आश्रमात गेल्यावर आचार्य सर्वप्रथम त्या बटूंचा पहिल्यांदा हा उपनयन संस्कार संपन्न करतो. घराच्या बाहेर आचार्यगृही म्हणजेच गुरुकुलात होणारा हा पहिलाच संस्कार.
आचार्य उपनयमानो ब्रह्मचारिणं
कृणुते गर्भमन्त:।
तं रात्रीस्तिस्र उदरे बिभर्ति
तं जातं द्रष्टुमभिसंयन्ति देवा:॥
अन्वयार्थ
(उपनयनमान:) बटुचे उपनयन करणारा (आचार्य) आचार्य हा (ब्रह्मचारिणम्) ब्रह्मचार्याला (गर्भम् अन्त:) आपल्या अन्त:करणात (कृणुते) ठेवतो. (तम्) त्याला (तिस्र: रात्री:) तीन रात्रीपर्यंत (उदरे बिभर्ति) जणूकाही आपल्या उदरातच धारण करतो.( तं जातम्) आपले विद्याध्ययन पूर्ण करून पुन्हा जन्मलेल्या त्या ब्रह्मचार्याला (दृष्टुम्) पाहण्याकरिता (देवा:) अनेक विद्वान्, ज्ञानिजन (अभि संयन्ति) चहू बाजूंनी येतात.
१६ संस्कारांच्या शृंखलेत दहाव्या क्रमांकावर येतो, तो मुलाला द्विजत्व बहाल करणारा उपनयन संस्कार! लहान मुले जसजशी मोठी होऊ लागतात, तसतशी त्यांची वृत्ती मात्या-पित्यांना उमगू लागते. त्यांच्या स्वभाव व वृत्तींमुळे त्यांना त्यांचा वर्णदेखील समजतो. मुलांची वर्णवृत्ती लक्षात घेऊन त्यांचा त्या त्या वेळी उपनयन संस्कार करणे इष्ट ठरते. यासंदर्भात त्या त्या वर्णांच्या ब्रह्मचार्यांचे उपनयन संस्कार केव्हा करावयाचे? याचे निर्देश प्राचीन गृह्यसूत्रांमध्ये मिळतात. यासंदर्भात एके ठिकाणी म्हटले आहे-
अष्टमे वर्षे ब्राह्मणं उपनयेत्, एकादशे क्षत्रियम्, द्वादशे वैश्यम्!
म्हणजेच ब्राह्मण वृत्तीच्या मुलांचा आठव्या वर्षी, क्षत्रीय वृत्तीच्या मुलांचा ११व्या वर्षी, तर वैश्य वृत्तीच्या मुलांचा १२व्या वर्षी उपनयन संस्कार करण्यात यावा. मनुस्मृतीत तर याच्याही अगोदरचा कालावधी निश्चित केला आहे. याप्रमाणे जर काय उपनयन संस्कार झालाच नाही, तर त्याला ‘सावित्रीपतीत’ असे म्हटले जाते. उपनयन संस्काराला यज्ञोपवीत, व्रतबंध किंवा मौंजीबंधन संस्कार असेही म्हणतात. पूर्वीच्या काळी जर हा संस्कारच झाला नाही, तर विवाहाच्या अगोदर किमान नावाला तरी हा संस्कार करण्याची पद्धत रूढ होती.
प्रारंभिक बाळबोध किंवा संस्कृत अध्ययन घरीच संपन्न झाल्यानंतर व्यापक प्रमाणातील संस्कृत, व्याकरण व वेदादी शास्त्रांच्या अध्ययनासाठी आता आई-वडिलांना आपल्या मुलांस गुरुगृही पाठवावे लागते. शहर किंवा गावापासून दूर अंतरावर आचार्यांचा आश्रम असतो. तिथे आचार्य व शिष्य कठोर तपश्चर्या करतात, यालाच गुरुकुल किंवा ब्रह्मचर्य आश्रमदेखील म्हणतात. अशा आश्रमात गेल्यावर आचार्य सर्वप्रथम त्या बटूंचा पहिल्यांदा हा उपनयन संस्कार संपन्न करतो. घराच्या बाहेर आचार्यगृही म्हणजेच गुरुकुलात होणारा हा पहिलाच संस्कार.
