मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील गोरेगाव येथील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सीईसी केंद्राच्या आवारात ‘जंपिंग स्पायडर’ म्हणजेच उड्या मारणाऱ्या कोळ्याची नवी प्रजाती शोधली गेली आहे. प्रणव जोशी आणि ऋषीकेश त्रिपाठी या तरुण संशोधकांनी ही प्रजाती शोधली आहे. याबद्दल माहिती देणारा पेपर ‘आर्थ्रोपॉड सिलेक्टा’ या आंतरराष्ट्रीय पीअर रिव्ह्यूड जर्नलमध्ये नुकताच प्रकाशित झाला आहे.
प्रणव जोशी या संशोधकाला ही प्रजाती जून २०२१ मध्ये पहिल्यांदा मुंबईतील गोरेगावच्या सीईसी केंद्राच्या आवारात आढळली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये या प्रजातीचे नर आणि मादी या दोघांना संबंधित भागातुन गोळा करुन संशोधनासाठी प्रयोगशाळेत आणले गेले, अशी माहिती प्रणव जोशी यांनी दिली. बीएनएचएसच्या आवारातील स्ट्रीम म्हणजेच ओहोळा लगतच्या खडकांवर ही प्रजाती मिळाली आहे. या प्रजातीचे जीनस (genus) हॅसेरियस असुन, मुंबईत आढळल्यामुळे या प्रजातीला (species) मुंबई नाव देण्यात आले आहे.
संशोधनासाठी या प्रजातीला केरळातील क्राईस्ट युनिव्हर्सिटी येथील प्रयोगशाळेत आणले गेले होते. तिथे ऋषीकेश त्रिपाठी यांनी त्याचे अतिसुक्ष्म रित्या निरिक्षण केले. ही वेगळी प्रजाती आहे, हे पडताळुन पाहण्यासाठी नर आणि मादी कोळ्यांचे विच्छेदन करुन मायक्रोस्कोपखाली निरिक्षण केले. याला शास्त्रीय भाषेत Genitalia Dissection म्हणतात. यानंतर मायक्रोस्कोपमधुन काढलेले फोटो इतर कोळ्यांच्या प्रजातीशी जुळवुन पाहिल्यानंतर ती पुर्ण नवी प्रजात असल्याची खात्री झाली. या कोळ्याच्या जातीचे शास्त्रीय वर्गीकरण केल्यानंतर जानेवारी महिन्यात हे जर्नलमध्ये छापण्यासाठी पाठविले गेले. तज्ञांनी हा लेख रिव्ह्यु केल्यानंतर तो या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.
“'हसारीअस मुंबई' या प्रजातीचा शोध लागला ही चांगलीच गोष्ट आहे. यातून आपल्याला हा बोध मिळतो की शहराच्या मधोमध वसलेलं आरे कॉलनीचे जंगल, नॅशनल पार्क जंगल, बी. एन. एच. एस. सीईसीमधील जंगल यामध्ये अतिशय दुर्मिळ प्रजाती अजूनही संशोधनासाठी उपलब्ध आहेत. ज्याकडे आपलं खूप दुर्लक्ष झालेलं आहे. मला असं वाटतं की 'हसारियस मुंबई' या नवीन प्रजातीच्या शोधामुळे एकूणच वन्य कोळी, कीटक यांच्या संशोधनाच्या व संवर्धनाच्या कामाला वेग आणि योग्य दिशा मिळेल.”
- प्रणव जोशी
जंपिंग स्पायडर संशोधक