राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अन्य समाजसेवी संस्थांसाठी अविरत झटणारे ठाण्यातील नामवंत विधिज्ञ वामनराव ओक या संघक्रियाशील कर्मयोग्याचे दि. ४ जुलै, १९७७ रोजी निर्वाण झाले. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा लेख...
अॅड. वामनरावांचा जन्म दि. १ मे, १९०० चा तर त्यांचे निर्वाण दि. ४ जुलै, १९७७ रोजी झाले. या अवघ्या पाऊणशे वयोमानात वामनरावांनी वेळ, श्रम व धन अपूर्ण वकिली पेशासोबतच संघकार्यालाही वाहून घेतले होते. ठाणे जिल्हा न्यायालयात काम करताना त्यांचे अभ्यासपूर्ण युक्तिवाद प्रभावी असत. रा. स्व. संघ आणि न्यायालयीन कामकाज या पलीकडेही त्यांचा विविध सामाजिक संस्थांमध्येही सहभाग होता. ओक घराणे मूळचे ठाणे जिल्ह्यातील बदलापूरचे असून जमीनदार असल्याने धनाढ्य घराण्यात त्यांचा समावेश होत असे. ओकांचे कुलदैवत गुहागरचा व्याडेश्वर शंकर. वामनरावांचे वडील प्रभाकरनाना ओक हे तत्कालीन कल्याणचे पुढारी व तेथील सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक होते. सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणार्या प्रभाकरनानांचा सार्थ लौकिक म्हणजे ’प्रभाकर ओक टॉवर’ या नावाने १९५३ साली उभारलेले स्मारक कल्याणच्या शिवाजी चौकात आहे. कल्याणला ओक बागदेखील आहे.
वडिलांचा हाच वारसा वामनरावांनी पुढेही सुरू ठेवला. वामनरावांचे प्राथमिक शिक्षण कल्याणला तर पुढील शिक्षण मुंबईत आणि उच्चशिक्षण पुणे येथे झाले. विद्यार्थीदशेत काटकसरीने राहून त्यांनी विद्याभ्यास केला. वडील आणि वडील बंधू माधव या दोघांनाही वकील बनायचे होते. पण, कौटुंबिक जबाबदार्यामुळे त्यांची इच्छा फलद्रुप झाली नव्हती. वामनरावांनी मात्र वकील बनून दाखवले. ठाण्यात आघाडीवर असलेले भास्करराव दामले वकील यांचे साहाय्यक म्हणून वामनरावांनी वकिली पेशाला सुरुवात केली.१९२५ ते १९३५ अशी दहा वर्षे वामनरावांना दामले वकिलांचे मार्गदर्शन लाभले. १९३५ मध्ये दामले यांचे अकाली निधन झाल्याने त्यांच्याकडील अर्ध्यावर राहिलेली कामे वामनरावांनी तडफेने पूर्णत्वास नेली. १९४९ पर्यंत रायगड (तेव्हाचा कुलाबा) आणि ठाणे जिल्ह्यासाठी मिळून जिल्हा न्यायालय ठाण्यातच होते. ठाण्यात यश व नाव झाल्याने ते ठाणे शहरात स्थिरावले. १९६० पर्यंत वामनरावांनी आपली कारकिर्द गाजवली. समाजापासून दुरावू नये, यासाठी सरकारकडून आलेला न्यायाधीश पदाचा दर्जाही त्यांनी नाकारला होता. तत्पूर्वी ठाणे नगरपालिकेने वामनरावांचा गौरव केला होता. नंतर पूर्णवेळ संघ कार्यासाठी वाहून घेतल्याने त्यांनी कोर्ट कज्जे व वकिलीचे काम थांबवले.
वामनराव सनातनी वृत्तीचे नसले तरी ज्योतिष विषयात त्यांना रूची होती. भविष्य जाणण्याबरोबरच ते पडताळून पाहण्याची हौस त्यांना भारी होती. जात, धर्म, पंथ असा भेदभाव न मानता धर्माचरण करणार्यांना ते सातत्याने साहाय्य करीत. वामनरावांनी प्रासंगिक लेखनही केले. सव्यसाची साहित्य सेवेमुळे वामनराव ठाण्यातील मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्षही होते. वामनरावांचे थोरले चिरंजीव श्रीनिवास शिशु म्हणून संघात असताना त्याच्या भिवंडीतील हिवाळी शिबिरात पत्नीसह जाण्याचा योग आला, तेथील संघशिस्त बघून ते भारावून गेले. त्यानंतर संघाचे शहर कार्यवाह वकील श्रीपाद देव आणि कल्याणचे संघचालक बापूसाहेब मोडक वकील यांच्या आग्रहामुळे १९४२ मध्ये म्हणजेच वयाच्या ४२व्या वर्षी वामनराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिज्ञित स्वयंसेवक बनले. संघदक्ष कार्यामुळे ठाणे नगर संघचालक पदी नियुक्ती होताच वामनराव ठाण्यातील शाखा-उपशाखांना भेटी देऊ लागले, स्वयंसेवकांच्या सुखदुःखात अडीअडचणीत धावून जाऊ लागले.
संघकार्यासाठी झोकून देण्याच्या वृत्तीमुळे पुढे त्यांच्यावर मुंबई, ठाणे, कुलाबा (रायगड) या तीन जिल्ह्यांच्या विभाग संघचालकाची जबाबदारी सोपवण्यात आली. अखिल हिंदू-विजय-ध्वज हा, उद्भवू या पुन्हा स्वा. सावरकरांच्या उक्तीला अनुसरून संघकार्याचा ध्वज त्यांनी फडकत ठेवला. दि. ३० जानेवारी, १९४८ रोजी गांधी हत्येनंतर संघ स्वयंसेवकांना लक्ष्य करण्यात आले. दि. २ फेब्रुवारीपासून संघबंदी अंमलात आली. तेव्हा, केवळ अफवांच्या आधारे या कृत्याशी संबंध जोडून दि. ३ फेब्रुवारीला वामनरावांना अटक झाली. हा तुरुंगवास तीन महिने होता. पुढे डिसेंबर १९४८ मध्ये संघावरील बंदी उठवण्यासाठी झालेल्या संघ सत्याग्रहामध्ये पुन्हा वामनरावांना अटक झाली. तुरुंगातही त्यांनी घरचे जेवण व सुविधा नाकारून इतर बंदिवानांप्रमाणेच कारावास भोगणे पसंद केले. संघक्रियाशील वकील असल्याने तुरुंगातून मुक्तता झाल्यावर वामनरावांचे कायदेशीर साहाय्य गोळवलकर गुरूजींनी संघासाठी घेतले होते.
आणीबाणीच्या काळात संघावर गंडांतर आले, संघशाखा बंद कराव्या लागल्या...धरपकड सुरू झाल्याने पुन्हा तुरुंगवास वामनरावांच्या प्रकृतीस झेपणार नाही, म्हणून १९७५ च्या आधी त्यांच्याकडील विभाग संचालक पदाची जबाबदारी दुसर्याकडे सोपविण्यात आली. दरम्यान, संघकार्याच्या निवृत्तीनंतर चार महिन्यांतच १९७७ साली संघकार्य हाच श्वास असलेल्या वामनरावांनी अखेरचा प्रणाम केला. अशा समाजसेवी विधिज्ञाची हद्य आठवण म्हणून जनकल्याण समितीने उभारलेल्या ठाण्यातील वामनराव ओक रक्तपेढीच्या रूपाने ते अखंड सेवारत आहेत.
(टीप : - कृ.ज. दिवेकर यांच्या ‘वामनाय नमः’ या पुस्तकातील संदर्भ)