केंद्र सरकारने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, भारतातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात पहिल्या तिमाहीत तब्बल ५६ टक्क्यांनी वाढली आहे. जून तिमाहीतही एकट्या ‘आयफोन’ उत्पादनांची निर्यात २० हजार कोटींवर पोहोचली. पूर्वीपासूनच जगभरातील विश्वासार्ह निर्यातक अशी ओळख असलेल्या भारताने दशकभरात नवा पायंडा कसा पाडला, त्याचाच ऊहापोह करणारा हा लेख....
'मेक इन इंडिया’ ही मोहीम सुरू होण्यापूर्वीपासूनच ’मेड इन इंडिया’ उत्पादनांवर जगभरातील ग्राहकांचा विश्वास कायम होता; तो आजतागायत. परवडणारे कुशल मनुष्यबळ, केंद्र-राज्य सरकारांचे पाठबळ, स्थानिक-जागतिक बाजारपेठांमध्ये वाढती मागणी, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राची सुसज्जता, निर्यातक्षम उत्पादक, ‘सेझ’, जागतिक बाजारपेठ शृंखलेतील महत्त्वाचे स्थान, वाढती परकी गंगाजळी, संशोधन आणि विकासावर दिला जाणारा भर या सर्वांचा एकात्रित परिणाम म्हणून हा पल्ला आपल्याला गाठता आला. आजघडीला भारतीय इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाजारपेठ हे आघाडीचे स्थान पटकावून आहे का? तर त्याचे उत्तर निश्चित नाही. ’ट्रेड स्टॅटिक्स फॉर इंटरनॅशनल बिझनेस’नुसार एकूण उत्पादनांच्या निर्यातीत भारताचा जगात विसावा क्रमांक लागतो. मात्र, इलेक्ट्रोनिक्स वस्तूंच्या निर्यातीत भारताला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. मात्र, ज्या गतीने या क्षेत्राकडे कूच करायला हवी, ती निश्चितच समाधानकारक आहे.
तैवान हा केवळ अडीच कोटी लोकसंख्येचा देश. मात्र, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांच्या यादीत हा चीनलाही टक्कर देतो. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्यातीत चीन हा जगात आघाडीवर असलेला देश त्यानंतर तैवानचा क्रमांक लागतो. एका आकडेवारीनुसार, (२०२२ वर्ष) पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनचा इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेतील वाटा हा ९२५ अब्ज डॉलर्स इतका आहे. त्या खालोखाल हाँग़कॉँग ३२० अब्ज डॉलर्सवर आहे. जागतिक बाजारपेठेतील ही स्थिती असली, तरीही भारतासाठी गेल्या काही वर्षांमध्ये झालेले बदल हे सकारात्मक मानले जात आहेत.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जून २०२३ या तिमाहीत गतवर्षीच्या तुलनेत ५७ हजार, २२०.२४ कोटींची उलाढाल या क्षेत्रात झाली. गतवर्षी हा आकडा ३६ हजार, ५३३.१८ कोटी इतका होता. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र हे एप्रिल-जून तिमाहीत वृद्धी दर्शविणारे चौथे मोठे क्षेत्र ठरले आहे. इतर कुठल्याही क्षेत्रापेक्षा ही वाढ ३० टक्क्यांनी अधिक आहे. याच गतीने या क्षेत्राची होणारी भरभराट भारताला हिरे आणि दागिन्यांच्या निर्यातीलाही टक्कर देणारी ठरणार आहे. इतकेच नव्हे, तर २०२४च्या पहिल्या तिमाहीत औषधे व रासायनिक क्षेत्रालाही मागे टाकण्याच्या तयारीत दिसून येतो. हिरे आणि दागिन्यांच्या निर्यातीची तफावत ही केवळ ४ हजार, ६६० कोटी रुपये इतकी आहे. वर्षभरापूर्वी तब्बल नऊपट म्हणजे ही तफावत ४२ हजार, ४४९ कोटी रुपये इतकी होती.
