आज उबाठा गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस. त्यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता ठाकरेंच्याच वाढदिवसानिमित्त त्यांची ‘पॉडकास्ट’ स्वरुपातील मुलाखत प्रथेप्रमाणे संजय राऊतांनी घेतली. खरं तर वाढदिवसाच्या दिवशी माणसावर शुभेच्छांचाच वर्षाव होणे अपेक्षित. ठाकरेंवर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून तो तसा होईलही म्हणा. परंतु, ठाकरेंची मुलाखत पाहिल्यानंतर त्यांना ‘हॅपी बर्थडे’ऐवजी खरं तर ‘गेट वेल सून’ असेच म्हणण्याची वेळ आलेली दिसते. कारण, ठाकरेंच्या मनातल्या आणि डोक्यातल्या त्याच त्या घोकमपट्टी केलेल्या विषयांची, टोमण्यांची रटाळवाणी पुनरुक्ती! स्थळ-काळ ओळखून भाषण करतो तो चाणाक्ष राजकारणी. पण, पक्षप्रमुख म्हणूनच भाषणाची कायम सवय असल्यामुळे, मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतरही पक्षप्रमुखासारखीच असबद्ध भाषणबाजी, राजकीय टोमणेबाजी करण्यात ठाकरेंनी धन्यता मानली. त्यांची कालची ‘पॉडकास्ट’ मुलाखतही त्याचाच उत्कृष्ट नमुना. शिंदे आणि मंडळींवर ‘सडके’, ‘बांडगूळ’, ‘खेकडे’, ‘हुजरे’ अशा टीकाटीप्पणीत ठाकरे गुंग दिसले. पण, आपल्याला एवढी लोकं का सोडून गेली, याचे टिचभरही आत्मचिंतन एक वर्ष उलटल्यानंतर ठाकरेंनी केलेले दिसत नाही. ते तसे त्यांनी केले असते, आपलेही काही चुकले, हे मान्य करून थोडा कमीपणा घेतला असता, तर कदाचित शिवसेना एकसंध राहिलीही असती. परंतु, नेते-कार्यकर्त्यांशी संवादाचे पूल तोडण्यापासून ते विशिष्ट कंपूचे ऐकण्यापर्यंत ठाकरे एका कोशातच गुरफटून राहिले आणि आजही त्यांची तीच अवस्था! म्हणूनच एकीकडे लोकशाहीचा उदोउदो करायचा आणि दुसरीकडे ‘शिवसेना कोणाची हा लोकांचा प्रश्न नाही’ असे म्हणून मोकळे व्हायचे, असा हा विरोधाभास! शिवसेना हे नाव आजोबांनी दिले, बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली, मग प्रश्न हाच की उद्धव ठाकरेंनी शिवसेनेसाठी काय केले? नाव, पक्ष सगळे हातातून घालवण्यामागे कोणाचे योगदान? ठाकरे म्हणाले, “प्रत्येकाचा शेवट असतो. घडा भरला की तो फुटतो.” ठाकरेंचा घडाही भरला होता आणि तो गेल्यावर्षी शिंदेंनी धडाडीने फोडला. पण, ठाकरेंच्या मनावर आणि डोळ्यावर अजूनही स्वमग्नतेचे झापड आहेच. या आत्मकेंद्रीपणाच्या आजारातून ठाकरे लवकर बरे होवो, म्हणून ‘गेट वेल सून!’
काश्मीरमध्ये निवडणुका घ्या, मणिपूरमध्ये सरकार बरखास्त करा, समान नागरी कायदा लागू करण्यापूर्वी गोवंशहत्याबंदी कायद्याचा विचार करा वगैरे वगैरे उपदेशांचे डोस उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कालच्या मुलाखतीत मोदी सरकारला दिले. पण, याच मुलाखतीत विश्वप्रवक्ते राऊतांनी या सर्व समस्या आणि संघर्षावर उपाययोजना काय करता येतील, असे या माजी ‘बेस्ट सीम’ना विचारले असते, तर त्यांनाही मानले असते. कारण, समस्यांचा पाढा वाचून दाखविणे आणि सत्ताधार्यांना लक्ष्य करणे हे तुलनेने सोपेच. पण, त्याच समस्यांवर समाधान शोधणे तितकेच कर्मकठीण. खरं तर अडीच वर्षे हा होईना, मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या उद्धव ठाकरेंना हे वेगळे सांगायला नकोच. परंतु, विरोधकांच्या ‘इंडिया’ गोटात सामील झाल्यापासून उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय प्रश्नांची दाहकता एकाएकी जाणवू लागली. पण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राज्याचे किती प्रलंबित प्रश्न ठाकरेंनी सत्ताधारी म्हणून मार्गी लावले? विकास प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवण्यापेक्षा त्यांचा पाया उखडण्याचा कोतेपणा ठाकरेंच्या स्थगिती सरकारने दाखवला. ब्रिजभूषण सिंह, मणिपूर प्रकरणानंतर महिलांच्या आदर-सन्मानाच्या बाता मारणार्या उद्धव ठाकरेंनी कंगना राणावतच्या घरी बुलडोझर का फिरवला? मोदी-शाहंना सत्तेचा माज आहे, ‘ईडी’, ‘सीबीआय’सारख्या तपास यंत्रणांचा ते गैरवापर करतात, म्हणून आरोप करणार्या ठाकरेंनी अर्णब गोस्वामी यांची मुस्कटदाबी का केली? मुंबईत माजी नौदल अधिकार्याला मारहाण करणारे कोणाचे कार्यकर्ते होते? यांसारख्या प्रश्नांची उत्तरं ठाकरे देऊ शकतील का? आणि असे अडचणीचे प्रश्न राऊत साहेब त्यांच्या मालकांना विचारण्याचे कधीतरी धाडस दाखवणार का? त्यामुळे फक्त चार राष्ट्रीय नेत्यांच्या पंक्तीत जाऊन बसल्याने आपण ‘राष्ट्रीय नेता’ होत नाही, हे ठाकरेंना कळेल तो सुदिन! पण, आत्मप्रौढीपणा मिरवणार्यांना ‘मी, माझे कुटुंब’ यापलीकडे काही दिसेल, याची शक्यता तशी धूसरच! म्हणून ठाकरेंनी तीच ती औरंगजेबाची उदाहरणे आणि तेच तेच प्रश्न विविध व्यासपीठांवर मांडून आपल्या मर्यादित आवाक्याचे जाहीर प्रदर्शन आता बंद करावे. कारण, सभांना, बैठकींना जमलेली चार डोकी म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद नसून, तो क्षणभंगुर प्रतिसाद असतो, हे जितके लवकर समजेल तितके चांगले!