तीर्थाटन संपवून आल्यावर आपल्या विहित कार्यास समर्थांनी सुरुवात केली. त्याच सुमारास शिवाजी महाराजांनी गड-किल्ले घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या स्वराज्य कार्यासाठी लोकांना अनुकूल करून घेऊन राघवाच्या पंथाद्वारे राम व हनुमान यांची उपासना सांगून समाजाला रामराज्याकडे नेले पाहिजे, असे स्वामींच्या मनात होते. समर्थांना अभिप्रेत असलेले रामराज्य म्हणजे विवेक, विचार, सदाचार यांना महत्त्व देणारे आणि सज्जनांचे रक्षण करून दुष्ट दुर्जनांचा नाश करणारे राज्य, असे राज्य त्याकाळी शिवछत्रपतींच्या रूपाने महाराष्ट्रात उभारले जात होते. अशावेळी लोकात नवचैतन्य उभारून स्वामींनी सज्जन मनाला भक्तिपंथाचा उपदेश करायला सुरुवात केली. समर्थांचा भक्तिमार्ग हा केवळ बाह्योपचार करणारा नसून त्यात सदाचाराला व अंत:करण शुद्धीला फार महत्त्व आहे.
राघवाच्या भक्तिपंथासाठी लोकांनी चारित्र्यसंपन्न होऊन नीती-नियमांचे, सदाचाराचे, न्यायाचे पालन केले पाहिजे, असे स्वामी सांगतात. रामाच्या उपासनेत हे सर्व गुण आहेत, म्हणून दिवसाची सुरुवात करताना, ’प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ असे समर्थ म्हणतात. प्रसन्न अशा प्रभात काली रामाच्या चिंतनाने शौर्य, सदाचरण, प्रामाणिकपणा, वैभव, निरीच्छता, निःस्वार्थता इत्यादी रामांच्या गुणांचे साहचर्य मिळून दिवस आनंदात जातो. दिवसभरात मनाने पापसंकल्प सोडून द्यावा आणि सत्यसंकल्प जिवी धरावा. कुणाचेही वाईट न चिंतता नेहमी शुभचिंतन करावे. असे वागल्याने मनातील विषयविकार द्वेष, मत्सर, क्रोेध, संताप हे विनाशकारी शत्रू आपोआप नाश पावतील. दिवसभर अनेक लोकांशी आपला संपर्क होतो. अशावेळी लोकांशी वागताना प्रेमळपणे वागावे. आपले बोलणे नेहमी ’नम्र सुवाचा’ असे असावे. अपशब्दांचा वापर करू नये. आपली वृत्ती सोशिक असावी.
आळसाला थारा देऊ नये, लोकांसाठी कष्ट करायची आपली तयारी असावी. लोकांच्या उपयोगी पडावे. असे वागल्याने लोकसंग्रह करता येतो. हा देह सोडून गेल्यावर मागे काय शिल्लक राहाते? काही नाही. पण, आपले आचरण चांगले असेल, परोपकारी असेल, तर आपल्या मागे आपली कीर्ती टिकून राहाते. लोक गुण आठवतात म्हणून सद्गुणांना महत्त्व द्यावे. मृत्यूची सतत आठवण ठेवावी. मृत्यूचे सामर्थ्य नजरेआड करू नये. मृत्यू कोणालाही सोडत नाही. त्याने देवांच्या अवतारांनाही सोडले नाही. आपण तर क्षुल्लक मानव! तेव्हा, केव्हा ना केव्हातरी मृत्यू आपल्याला या जगातून उचलणारच, त्यासाठी सदाचाराने वागावे. अतिस्वार्थबुद्धी नसावी. अतिस्वार्थ बुद्धीने पापाचा संचय होतो. दुसर्याचा पैसा आपल्याला मिळेल व आपण त्यावर चैन करू अशी अभिलाषा ठेवू नये. पैशासाठी खोटे कर्म करू नये, प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी देहदुःख सोसावे लागते, आपली सुखदुःखे देहाशी निगडित असल्याने देहदुःख टाळता येत नाही. परंतु, विवेकाने ते सुसह्य करता येते. (देहदु:ख तें सुख मानीत जावे।) देहदुःख हे आपल्या पूर्वपापांचे फळ आहे, असे समजावे.
