समर्थ रामदास लिखित वाल्मिकी रामायणाचे राष्ट्रार्पण

04 Jul 2023 21:05:30
Article On Samarth Ramdas Written Valmiki Ramayana

धुळे येथील श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर यांच्यातर्फे श्री समर्थ रामदास स्वामी लिखित वाल्मिकी रामायणाच्या संपादित आवृत्तीच्या आठ खंडांचा प्रकाशन सोहळा आज, बुधवार, दि. ५ जुलै रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता संपन्न होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते या ग्रंथांचे राष्ट्रार्पण होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फुलगाव येथील श्रृतिसागर आश्रमाचे स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांतसंघचालक नानासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच, यावेळी श्रीसमर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष अनंत चितळे, कार्याध्यक्ष देवेंद्र डोंगरे, विश्वस्त विनय खटावकर, समर्थ व्यासपीठाचे उपाध्यक्ष सुहास क्षीरसागर धुळे स्थित सत्कार्योत्तेजक सभेचे विश्वास नकाणेकर, सचिव सतीश दीक्षित आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. त्यानिमित्ताने हा लेखप्रपंच...
 
भारत ही संतांची भूमी. त्याग, तपस्या आणि तितिक्षा यांचा आदर्श वस्तुपाठ घालणारे हजारो संत येथे होऊन गेले. अशाच थोर परंपरेतील एक अद्वितीय संत, कवी, तत्त्वचिंतक आणि समाजसुधारक म्हणजे रामदास स्वामी. समाजाने आदरपूर्वक त्यांना ‘समर्थ’ अशी पदवी बहाल केली. समर्थ रामदासांचे संपूर्ण जीवन म्हणजे मनुष्याचे जीवन कसे असावे, याचा एक आदर्शच आहे. समर्थांचा कालावधी साधारण ४०० वर्षांपूर्वीचा. १२व्या वर्षी आपले गर्भश्रीमंत घर सोडल्यावर त्यांनी १२ वर्षे टाकळी येथे कठोर तपश्चर्या केली आणि पुढील १२ वर्षे संपूर्ण भारत पादाक्रांत केला. परकीय आक्रमणाखाली भरडून निघालेल्या त्या काळच्या भारतवर्षामध्ये समर्थांनी उघड्या डोळ्यांनी भ्रमंती केली. देवाचा द्वेष करणार्‍या लोकांचे राज्य या देशावर होते. त्यामुळे समर्थांचे उपास्य दैवत प्रभू श्री रामचंद्र यांचे अस्तित्वच कसे संपविले जाईल, यासाठी प्रयत्न त्या काळात सुरू होते. बाबराने रामजन्मभूमीचे मंदिर पाडून तिथे मशीद उभी केली होती.जागोजागी मंदिरांचा विध्वंस सुरू होता. मोठमोठी विश्वविद्यालये पेटवली जात होती. त्यातील अनमोल ग्रंथसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडत होती.

प्रभू श्री रामचंद्रांचे सर्वांत विश्वासार्ह चरित्र म्हणून वाल्मिकी रामायणाकडे पाहिले जायचे. परंतु, तो काळ असा होता की, वाल्मिकी रामायणाची सातही कांडे एकत्र असलेली कुठलीही प्रत भारतभरामध्ये उपलब्ध नव्हती.कारण, अशा अनेक मूळ प्रति आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. याच काळात समर्थांनी दोन महत्त्वाचे निर्णय घेतलेले आपल्याला दिसतात. पहिले म्हणजे, संपूर्ण भारतभर त्यांनी पुन्हा एकदा रामभक्तीचा प्रचार-प्रसार करण्याचे जीवन ध्येय स्वीकारले. त्यासाठी रामभक्त हनुमंताची मंदिरे स्थापन करून तरुणांना बलोपासनेस लावावयास प्रारंभ केला. जागोजागी मठस्थापना करून आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे होईल, याची रितसर योजना आखून कार्यवाही केली. त्याचबरोबर त्यांनी वाल्मिकी रामायणाची सर्व सातही कांडे विविध ठिकाणांवरून गोळा केली आणि स्वतःच्या हस्ताक्षरात ती एकटाक लिहून काढली. आपल्या उपास्य दैवताचे अधिकृत चरित्र सर्वांना उपलब्ध असावे, यासाठी समर्थांनी केलेले हे अद्भुत कार्य एकमेवाद्वितीय असे आहे.

समर्थ लिखित या वाल्मिकी रामायणाच्या हस्तलिखित प्रतीचा प्रवास मोठा मजेशीर आणि रंजक आहे. समर्थांनी स्वतःची स्वतंत्र अशी विपुल ग्रंथरचना केलेली आहे. ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे’ असा त्यांचा दंडकच होता. शिवाय हे लिखाण कसे असावे, याचीदेखील नियमावली त्यांनी ‘लेखनक्रिया निरुपण’ या समासामध्ये घालून दिलेली आहे. अगदी त्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण रामायण ग्रंथ लिहिलेला आढळून येतो. समर्थांच्या अनेक शिष्यांनी विविध रामायण ग्रंथांची रचना केलेली आढळते. मिरज येथील समर्थ शिष्य वेणा बाई यांनी लिहिलेला संकेत रामायण हा मराठीतील महिला लेखिकेचा पहिला संपूर्ण ग्रंथ मानला जातो. वेणा स्वामींच्या आधीदेखील महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि लिंगायत संप्रदायातील काही महिला संतांनी लिखाण केलेले आढळते. परंतु, ते स्फूट प्रकारचे असून त्याला ग्रंथरचनेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसत नाही. हे रामायण लिहिताना संदर्भासाठी समर्थांची मूळ प्रत वेणा स्वामींच्या मठामध्ये आली. त्यांच्या शिष्या बाईयाबाई आणि त्यांचे उत्तराधिकारी गिरीधर स्वामी रामदासी म्हणून होते. यांचा बीड गावामध्ये मठ होता. यांनी सात वेगवेगळी रामायण लिहिली आहेत व त्यासाठी समर्थांच्या याच मूळ प्रतीचा आधार घेतलेला आहे. बीडमध्ये आजही गिरीधर स्वामींची आणि त्यांच्या परंपरेतील अनेक रामदासी लोकांच्या समाधी नदीच्या काठावर अत्यंत सुंदर तटबंदीने बांधलेल्या आढळून येतात.

