पाकिस्तानात अहमदिया मुस्लिमांच्या मशिदीची तोडफोड; भिंतीवर लिहला आक्षेपार्ह मजकूर!

    26-Jul-2023
Total Views |
Ahmadiyya mosques in Pakistan under attack

नवी दिल्ली : अहमदिया मुस्लिमांवर अत्याचार आणि त्यांच्या मशिदी पाडण्याच्या घटना पाकिस्तानमध्ये सातत्याने वाढत आहेत. आता कराचीमध्ये अहमदिया मुस्लिमांच्या मशिदीत दिवसाढवळ्या तोडफोडीचे प्रकरण समोर आले आहे. दि. २४ जुलै रोजी दुपारच्या वेळेस डझनभर लोकांनी मशिदीचा मिनार हातोड्याच्या साहाय्याने तोडला, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान मशिदीच्या भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर ही लिहण्यात आला आहे.

ही घटना कराचीच्या ड्रग रोड भागातील शाह फैसल कॉलनीमध्ये असलेल्या 'बैत उल मुबारिक' मशिदीमध्ये घडली. या प्रकरणी जमात-ए-अहमदियाचे प्रवक्ते आमिर मेहमूद यांनी सांगितले की, दुपारी ३.४५ च्या सुमारास डझनभर लोक मशिदीत घुसले. हल्लेखोरांनी हातोड्याने मिनार फोडले आणि भिंतींवर वादग्रस्त गोष्टी लिहिल्या.

आमिर महमूदचा दावा आहे की, या वर्षात आतापर्यंत पाकिस्तानमध्ये अहमदिया मुस्लिमांच्या ११ मशिदींवर हल्ले झाले आहेत. यापूर्वी सदर आणि मार्टिन क्वॉर्टरमधील दोन मशिदींचीही तोडफोड करण्यात आली होती. तक्रार दाखल करूनही पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही. या प्रकरणी स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की, मशिदीमध्ये हल्ला झाला आहे. मात्र डझनभर नाही तर केवळ ४-५ जणांनी ही घटना घडवून आणली. हल्लेखोरांपैकी काहींनी हेल्मेट घातले होते. तर काहींनी आपले तोंड कापड्याने झाकले होते.
 
 
पोलिसांनी पुढे सांगितले की, तोडफोड करणारे शिडीच्या साहाय्याने मशिदीत घुसले होते. यानंतर त्यांनी मीनार तोडली आणि तिथून पळ काढला. अहमदिया मुस्लिमांना या प्रकरणी अनेक वेळा तक्रारी करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र त्यांनी अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. अहमदिया मुस्लिमांना मिनार बांधण्याची परवानगी नव्हती, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतरही हा मीनार बांधण्यात आली.
 
तर या प्रकरणावर अहमदिया मुस्लिमांचा दावा आहे की,त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती पोलिसांना देत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत मशिदीच्या आत झालेल्या हल्ल्याबाबत सांगण्यात आले आहे. यासोबतच त्याच्या पुराव्यासाठी सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध करून देण्यात आले आहे. हल्ल्यानंतरचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये मशिदीच्या शेजारी एक तुटलेला मिनार आणि एक शिडी दिसत आहे. तसेच व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सांगत आहे की हल्लेखोर मुखवटा घातलेले होते आणि ते दुचाकीवरून आले होते.
 
याआधी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील झेलम जिल्ह्यात पोलिसांनी अहमदिया मुस्लिमांची मशीद पाडली होती. खरं तर, पाकिस्तानातील इस्लामिक कट्टरतावादी पक्ष तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (TLP) ने पाकिस्तान सरकारला मशिदीचे मिनार तोडण्यास सांगितले होते. मीनर न पाडल्यास ती पाडण्याची धमकी TLPने दिलेली आहे. १९७४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी घटनेत दुरुस्ती करून अहमदिया मुस्लिमांना गैर-मुस्लिम घोषित केले होते. तेव्हापासून अहमदिया मुस्लिमांना भेदभाव, छळ आणि हल्ले होत आहेत.
 
अहमदिया मुस्लिमांना 'काफिर' संबोधल्याबद्दल मोदी सरकारने व्यक्त केली नाराजी

आंध्र प्रदेश वक्फ बोर्डाने अहमदिया समुदायाला 'गैर-मुस्लिम' आणि 'काफिर' घोषित करणारा फतवा जारी केला आहे. याबाबत केंद्र सरकारने हे द्वेष पसरवणारे कृत्य असल्याचे सांगत राज्य सरकारला फटकारले. हा फतवा कोणत्या 'आधारे' आणि 'योग्य' आहे, असा सवालही त्यांनी केला.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.