाहून लोकांच्या अंगावर गाडी घालणे, असे अनेक लहान हल्लेही आहेत. त्यामुळे नाहेल एमवर गोळी चालवणारा पोलीस वर्णद्वेषी होता, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

फ्रान्समधील हिंसाचाराचे लोण शेजारच्या आणि अत्यंत शांत म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्वित्झर्लंडपर्यंत पोहोचले आहे. पॅरिसच्या उपनगरात नाहेल एम या किशोरवयीन मुलाची पोलिसांनी संशयित दहशतवादी समजून हत्या केली. नाहेलकडे वाहन चालवण्याचा परवाना नव्हता. पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने लाल सिग्नल तोडून गाडी भरधाव वेगात पळवली. त्याच्यावर बंदूक रोखलेल्या दोनपैकी एका पोलिसाने गोळी चालवली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर वणव्यासारखा पसरला आणि त्यातून फ्रान्समध्ये सर्वत्र हिंसाचाराचा आगडोंब उसळला. ४५ हजारांहून जास्त पोलीस रस्त्यावर असूनही दंगेखोरांनी दुकानं लुटली, पोलिसांच्या गाड्या जाळल्या आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. दंगेखोरांनी शाळा तसेच चिनी पर्यटकांच्या बसलाही सोडले नाही. आंदोलकांच्या दृष्टीने नाहेल अल्जेरियन-मोरक्कन मिश्रवंशिय आणि धर्माने मुस्लीम असल्यामुळे पोलिसांनी त्याला बचावाची संधी न देता किंवा जायबंदी न करता गोळ्या घातल्या. पोलिसांनी दोन हजारांहून जास्त लोकांना अटक केली. फ्रान्समध्ये मध्यममार्गी विचारधारेचे इमॅन्युएल मॅक्रॉन अध्यक्ष असून त्यांनी आपल्या भूमिकेत समतोल साधण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यातून कोणाचेच समाधान झालेले नाही. सामान्य लोकांच्या मते, फ्रान्स गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. त्यासाठी एकीकडे वाढता इस्लामिक मूलतत्त्ववाद तर दुसरीकडे आफ्रिकन-अरब वंशीय फ्रेंच नागरिकांचे मागासलेपण आणि त्यांचे समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी न होणे जबाबदार आहे.

२०व्या शतकाच्या मध्यापर्यंत ब्रिटनप्रमाणेच फ्रान्सच्याही जगभर वसाहती होत्या. त्यात मुख्यतः उत्तर आणि पश्चिम आफ्रिकेतील देशांचा समावेश होता. या भागांतून फ्रान्समध्ये येऊन स्थायिक झालेल्या मुस्लीम समाजाची लोकसंख्या सुमारे ६० लाख म्हणजेच फ्रेंच लोकसंख्येच्या सुमारे दहा टक्के आहे. हा आकडा वाटतो त्यापेक्षा खूप मोठा आहे. कारण, फ्रान्सची सुमारे ५० टक्के लोकसंख्या कोणत्याच धर्माचे पालन करत नाही. केवळ ३० टक्के लोक आपण पारंपरिक ख्रिस्ती कॅथलिक असल्याचे सांगतात. फ्रान्समधील सर्वच मोठ्या शहरांच्या उपनगरांमध्ये मुस्लीम लोकसंख्या १५ ते २० टक्क्यांहून अधिक आहे. असं म्हणतात की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या मासे बंदराजवळील समुद्रात ऐतिहासिक उडी मारली, त्या मासेमध्ये मुस्लीम लोकसंख्या सुमारे २५ टक्के आहे. कृष्णवर्णीय नागरिकांमधील मुस्लीम धर्मांतरणाचे प्रमाण मोठे आहे.

फ्रान्समध्ये ‘सेक्युलॅरिझम’ या संज्ञेला विशेष महत्त्व आहे. धर्म ही खासगी बाब आहे. राज्याला कोणताही धर्म नाही. राज्य कोणताही धर्माला पुरस्कृत करत नाही किंवा कमी लेखत नाही. याचा अर्थ फ्रान्सचे सरकार, सरकारी कर्मचारी आपण अमुक एका धर्माचे पालन करतो, असे दाखवू शकत नाही. याचा अर्थ सरकारी शिक्षक, पोलीस, बस चालक, हॉस्पिटल स्टाफ कोणीही धार्मिक चिन्हं उघड दिसतील, अशा पद्धतीने वापरू शकत नाही. यात क्रॉस, टोप्या, फेटे, कडी सर्व आले. दुसरी गोष्ट - फ्रान्समध्ये धर्मनिंदा हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार धरला आहे. म्हणजे नास्तिक असणे, देव न मानणे ही एक बाब झाली - फ्रान्समध्ये दुसर्‍या धर्माच्या देवदेवतांची व्यंगचित्र काढणे, त्यांची निंदानालस्ती करणे हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे.

