मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी विहार व तानसा हे दोन्ही तलाव आज भरुन ओसंडून वाहू आगले. विहार तलाव आणि तानसा तलाव ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. दरम्यान मुंबई भागांत सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु होती, दुपारनंतर पावसाचा जोर वाढला असून शहराच्या विविध भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, गेल्याच आठवड्यात तुळशी तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ तानसा व विहार हे दोन्ही तलाव देखील ओसंडून वाहू लागले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी ३ तलाव आता पूर्ण क्षमतेने भरली असून मुंबईकरांच्या पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे. तसेच, मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.