पापाचे फळ केव्हा ना केव्हा तरी भोगावे लागतेच. तेव्हा देहदुःख भोगताना आपल्या पूर्वपापांची निष्कृती होत आहे, असे समजल्याने त्याचे फार दुःख न होता ते सहज सहन करता येते. सर्व बाबतीत भगवंताचा आधार कधीही विसरू नये. सर्व ठिकाणी सर्व काळी देव आपल्या बरोबर आहे याची जाणीव ठेवावी. राम सुख, आनंद व कैवल्य देणारा आहे आणि तो आपल्या भक्ताची कधी उपेक्षा करीत नाही. आपल्या ठिकाणी असलेले चांचल्य आपण रामाला समर्पित करावे. आपली भक्ती एकनिष्ठ असावी. मनाला सांगावे की, लोकांत वावरताना मौन मुद्रा धारण कर. याचा अर्थ नको त्या विषयावर वायफळ बडबड करीत बसू नये, बोलायचेच झाले, तर अत्यंत आदरपूर्वक राघवाची कथा, त्याचे गुण या विषयावर बोलावे. ज्या घरात रामाविषयी आदर भक्ती नसेल, असे घर सोडून द्यावे, त्यापेक्षा अरण्यवास पत्करावा. समाजात काही लोकांच्या ठिकाणी प्रचंड अहंकार असतो, ते नेहमी स्वतःविषयी बढाया मारत असतात आणि गंमत अशी की, अशा अहंकारी लोकांचे सामान्यजनांना खूप आकर्षण असे. पण, हे लक्षात ठेवावे की, अशा अहंकारी लोकांच्या संगतीत आपली बुद्धी रामाला विसरते.
रामाने अतुल पराक्रम केले असूनही कोठेही अहंकाराला स्थान दिले नाही. अशा रामाचा आदर्श ठेवणे आपल्या हिताचे आहे. रामासारख्या सर्वोत्तमाचा दास होऊन राहण्यात आपले हित आहे. ज्याला रामाचा दास व्हायचे आहे, त्याने मद, मत्सर, स्वार्थबुद्धी, प्रापंचिक उपाधी यांचा त्याग केला पाहिजे. त्याचे बोलणे सत्याचे न्यायाचे व गोड भाषेत असावे. त्याने आपल्या बोलण्याप्रमाणे वर्तन ठेवावे. त्याच्या ठिकाणी विषयवासनेची वृत्ती नसावी. त्यासंबंधीच्या कल्पनेचा लवलेश नसावा. मन अथांग कल्पना करीत जाते, मनाच्या कल्पनांना अंत नसतो. पण, अशाने काही रामभेट होणार नाही. वस्तुतः राम हाच कल्पतरू आहे, कामधेनू आहे, चिंतामणी आहे, सत्ताधीश आहे. त्याला सोडून इतर विषयवस्तू मागणे म्हणजे कल्पवृक्षाच्या खाली नसून दुःखाचा विचार करण्यासारखे आहे. तेथे जी कल्पना करावी तीच मिळते. म्हणून राम आणि रामनाम यानेच आपली सर्व संकटे दूर होऊन आपण ‘पूर्णकाम’ होऊ. यासाठी सकाळी रामाचे, त्याच्या गुणांचे चिंतन करून आपल्या दिवसाची सुरुवात करावी. रामनाम हे सर्व साधनांचे सार आहे तेव्हा उगीच शंका, संशय न घेता रामनामाची प्रचिती घ्यावी.
शास्त्रात आध्यात्मिक प्रगतीसाठी अनेक व्रते, दाने, उद्यापने, यज्ञ, याग सांगितले आहेत. पण, यासाठी खूप पैसा, मनुष्यबळ यांची आवश्यकता असते. सध्याच्या काळात ते कठीण आहे. शिवाय त्यात त्रुटी राहिल्यास फलप्राप्ती होत नाही- व्रते, दाने, उपासतापास यातून पुण्यप्राप्तीऐवजी ‘मी हे केले’ ही अहंकारी वृत्ती वाढते व त्याचाच गर्व होतो. यासाठी रामनामासारखे साधे, सोपे, फुकट मिळणारे साधन दुसरे नाही. फक्त ते मनापासून व आदरपूर्वक, सातत्याने करावे लागते, मग राम कृपा करतो. तो अत्यंत दयाळू आहे. रामनामाची महती सांगताना स्वामी म्हणतात, “हलाहल विषाने झालेल्या शंकरांचा दाह रामनामाने शमला. भगवान शंकर आणि माता पार्वती सतत रामनामाचा जप करीत असतात. महाराष्ट्राचे परम दैवत पंढरपूरचा विठोबा ज्याने सतत रामनाम घेणार्या महादेवाला आपल्या मस्तकी धारण केले आहे. रामनामाचा महिमा अगाध आहे. मृत्यूसमयी जीवाला सोडवणारा राम आहे, असे असूनही काही माणसे नामाविषयी उगीचच संशय घेतात. अनेक कुतर्क लढवून ते रामनामावर विश्वास ठेवीत नाहीत. अशा मुर्खांना अनेक दुःखे भोगावी लागतात. यासाठी स्वामी या शतकाच्या शेवटच्या श्लोकात म्हणतात, ‘जया नावडे नाम त्या येम जाची’ हे खरे आहे, म्हणून ‘अती आदरे नाम वाचे वदावे’.