अरब आणि आफ्रिकन देशांतून फ्रान्समध्ये येऊन स्थायिक झालेल्या लोकांच्या जीवनात फ्रेंच जीवनमूल्य रुजवण्याचे फ्रेंच सरकारचे प्रयत्न कमी पडले. १९८०च्या दशकात सोव्हिएत रशियाच्या साम्यवादाला दूर ठेवण्यासाठी अमेरिकेच्या आशीर्वादाने सुन्नी वहाबी विचारसरणीच्या प्रसाराचे प्रयत्न सुरू झाले. या प्रयत्नांचा प्रभाव अफगाणिस्तानपुरता मर्यादित न राहता जगभर झाला. आफ्रिकन-अरबवंशीय फ्रेंच लोकांच्या पहिल्या पिढीने फ्रेंच जीवनमूल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना शैक्षणिक आणि सांस्कृतिक पातळीवर युरोपीय लोकांइतकी प्रगती साधता आली नाही. वर्ण वेगळा, घरचे संस्कार वेगळे, धार्मिक मूल्य निराळी आणि आर्थिक संधी निराळ्या यामुळे दुसर्‍या पिढीतील लोक गौरवर्णीय फ्रेंच लोकांच्यात समरस होण्याऐवजी स्वतःच्याच घोळक्यात जास्त रमू लागले आणि त्यातून फ्रान्समधील मोठ्या शहरांमध्ये मुस्लीम किंवा कृष्णवर्णीय लोकांचे ‘घेटो’ तयार झाले. नाहेल एमच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यास असे दिसते की, तो अभ्यासात मागे असायचा. शिक्षणापेक्षा खेळात जास्त गोडी, शाळेत मोठ्या प्रमाणावर अनुपस्थिती, घरी एकट्या आईने सांभाळलेला अशी पार्श्वभूमी आफ्रिकन-अरब वंशाच्या फ्रेंच नागरिकांमध्ये सामान्य आहे. २०१५ सालच्या सुरुवातीला ‘शार्ली हेब्दो’ नियतकालिकाच्या कार्यालयावरील हल्ल्यानंतर फ्रान्समध्ये इस्लामिक दहशतवादाने धुमाकूळ घातला होता. यात जसे मोठे हल्ले आहेत, तसेच हातात सुरा घेऊन लोकांना भोसकणे किंवा गर्दी पाहून लोकांच्या अंगावर गाडी घालणे, असे अनेक लहान हल्लेही आहेत. त्यामुळे नाहेल एमवर गोळी चालवणारा पोलीस वर्णद्वेषी होता, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

दि. १४ जुलै रोजी फ्रेंच राज्यक्रांतीतील विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. ‘बॅस्टिल डे’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या दिवशी राजधानी पॅरिसमध्ये मोठ्या प्रमाणावर संचलन पार पडते. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बॅस्टिल डेचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. भारताने जगभरातील ३५ देशांसोबत रणनीतीक भागीदारी केली असली तरी पहिली भागीदारी फ्रान्ससोबत आहे. या घटनेला २५ वर्ष पूर्ण होत असताना मोदींची फ्रान्स भेट अत्यंत महत्त्वाची आहे. या भेटीदरम्यान संरक्षण तसेच अन्य क्षेत्रातील महत्त्वांच्या करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात येणार आहेत. गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या हिंसाचारामुळे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना आपला जर्मनीचा दौरा रद्द करावा लागला. बॅस्टिल डे सोहळ्यावरही या हिंसाचाराचे सावट आहे. २०१६ साली याच दिवशी फ्रान्समधील नाईस या शहरात एका इस्लामिक दहशतवाद्याने रस्त्यावर जमलेल्या लोकांच्या अंगावर १९ टनी ट्रक चढवून ८६ लोकांचे बळी घेतले होते.

मे महिन्याच्या सुरुवातीपासून भारतातील मणिपूर राज्यामध्ये मैतेयी आणि कुकी समाजाच्या लोकांमध्ये वांशिक हिंसाचार पेटला आहे. दंगेखोरांनी पोलिसांच्या शस्त्रालयातील बंदुका लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. या हिंसाचाराला धार्मिक अंगही असल्यामुळे युरोपीय वृत्तवाहिन्या आणि मानवाधिकारवादी संघटना भारतावर मोठ्या प्रमाणावर टीका करत आहेत. दंगेखोरांनी पोलिसांची शस्त्रालयं लुटण्याच्या घटना फ्रान्समध्येही अनेक ठिकाणी घडल्या आहेत. तेथे होत असलेल्या हिंसाचाराची दृश्य अंगाचा थरकाप उडवणारी आहेत. अशावेळेस लोकशाहीवादी देशांनी परस्परांवर टीका करताना किंवा उपदेशाचे बोधामृत पाजताना संयम राखणे आवश्यक आहे. शीतयुद्धाच्या काळात पाश्चिमात्य जगामध्ये भारताला सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखालचा देश म्हणून ओळखले जाई. अमेरिकेच्या दबावामुळे अन्य देश भारताला आधुनिक तंत्रज्ञान द्यायला टाळाटाळ करत असताना फ्रान्स भारताच्या मदतीला धावून आला. अणुऊर्जा, अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान फ्रान्सने भारताला देऊ केले. कालांतराने अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य देशांनाही फ्रान्सचे अनुकरण करणे भाग पडले. फ्रान्स सरकारने भारतावर जो विश्वास दाखवला, तसाच विश्वास तेथील माध्यम आणि मानवाधिकार संघटनांनीही दाखवणे आवश्यक आहे. दहशतवादविरोधी लढ्यात भारताने नेहमीच फ्रान्सला साथ दिली आहे. फ्रान्समध्ये होत असलेला हिंसाचार हा भारतासाठीही धोक्याची घंटा आहे. एखादी घटना समाजमाध्यमांद्वारे वणव्यासारखी पसरून लोकांना हिंसाचार करण्यास प्रवृत्त करत असेल, तर अशा वृत्तींना वेसण घालण्यासाठीही भारत आणि फ्रान्समधील सहकार्याला वाव आहे.

Powered By Sangraha 9.0