मुंबई (विशेष प्रतिनिधी): सड्यांवरील जमीनीचे आंबा काजूच्या बागांमध्ये रुपांतर करताना तेथील अधिवासावर त्याचे परिणाम दिसुन येतात असा निष्कर्ष काढणारे संशोधन भारतीय संशोधकांनी केले आहे. नेचर कॉन्झर्व्हेशन फाऊंडेशन-इंडिया, बॉम्बे एन्व्हायर्नमेंटल अॅक्शन ग्रुप आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या संशोधकांनी सह्याद्रीच्या सड्यांवर हे संशोधन केले आहे. या संशोधनाचा अहवाल ग्लोबल इकोलॉजी अँड कॉन्झरवेशन या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे.
विजयन जिथिन, मनाली राणे, डॉ. अपर्णा वाटवे, डॉ. वरद गिरी आणि डॉ. रोहित नानिवडेकर या संशोधकांच्या चमूने हा अभ्यास केला आहे. सह्याद्रीच्या सड्यावरील ७००० हून अधिक खडकांवरून भातशेती आणि बांधकामासाठी तसेच सड्यावरील मोठे खडक हटवल्यावर प्राणी कसा प्रतिसाद देतात हे या अभ्यासातुन समजून घेतले गेले.
महाराष्ट्रातील कोकण भागातील सडा किंवा कातळ हे लाखो वर्षांपूर्वी खडकांच्या विघटनाने निर्माण झालेले अद्वितीय आणि प्राचीन पठारे आहेत. कोरड्या ऋतूत उजाड वाटणारे सडे पावसाळ्यात मुबलक जीवसृष्टीने भरलेले असतात. पठारावरील मोकळ्या खडकांमध्ये विस्मयकारक विविधता आढळते, ज्याचा महत्त्वाचा भाग केवळ याच प्रदेशात आढळतो आणि जगात कोठेही आढळत नाही. संशोधकांनी नैसर्गिक पठारांमध्ये मोकळ्या खडकांखाली राहणाऱ्या प्राण्यांच्या विविध गटांची, पूर्वी पारंपारिक भातशेतीखाली असलेल्या शेतजमिनी आणि या पठारांमध्ये वेगाने विस्तारत असलेल्या आंबा आणि काजूच्या बागांची तुलना केली. भारतात पहिल्यांदाच शास्त्रज्ञांनी अशा पठारावरील मोकळ्या खडकाखाली राहणाऱ्या प्राण्यांवर, शेतीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे.
येथील जैवविविधतेत केवळ पठारावर आढळणाऱ्या आणि IUCN रेड लिस्टमध्ये "धोकादायक" वर्गात असणारी प्रजात - व्हाईट स्ट्रीप्ड व्हायपर गेको (Hemidactylus albofasciatus), उभयचर सापाची एक प्रजात शेषाचारीज सेसिलियन (Gegeneophis seshachari), सॉ-स्केल्ड व्हायपर, कोळी आणि काही विंचुंच्या प्रजाती या प्रदेशात आढळतात. महाराष्ट्रातील काही प्रजाती जगात केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आढळणाऱ्याच आहेत. या सैल खडकांसारखे अतिशय विशिष्ट छोटे निवासस्थान त्यांना उन्हाळ्यात तीव्र उष्णता आणि पावसाळ्यातील अतिवृष्टीपासून आश्रय देतात.
सड्यावर असलेल्या वनस्पतींमध्ये ७० स्थानिक वनस्पतींचा समावेश आहे तर त्यातील तीन वनस्पती जागतिक स्तरावर धोक्यात असल्याचे ही लक्षात आले आहे. असे असुनही या सड्याचे 'वेस्टलँड अॅटलस ऑफ इंडिया' मध्ये 'वेस्टलँड' म्हणून वर्गीकरण केले जाते.
“आम्ही खडकाखाली नोंदवलेले अनेक प्रजाती फारच कमी ज्ञात आहेत आणि पठारावरून त्यांचे अस्तित्त्व नाहिसे झाल्यामुळे परिसंस्थेतील घटकांवर ते कसा परिणाम करतात हे अजुन सांगता येत नाही. यातले अनेक प्राणी दुर्मिळ आणि सड्यांवर होत असलेल्या बदलांशी संवेदनशील आहेत. सड्यावरील खडक काढुन टाकल्यामुळे येथील जैवविविधतेवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो”
- संशोधक, विजयन जिथिन
“कोकणात मानवाने बदललेल्या भुप्रदेशावर स्थानिक जैवविविधतेने जुळवुन घेतले. परंतु जमीनीच्या अतिवापरामुळे हे बदलु शकते. या भुप्रदेशाच्या जैविक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने संवर्धन नियोजन करण्याची गरज आहे”
- संशोधक, डॉ. अपर्णा वाटवे
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.