पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; नव्या मेट्रो मार्गांचे उद्घाटन करणार

26 Jul 2023 17:25:05
PM Narendra Modi On Pune Tour

पुणे
: पुणेकरांचा मेट्रोचा प्रवास अधिक सुखकर होणार असून येत्या काही दिवसातच पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक आणि वनाझ मेट्रो स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्थानक पर्यंत थेट प्रवास करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दि. १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यात या मार्गांचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन जुळ्या शहरे मेट्रोद्वारे जोडले जाणार आहेत. दरम्यान, हे मेट्रो मार्ग आता लवकरच सेवेत दाखल होणार आहेत.
 
दरम्यान, मेट्रोच्या या दोन्ही नवीन मार्गिका सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकामध्ये जोडण्यात आलेल्या आहेत. दोन्ही मार्गिकांवरील नविन ११ मेट्रो स्थानके प्रवासी सेवेत दाखल होणार आहेत. दापोडी, बोपोडी येथील उन्नत स्थानक, शिवाजीनगर आणि सिव्हिल कोर्ट येथील भूमिगत स्थानक जोडले जाणार आहे. तर, डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका, सिव्हिल कोर्ट, मंगळवार पेठ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल येथील उन्नत स्थानके जोडली जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येणार असून यानिमित्ताने अनेक कार्यक्रमांचे नियोजनही करण्यात आले आहे. या दौर्‍यात ते पुण्यातील मेट्रो मार्गाचेही उद्घाटन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते डिसेंबर २०१८ मध्ये पुणे मेट्रो भूमीपूजन करण्यात आले होते. मार्च २०२२ मध्ये त्यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केले. पिंपरी ते फुगेवाडी आणि वनाझ ते गरवारे कॉलेजपर्यंतच्या दोन मार्गांचे उद्घाटन मोदी यांच्याच हस्ते करण्यात आले होते. आता या नव्या दोन मार्गांचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

तसेच, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांचे लोकार्पण होणार असून महापालिकेने २०१८ मध्ये पाच वेगवेगळ्या भागांमध्ये पंतप्रधान आवास योजना सुरू केली होती. दरम्यान, शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे.

 
Powered By Sangraha 9.0