मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील अक्सा आणि जुहूच्या किनाऱ्यांवर काही नर्डल्स दिसुन आल्याची नोंद करण्यात आली आहे. शनिवार दि. २२ जुलै अक्सा किनाऱ्यावर तर मंगळवार दि. २५ जुलै रोजी जुहूच्या किनाऱ्यावर हे नर्डल्स आढळले आहेत.
अक्सा किनाऱ्यावर छोटे जेली फिश सदृश काहीतरी वाहुन आल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी काही शास्त्रज्ञांनी अक्सा बीचला भेट दिली. तसेच काही जवळुन काढलेली छायाचित्र पाहिली असता ते नर्डल्स असल्याची माहिती त्यांना झाली. हे नर्डल्स म्हणजे लहान प्लास्टिकचाच प्रकार असुन समुद्रामधुन जाणाऱ्या मालवाहू जहाजे किंवा तत्सम वाहनांमधुन पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक दृष्ट्या जेली किंवा सल्प वाटणाऱ्या या नर्डल्स असल्याची खात्री जवळुन पाहिल्यानंतरच होते. सागरी तसेच किनारी परिसंस्थेत असणाऱ्या जीवांना यातील फरक न कळल्यामुळे प्लास्टीकचे हे बारिक कण लहान मासे समजुनच ते खात आहेत. याची काही छायाचित्रे ही टिपली गेली आहेत. हे नर्डल्स आले कुठुन याचा ठोस पुरावा अजुन मिळालेला नसला तरी जैविविधतेतील घटकांवर त्यांचे गंभीर परिणाम दिसुन येणार आहेत यात शंका नाही.
यापुर्वी अशी घटना मे २०२१ मध्ये , MV X Press Pearl या मालवाहू जहाजाला श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ घडली होती. श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून १० मैल अंतरावर या जहाजाला आग लागली आणि अंदाजे ७५ अब्ज नर्डल्स हिंद महासागरात पडले. तेथील संपूर्ण किनारे या नर्डल्सच्या जाड पांढर्या थरांनी झाकले गेले होते. मुंबईतील ही घटना तितकी गंभीर नसली तरी त्याकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे.
शनिवारी अक्सा आणि मंगळवारी जुहू ही क्रमवारी बघता हे नर्डल्स उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत चाललेले पहायला मिळत आहेत. पालघरमधील वडराई, शिरगाव किनारपट्टीवरील भागात कोरियन वस्तु वाहुन आल्याचे वृत्त समोर आले होते. समुद्रात झालेल्या एखाद्या वादळात जहाज बुडून त्यातील सामान किनाऱ्यावर वाहुन येत असल्याची शंका व्यक्त केली गेली आहे. याच जहाजातील नर्डल्सचा अक्सा आणि जुहूच्या किनाऱ्यांवर आढळुन आले. तसेच जुहूच्या किनाऱ्यावर मंगळवारी या नर्डल्सने भरलेली पोती सुद्धा सापडली आहेत.