पुढे या बीड गावामध्ये त्यांच्या बंधूंचा व मुलीचा असे दोन मठ तयार झाले व त्यांनी मूळ मठातील सर्व ग्रंथसंपदा अर्धी अर्धी वाटून घेतली. समर्थ लिखित वाल्मिकी रामायणाची मूळ प्रत हा त्या मठातील सर्वांत अनमोल ठेवा असल्यामुळे, त्याचेदेखील श्लोक संख्येनुसार विभाजन करण्यात आले आणि वाटणी पूर्ण झाली. पुढे १८९३च्या सुमारास ‘सत्कार्योत्तेजक सभा’ नावाची संस्था स्थापन करून धुळे येथील थोर समर्थ भक्त शंकर श्रीकृष्ण उपाख्य नानासाहेब देव यांनी संपूर्ण भारतभर फिरून रामदासी मठांमधील समर्थांचे सर्व उर्वरित लिखाण एकत्र करण्याचा मोठाच उद्योग चालविला. त्यामध्ये त्यांना रामायणाची ही अर्धी प्रत सापडली आणि त्यांना फार वाईट वाटले. त्यांनी ही प्रत मोठ्या निगुतीने धुळे येथे जतन करून ठेवली. पुढे काही वर्षांनी या रामायणाचा उर्वरित भागदेखील धुळ्याला पोहोचला, तोपर्यंत देवांनी आधीच्या प्रतीचा उत्तरार्ध लिहून घेतला होता. हे दोन्ही भाग एकत्र केल्यावर संपूर्ण रामायण प्राप्त झाले. ही मोठी ऐतिहासिक घटना होती! त्यामुळे रामायणाची ही समर्थ रामदास स्वामी लिखित प्रत हीच अधिष्ठात्री देवता मानून तिची प्रतिष्ठापना शंकर श्रीकृष्ण देव यांनी श्री समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये केली. आजही वाग्देवता मंदिर या संस्थेमधील देवता कुठली म्हणाल, तर समर्थांचे अस्सल लेखन हीच इथली देवता होय!

२०१० मध्ये समर्थ वाग्देवता मंदिराचे तत्कालीन अध्यक्ष शरदजी कुबेर रामदासी यांच्या प्रयत्नातून या रामायणाच्या संशोधनाचे आणि प्रकाशनाचे भगीरथ कार्य सुरू झाले. यामध्ये अक्षरशः शेकडो विद्वानांनी आपले योगदान दिलेले आहे आणि हळूहळू एक एक कांड प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली. पुस्तकाची रचना सर्वानुमते अशी ठरली. समर्थांच्या हस्ताक्षरातील प्रत्येक पान छापले गेले पाहिजे, असा आग्रह असल्यामुळे सर्वप्रथम समर्थांच्या हस्तलिखित प्रतीचे छायाचित्र आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर त्याचे सुलभ लिप्यंतर दिले आहे. तद्नंतर या संस्कृत रामायणाचा मराठी अनुवाद आणि इंग्रजी अनुवाद असा भाग येतो. या प्रकल्पाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यात अनेक प्राचीन रंगीत चित्र छापलेली आहेत. पैकी किष्किंधाकांडामध्ये समर्थ रामदास स्वामींनी काढलेले राम-लक्ष्मण व सुवर्णमृगाचे चित्र अतिशय मनोहारी आहे. युद्धकांड हे समर्थांचे सर्वांत आवडते प्रकरण. त्यांनी मराठी रामायण लिहितानादेखील फक्त युद्धकांड लिहिलेले आढळून येते. तसेच आपल्या शिष्यांना ‘युद्धकांड वाचित जा’ असा सल्ला त्यांनी दिल्याचे ऐतिहासिक दस्त उपलब्ध आहेत. हे प्रकरण मोठे असल्यामुळे त्याचे दोन ग्रंथ झाले आहेत, असे एकूण सात कांडांचे आठ ग्रंथ आता सिद्ध झालेले आहेत. या सर्व ग्रंथाचे लोकार्पण अथवा अधिक व्यापक अर्थाने बोलावयाचे झाल्यास राष्ट्रार्पण करण्याचा अद्वितीय, मनोहारी, अभूतपूर्व हृद्य सोहळा बुधवार, दि. ५ जुलै रोजी पुणे येथे संपन्न होतो आहे. आपण सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे. जय जय रघुवीर समर्थ!

अनंत तथा रमण चितळे
(लेखक श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर, धुळेचे अध्यक्ष, आहेत.)

Powered By Sangraha 9.0