‘उपनयन’ शब्दाचा अर्थ बराच आशय सांगून जातो. उप म्हणजेच जवळ आणि नयन म्हणजे नेणे. सर्व प्रकारच्या विद्या व ज्ञान संपादन करण्यासाठी तसेच आचार, विचारांनी परिपूर्ण होण्याकरिता उच्च कोटीच्या ज्ञानी गुरूंजवळ जाणे आणि तेथेच सर्व प्रकारच्या विद्या ग्रहण करणे हे विद्यार्थ्यांचे महत्त्वपूर्ण कार्य! आता हा ब्रह्मचारी सतत आचार्यांच्या सानिध्यात राहून विद्याध्ययन करतोय. आचार्य आपल्या शिष्याला आपल्या हृदयात स्थान देतो. म्हणूनच त्याची अंतेवासी ही सार्थक संज्ञा ! यासंदर्भात अथर्ववेदात वर्णिलेला वरील विवेचित मंत्र अतिशय उपयुक्त ठरतो, जो की उपनयनाचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे-
आचार्य उपनयमानो ब्रह्मचारिणं कृणुते गर्भमन्त:।
तं रात्रीस्तिस्र उदरे बिभर्ति तं जातं द्रष्टुमभिसंयसयन्ति देवा:॥
म्हणजेच आचार्य हे आपल्या ब्रह्मचारी बालकाला सर्व प्रकारचे शिक्षण देण्याकरिता त्याचा स्वीकार करीत आहेत, ते आचार्य त्यास इतके सुरक्षित ठेवत आहेत की, जशी एखादी आई आपल्या बाळाला आपल्या गर्भात अतिशय सुरक्षित सांभाळून ठेवते. याच मंत्रातून विद्यार्थ्याची ‘अन्ते+वासी’ ही संकल्पना उदयास येते. आचार्यांच्या हृदयात वास करणे म्हणजे गुरूंच्या इतक्या निकट राहणे की ज्यामुळे तो कोणत्याही वाईट कृतीकडे वळणार नाही. गुरूंची बारीक नजर आपल्या शिष्यावर राहणार... जेणेकरून तो कोणत्याच वाईट कार्याकडे प्रवृत्त होणार नाही. जशी आई आपल्या गर्भस्थ बाळाची काळजी घेते, तिला इतक्या सुरक्षित ठेवते की स्वतःचेदेखील भान राहत नाही. त्याचप्रमाणे आचार्यदेखील आपल्या निकटतम असलेल्या शिष्यावर अतिशय बारकाईने लक्ष ठेवतो. यामुळे विद्यार्थी कधीच वाईटाकडे वळणार नाही. तो तर नेहमीच पवित्र कार्यात व्यस्त राहील.
सततचे अध्ययन व शारीरिक, आत्मिक उन्नतीच्या कर्मात तल्लीन राहून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधत राहील. या मंत्रात तीन रात्रीचा आलेला आहे. इथे ‘रात्र’ हा शब्द काळ या अर्थाने अभिप्रेत नाही, तर या तीन रात्री म्हणजे ज्ञान, कर्म व उपासना यांच्या प्रतीक आहेत. या तीन गोष्टींचा बोध होईपर्यंत आचार्य हा शिष्याला आपल्याजवळ म्हणजेच आपल्या अंतःकरणात ठेवतो. या तीन रात्रींचा आणखी एक अर्थ निघतो, तो म्हणजे अंधाररूप तीन रात्री! आचार्य आपल्या प्रिय शिष्याला आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक अंधारापासून म्हणजेच क्लेशांपासून वाचण्याचा उपदेश करतो. यामुळे त्या विद्यार्थ्यांची चौफेर उन्नती साधली जाते. जेव्हा हा विद्यार्थी विद्याव्रतस्नातक होऊन आपल्या घरी परततो, तेव्हा त्याचे कुटुंबीय, नातेवाईक व आप्तेष्ट त्याचा आदर सत्कार करतात. मग अशावेळी त्यास पाहण्याकरिता परिसरातील दिव्य विचारांचे असंख्य सुजन लोक येतात.
