काश्मीर विकासवाटेवर...

31 Jul 2023 22:05:46
Peaceful Muharram procession takes place In Kashmir

निसर्गसौंदर्याने नटलेले जळते जम्मू-काश्मीर नरेंद्र मोदी सरकारने ‘कलम ३७०’ हटविल्यानंतर आता शांतता आणि समृद्धीकडे वाटचाल करू लागले आहे. ‘कलम ३७०’ हटविल्यानंतर अनेकांनी त्याला विरोध केला. कित्येकांनी आपल्या छात्या बडवत निषेधही केला. मात्र, सध्याच्या काश्मीरचे आश्वासक चित्र पाहता, प्रत्येक देशप्रेमीची छाती अभिमानाने भरून येईल. नुकत्याच एक नामांकित वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये विकासाचे वारे वाहत असल्याचे स्पष्ट होत आहे. तब्बल ३४ वर्षांनंतर काश्मीरमध्ये कोणत्याही गोंधळाविना मोहरमचा जुलूस काढण्यात आला. एवढेच नव्हे, तर घुसखोरीच्या घटनाही घटल्या आहेत. २०१९ मध्ये १४१, २०२० मध्ये ५१, २०२१ मध्ये ३४, २०२२ मध्ये १४ घुसखोरीच्या घटना समोर आल्या, तर जानेवारी ते जून २०२३ पर्यंत एकही घुसखोरीची घटना समोर आली नाही. दगडफेक तर एकप्रकारे काश्मीरची ओळख बनली होती. सैन्याच्या गाड्यांवर, सैनिकांवर सातत्याने दगडफेक होत असायची. २०२२ येईपर्यंत या घटनांमध्येही कमालीची घट आली असून, अद्याप काश्मीरमध्ये एकही दगडफेकीची घटना घडलेली नाही. कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याच्या घटनाही कमी झाल्या आहेत. २०१६ मध्ये २ हजार, ८९७ कायदा सुव्यवस्था बिघडल्याच्या घटना घडल्या, तर २०२२ मध्ये त्यातही घट होऊन त्यांचीस संख्या २६ पर्यंत आली. २०२२ मध्ये ६५ नवे दहशतवादी बनले, त्यातील ५८ दहशतवाद्यांचा एका महिन्यातच खात्मा करण्यात आला. याआधी केवळ पर्यटनावर अवलंबून असलेल्या काश्मिरी जनतेला आता नोकर्‍यादेखील मिळत आहे. ऑगस्ट २०१९ नंतर २९ हजार, २९५ जणांना नोकरी देण्यात आली आहे. एक वेळ होती, जेव्हा पाकिस्तानच्या इशार्‍यावर काश्मीरमध्ये घडामोडी घडत होत्या. अनेकजण सर्रास हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरत होते. परंतु, आता येथील तरूणांना रोजगार मिळू लागला आहे. ‘जी २०’ परिषदेची एक बैठकही काश्मीरमध्ये यशस्वीरित्या पार पडली. तेव्हा विविध देशांच्या प्रतिनिधींनीही बदलत्या काश्मीरचा अनुभव घेत भारतीय संस्कृतीची माहिती घेतली. एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासनीतीने एकेकाळचे अशांत काश्मीर शांतता आणि विकासाच्या वाटेवर चालले आहे, हेच या आकडेवारीवरून सिद्ध होते.

टीव्ही, टीआरपी अन् लज्जा

टीव्हीवरील ‘टीआरपी’चा खेळ आता खालच्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे. मालिकांबरोबरच आता रिएलिटी शो, गाण्यांचे, नृत्याचे शो यांमध्येही अश्लीलतेने प्रवेश केलाय. थेट अश्लील कंटेटला विरोध होण्याच्या शक्यतेने आता या शोमध्ये वेगळ्या प्रकारे अश्लीलता घुसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नुकताच सोनी टीव्हीच्या ‘सुपर डान्सर चॅप्टर ३’ या शोचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यातील संवाद कुणालाही लाज वाटेल, असेच. या शोमध्ये आईवडिलांसमोर त्यांचा लहान मुलगा घाणेरड्या भाषेत स्वतःच्या आईवडिलांचीच लक्तरे काढतोय अन् त्यावर समोरील परीक्षक फिदीफिदी हसताना दिसतात. या शोचा परीक्षक अनुराग बसू त्या लहान स्पर्धकाला विचारतो की, “तुझी अंतर्वस्त्रे चांगली की, तुझ्या पप्पांची?” त्यावर, वडिलांच्या अंतर्वस्त्रांचा घाणेरडा वास येतो, असे मुलगा उत्तर देतो. त्यावरही दुसरी परीक्षक शिल्पा शेट्टी त्या मुलाला विचारते की, “अंतर्वस्त्राचा वास घ्यायला तू का गेला होता?” त्यावर मुलाने “घाणेरडा वास येतो की नाही, हे तपासतो आणि इतक्या घाणेरडा वास घेतल्याने माझा जीव जातो.” त्यावर परीक्षक गीता, अनुराग बसू, शिल्पा शेट्टी पुन्हा फिदीफिदी हसतात. त्यामुळे त्या मुलाला पुन्हा चेव येतो आणि तो म्हणतो, “माझी मम्मी पप्पांना पँट उतरवून मारते.” यानंतर वडील आपलं तोंड लपवतात. बहुदा त्यांना हे आवडत नाही. पण, आई मात्र हसते. त्यानंतरही परीक्षक थांबत नाही. अनुराग बसू विचारतो, “पप्पा मम्मीला चुंबन देतात का?” त्यावर मुलगा ‘पप्पा मम्मीची बॅण्ड वाजवतात’ असे म्हणतो. ऐकताना, पाहतानाच काय, तर लिहितानाही किळस यावी, असा हा प्रकार आणि सार्वजनिकरित्या तो प्रसारितही झाला. एका लहान मुलाच्या अल्लडपणाचा फायदा घेऊन त्याच्याकडून आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेट मिळवून ‘टीआरपी’ कमावण्याचाच हा खेळ! कुटुंबाने एकत्र बसून नेमकं काय पाहावं, असा प्रश्न निर्माण त्यामुळे निर्माण होतो. एका लहान मुलाचे असे अल्लड बोलणे, ज्याचे गांभीर्य त्यालाही उमगत नसेल, ते प्रसारित होणे हेच लाजिरवाणे. त्यावर समोर बसून फिदीफिदी हसणारे परीक्षकदेखील याला तितकचे जबाबदार. अशा गोष्टी हसण्यात मोडून विसरणे धोक्याचे आहे. अशा प्रकारांना वेळीच आवर घालणे गरजेचे, अन्यथा फार उशीर होईल!

७०५८५८९७६७

Powered By Sangraha 9.0