जगातील सर्व सस्तन प्राण्यांपैकी ‘सुमात्रन गेंडा’ (डिसेरोरहिनस सुमाट्रेन्सिस) आणि ‘जावन गेंडा’ (र्हायनो सोनडाईकस) हे दोन मोठे सस्तन प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या काही महिन्यांतील तज्ज्ञांच्या मुलाखती आणि अलीकडील अहवाल पाहिले, तर लक्षात येईल की, या दोन्ही प्रजातींची संख्या नोंदवलेल्या स्थितीपेक्षा वाईट स्थितीत आहे. हे गेंडे फक्त इंडोनेशियामध्ये आढळतात. सध्या केवळ ५०-६० जावन गेंडे शिल्लक आहेत, तर ५० पेक्षा कमी सुमात्रन गेंडे शिल्लक आहेत. असे असूनही या बाबतीत इंडोनेशियन सरकारच्या इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो. इंडोनेशियन सरकारची जबाबदारी पत्करण्याची इच्छा नसल्यामुळे गेंड्यांची ही दुर्दशा झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही प्रजातींना वाचवण्यासाठी सुरु असलेले उपक्रम बंद करण्यात आले.
वन्यजीव व्यापार वॉचडॉग ‘ट्राफिक’ आणि ‘आययुसीएन’च्या आशियाई गेंडा स्पेशलिस्ट ग्रुपने गेल्यावर्षी एक अभ्यासपत्रक प्रकाशित केले होते. त्यातील अंदाजानुसार, इंडोनेशियात केवळ ३४-४७ सुमात्रन गेंडे शिल्लक होते. मध्यंतरी सुरू असलेल्या ‘कॅप्चर प्रोग्राम’ या गेंडे पकडण्याच्या मोहिमेमध्ये जंगल परिसरातून एकच मादी पकडण्यात आली. परंतु, तिला कोणत्याही प्रजनन केंद्रात पाठवण्यात आले नाही. दरम्यान, जावन गेंड्यांची लोकसंख्या वाढत असल्याच्या अनेक अधिकृत अहवालांना तेथील शास्त्रज्ञांकडून आव्हान देण्यात आले आहे. वर्षानुवर्षे, इंडोनेशियन सरकारचे अहवाल आणि परिपत्रके असे ठासून सांगत होती की, जावन गेंड्यांची लोकसंख्या वाढत आहे. परंतु परिस्थिती अशी आहे की, ही संपूर्ण लोकसंख्या एकाच राष्ट्रीय राखीव क्षेत्रात टिकून आहे.
इंडोनेशियन सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०११ साली ३५ असलेली ही संख्या २०२२ मध्ये ७७ इतकी वाढली. परंतु, ‘ऑरिगा नुसांतारा’ या स्थानिक पर्यावरणीय संस्थेच्या अहवालानुसार, जावन गेंड्यांच्या संवर्धनाचे कार्य अपुरे असल्याचे समोर आले आहे. या अहवालात चार प्रमुख निष्कर्ष आहेत. १) जावन गेंड्यांची शिकार वाढली आहे. २) काही प्राणी रोगाने ग्रस्त आहेत. ३) अधिकारी जावन गेंड्यांची संख्या वाढवत आहेत. ४) कथितरित्या संवर्धन कार्यक्रमाच्या खराब व्यवस्थापनामुळे या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेल्या वर्षी सरकारच्या अधिकृत गणनेनुसार जावन गेंड्यांची संख्या ७७ वर आहे. अधिकृत गणना सुरू झाल्यापासूनची ही सर्वाधिक संख्या आहे. परंतु, या अहवालात असे आढळून आले आहे की, सरकार अनेक वर्षांपासून कॅमेरा ट्रॅपमध्ये गेंडे दिसले नसतानाही त्यांची संख्या अंदाजे वाढवत आहे.
२०२२च्या आकडेवारीमध्ये समाविष्ट केलेल्या १४ गेंड्यांची २०१९ पासून नोंदच झाली नाही, तर एकाची २०२० पासून नाही. यापुढे आणखीन तीन गेंडे मृत झाल्याची पुष्टी केली गेली. परंतु, अधिकृत आकडेवारीमध्ये अजूनही हे गेंडे जीवंत म्हणून गणले गेले. अहवालात असे आढळून आले आहे की, २०१८ पासून जावन गेंड्यांची संख्या वाढण्याऐवजी कमी होत चालली आहे. कॅमेरा ट्रॅपने २०१८ या एकाच वर्षात सर्वाधिक ६३ गेंडे टिपले, तर तीन वर्षांनंतर, कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून केवळ ५६ गेंडे टिपण्यात आले. या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, या राष्ट्रीय राखीव उद्यानाने जावन गेंड्यांच्या अभ्यास आणि संवर्धनावर अब्जावधी रुपये खर्च केले आहेत. हा निधीचा अपव्यय असल्याचा आरोप अहवालात करण्यात आला आहे. येथील बांधकामामुळे जावन गेंड्यांना लगतच्या भागातून बाहेर काढण्यात आले असावे.
अहवालात उद्यानाच्या दक्षिणेकडील भागात एकेकाळी वारंवार येणार्या गेंड्यांची लोकसंख्या पूर्णपणे नाहीशी झाली आहे. सुमात्रन गेंडे ही दुसरी प्रजाती इंडोनेशियातील जंगलाच्या काही भागांत आढळते. ऐतिहासिकदृष्ट्या हे दोन्ही प्राणी दक्षिण आशियामध्ये, हिमालयाच्या पायथ्यापासून ते मलय द्वीपकल्पापर्यंत, इंडोनेशियाच्या मोठ्या बेटांपर्यंत होते.अनुवांशिक पुरावे सूचित करतात की, त्यांची संख्या गेल्या दहा हजार वर्षांपासून हळूहळू कमी होत आहे. २०व्या शतकात या गेंड्याचा घट दर नाटकीयरित्या वाढला आहे. त्यांच्या अधिवासाचा नाश आणि शिंगांसाठी केली जाणारी शिकार याला प्रामुख्याने जबाबदार. ‘हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन’ म्हणजेच अधिवासाचे विभाजन झाल्यामुळे त्यांचा जन्मदर घसरायला लागला आणि आता ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.