इतका व्यापक अर्थ आहे अंतेवासी होण्याचा! विशेष म्हणजे या संस्कारामुळे विद्यार्थ्यांच्या (ब्रह्मचार्याच्या) दुसर्या जन्माला प्रारंभ होतो. याविषयी मनुस्मृतीत म्हटले आहे -
’जन्मना जायते शूद्र: संस्कारात् द्विज उच्यते!’
जन्माने सर्वजण शूद्र म्हणजे सामान्य असतात. पण, संस्कारांनी द्विजत्व म्हणजेच द्वितीय जन्म प्राप्त होतो. पहिला जन्म आई-वडिलांच्या माध्यमाने, ज्यांच्यामुळे हा मानव देह लाभला. पण हा तर देह जणू काही मातीचा गोळाच! या देहाला सुसंस्कारित करावयाचे असेल, तर सुयोग्य आचार्यांचे सान्निध्य हवे. यासाठी गुरुकुलात प्रविष्ट झाल्याबरोबर आचार्य आपल्या हातांनी त्याला यज्ञविधीपूर्वक यज्ञोपवीत प्रदान करतात. यालाच आपण ‘जानवे’ असे म्हणतो. यज्ञ म्हणजे पवित्र सत्कर्म आणि उपवीत म्हणजे चिन्ह! पवित्र कार्यांची आठवण करून देणारे चिन्ह म्हणजेच यज्ञोपवीत! उत्तम कर्तव्यांची सदैव जाणीव करून देणारे जानवे!
यज्ञोपवीतात तीन सूत्र म्हणजेच तीन धागे आहेत. हे तीन सूत्र म्हणजे तीन ऋणांचे प्रतीक! विद्यार्थ्यांच्या खांद्यावर धारण करविले जाणारे यज्ञोपवीताचे हे तीन सूत्र विद्यार्थ्यांना तीन ऋणांची आठवण करून देतात. क्रमशः १) ऋषिऋण २)पितृऋण ३) देव ऋण! यातून मुक्त होण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी जीवनभर करावयाचा असतो. यातील पहिले ऋषी ऋण हे ब्रह्मचर्य धारण करून विद्या-अध्ययनाने, दुसरे पितृऋण धर्मपूर्वक गृहस्थाश्रमात प्रवेश करून आदर्श संतती निर्माण केल्याने आणि तिसरे देव ऋण हे गृहस्थाश्रमानंतर राष्ट्रकार्यासाठी जीवन समर्पित केल्याने पूर्ण होते. या तीन ऋणांची म्हणजेच कर्तव्यांची जाणीव व आठवण विद्यार्थ्यांना नेहमीच राहावी, म्हणून ते खांद्यावर धारण करावयाचे आहे. उपनयन संस्कार हा केवळ मुलांचाच करावयाचा असे नव्हे, तर मुलींनादेखील तो अधिकार आपल्या शास्त्रांनी प्रदान दिला आहे. याकरिता गोभिलीय गृह्यसूत्रात प्रमाण आले आहे--
पुराकल्पे हि नारीणां मौञ्जीबन्धनमिष्यते।
अध्यापनं च वेदानां सावित्रीवाचनं तथा॥
म्हणजेच प्राचीन काळी स्त्रियांना मौञ्जीबंधनाचा अर्थातच उपनयनाचा अधिकार होता. हा संस्कार संपन्न झाल्यानंतर त्या वेदादी शास्त्रांचे अध्ययन करायच्या आणि सावित्रीचा म्हणजेच गायत्री मंत्राचा जप करून महान विदुषी व तत्त्वदर्शी बनायच्या. अशा प्रकारे आपणास निश्चित लक्षात येते की, आपल्या प्राचीन धर्मशास्त्रांनी मुलांप्रमाणेच मुलींचाही देखील उपनयन संस्कार करण्याचा आदेश दिला आहे. उपनयन संस्कार करून विदुषी बनलेल्या अनेक स्त्रियांनी शास्त्रार्थ केल्याचे प्रसंग प्राचीन काळात आढळतात. (क्रमशः)
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
९४२०३३०१७८