सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करणार : मंगलप्रभात लोढा

03 Jul 2023 15:12:38
Maharashtra Tourism Minister Mangalprabhat Lodha

सोलापूर
: सोलापूर शहरात अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याकारणाने जिल्ह्याला धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करणार, अशी घोषणा राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. दरम्यान, येथे प्रथमच सुरू झालेल्या हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी कॉलेजला श्री स्वामी समर्थांचे नाव देण्यात येणार असल्याचेही पर्यटनमंत्री लोढा यांनी सांगितले. पर्यटन विभागाच्या वतीने या कॉलेजच्या पदवी पदविका अभ्यासक्रमाचा शुभारंभावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.

तसेच, गुरूपोर्णिमेचा मुहूर्त साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कॉलेजच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातून हॉटेल व्यवसायासाठी लागणारे चांगले मनुष्यबळ उपलब्ध होणार असून जिल्ह्यात पर्यटनाचा ओघ सुध्दा वाढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात पर्यटनासाठी येणाऱ्याचे उत्तम आदरातिथ्य व्हावे, सोयीसुविधा मिळून पर्यटक जास्त दिवस राहावेत यासाठी प्रशिक्षणाची गरज असून त्याची पूर्तता या कॉलेजच्या माध्यमातून होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, याबरोबरच जिल्ह्यात मनुष्यबळ उपलब्ध असून रोजगाराची संधी उपलब्ध होईल व पर्यटनाला चालना मिळेल, असेही लोढांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य, आ.विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, सचिन कल्याणशेट्टी, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पर्यटन विभागाचे संचालक डॉ. भगवतंराव पाटील, व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आदी उपस्थित होते.




Powered By Sangraha 9.0