मुंबई (विशेष प्रतिनिधी): वन्यजीव संवर्धन अधिनियम कायद्यानव्ये (१९७२) महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ गठीत करण्यात आले असून त्यातील नवनिर्वाचित सदस्यांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. दै. मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
राज्यातील वन्यजीवांचे संवर्धन आणि संरक्षण व्यवस्थापन करण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाची स्थापना केली जाते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे वन्यजीव मंडळ गठीत केले गेले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री या मंडळाचे अध्यक्ष असून वनमंत्री मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. त्याबरोबरच, विधानसभा सदस्य समीर मेघे, संदीप धुर्वे, आशिष जयस्वाल, अंकुर पटवर्धन, नेहा पंचामिया, अनुज खरे , किरण शेलार, प्रवीण परदेशी, धनंजय बापट, श्रीकांत टेकाडे, चैत्राम पवार, विनायक थलकर, प्रधान सचिव (वने), प्रधान सचिव (आदिवासी विकास विभाग), प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), व्यवस्थापकीय संचालक, सैन्यदलाचा प्रतिनिधी, पशुसंवर्धन आयुक्त, मत्स्यविकास विभाग आयुक्त यांना सदस्य म्हणून निवडण्यात आले आहे.
तसेच, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS), वाईल्डलाईफ कॉन्सरवेशन ट्रस्ट (WCT), टायगर रिसर्च अँड कॉन्सरवेशन ट्रस्ट (TRCT), केंद्र शासनाच्या पर्यावरण व वनमंत्रालायतील वन्यजीव संचालक, भारतीय वन्यजीव संस्थान डेहराडून, बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया, झूलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून वन्यजीव मंडळात समाविष्ट आहेत. तसेच, सदस्य सचिव म्हणून मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांची नियुक्ती केली गेली आहे.