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची इतकी भरभराट होण्यामागचे कारण नेमके काय? यासाठी कुठल्या यंत्रणा कार्यरत आहेत, यावर प्रकाश टाकणे; तितकेच गरजेचे आहे. भविष्यात हीच पद्धती इतर क्षेत्रातील संधी ओळखून त्यादृष्टीने उपाययोजना करता येतील. २०२० मध्ये केंद्र सरकारने मोबाईल फोन निर्मिती क्षेत्राला जाहीर करण्यात आलेल्या उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेमुळे हा फायदा झाला. गेल्या १५ महिन्यांत एकूण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्यातीत केवळ ५२ टक्के वाटा हा मोबाईल फोन्सचा आहे. म्हणजे एकूण निर्यातीपैकी ३० हजार कोटींची निर्यात केवळ मोबाईल फोन्समुळे शक्य झाली. गतवर्षी ही आकडेवारी केवळ ३८ टक्क्यांवर होती.
या सर्वात आघाडीवर ठरली, ती म्हणजे ‘अॅपल’ कंपनी. गतवर्षी कोरोना काळात ज्याप्रमाणे चीनमध्ये ‘अॅपल’ला आलेला वाईट अनुभव पाहता, कंपनीने आपला गाशा गुंडाळण्याची तयारी केली. याउलट भारतात या कंपनीला पायघड्या घालण्यात आल्या. टीम कूक यांची भारतभेट ‘अॅपल’ची नव्याने खुली झालेली दालने लक्षात घेता, ही कंपनी भारताबद्दल किती सकारात्मक आहे, याची प्रचिती दिसून येईल. एकूण मोबाईल निर्यातीपैकी तब्बल ६६ टक्के निर्यात केवळ ‘अॅपल’ फोन्सची आहे. जूनच्या तिमाहीत ’अॅपल’ने एकूण २० हजार कोटींचा निर्यातीचा टप्पा गाठला. ’फॉक्सकॉन हॉन हाय’, ‘विस्ट्रॉन’ आणि ’पीगाट्रोन’ या ’अॅपल’ निर्मिती कंपन्यांनी हा आकडा २०२४ या आर्थिक वर्षापर्यंत ६१ हजार कोटींवर नेऊन ठेवण्याचे उद्दिष्ट गाठले आहे.
’अॅपल’ची भारतातील निर्मिती हा गेल्या काही दशकांपूर्वीचा विषय. यापूर्वी भारतात ’अॅपल’ची निर्मिती होईल, हा विचारही स्वप्नवत वाटे. मात्र, गरज होती ती दूरदृष्टीची आणि दृष्टिकोनाची. भारताकडे उद्योगांसाठी लागणारी संसाधने आहेत. इच्छाशक्ती असलेले तितकेच सक्षम सरकारही आहे. येथील कुशल मनुष्यबळाची महती जगाला ठाऊक आहे. अर्थात, हा रथ ओढण्यासाठी यशस्वीपणे भरभक्कम साथ लाभली ती भारताच्या नारी शक्तीची. ’अॅपल’ निर्मिती करणार्या ‘फॉक्सकॉन’च्या मते, एकूण ७२ टक्के कारागिरी महिलाच आहेत.
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचे पाठबळही आहेच. याद्वारे बर्याच जागतिक आव्हानांचा सामना सहज शक्य झाला. निर्यातक्षम उत्पादनांच्या निर्मितीत भारत हा पूर्वीपासूनच आघाडीवर आहे. त्यला जोड मिळाली ती म्हणजे यशस्वी रणनीती आखणार्या सरकारांची. जागतिक बाजारपेठेमध्ये तयार होत चाललेल्या मागणीवर केंद्रातील सरकारने ठेवलेले बारीक लक्ष त्या दृष्टीने तयार होणारी व्यावसायिक रणनीती, पंतप्रधानांचे दौरे या सगळ्यांचा एकत्रित परिणाम इथल्या निर्यात क्षेत्रावर झाला. जगावर कोरोनाचे आणि रशिया-युक्रेन युद्धाचे सावट असतानाही भारताने आपली जागतिक व्यापार शृंखलेतील आपले स्थान अबाधित ठेवले. ’कोविड’ काळात थंड रुतलेले उद्योगाचे अर्थचक्र आणि निर्यातीचा ओघ कठीण काळातही कायम ठेवला. याशिवाय भारताच्या संशोधन आणि विकासावर जगातील देशांचा विश्वास कायम आहे. केवळ इतकेच नव्हे, तर अनेक पैलू या ई-भरभराटीसाठी महत्त्वाचे असणार आहेत. अजूनही लांबचा पल्ला गाठायचा असला, तरीही हेही नसे थोडके हे निश्चित...